Sunday, 30 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.06.2019 06.00PM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०१९ सायंकाळी ६.००
****

 ‘बुके नाही तर बुक’ या आपल्या आग्रही उपक्रमाचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात केला. वाचनसंस्कृती रुजवण्यासाठीच पुष्पगुच्छ देण्याऐवजी पुस्तक देण्याची मोहीम उपयुक्त ठरत असून, अनेक ठिकाणी लोक याचं पालन करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्याला भेट मिळालेल्या प्रेमचंद यांच्या कथांमधील उद्बोधक प्रसंग सांगत, त्यांनी केरळमधल्या इडुक्कीच्या घनदाट जंगलामध्ये वसलेल्या अक्षरा ग्रंथालया विषयी, तसंच गुजरातमध्ये यशस्वी ठरलेल्या ‘वांचे गुजरात’ या मोहिमेबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली.
****

 पंतप्रधान स्वत: नागरिकांसोबत प्रत्यक्ष संवाद साधतात, असा मन की बात, हा गातला पहिला प्रयोग आहे, असं केंद्रीमाहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते आज पुणे इथल्या आनंदनगर सोसायटीच्या लोकांसोबत मन की बात ऐकल्यानंतर आकाशवाणीशी बोलत होते. पंतप्रधानांनी केलेल्या जल संरक्षण अभियानाच्या आवानाला देखील नागरीक स्वच्छता अभियानासारखा सकारात्मक प्रतिसाद देतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
****

 २०११ च्या जणगणनेनुसार देशात विधवांची संख्या चार कोटी ३२ लाख ६१ हजारापेक्षा जास्त आहे. यात महाराष्ट्रात सुमारे ४५ लाख, उत्तर प्रदेशात सर्वाधिक ४९ लाख, तर आंध्र प्रदेशात सुमारे ४३ लाख विधवा असल्याची माहिती, केंद्रीय महिला तथा बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली.

 विधवांच्या सर्वसाधारण गरजा पूर्ण करण्यासाठी विभिन्न केंद्र मंत्रालयांकडून अनेक नवीन योजना राबवल्या जाणार आहेत, त्यात स्वाधार गृह योजना, महिला शक्ती केंद्र योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनांचा समावेश असल्याचं त्या म्हणाल्या.
****

 पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दर्शन थेट ऑनलाईन दाखवण्याचे अधिकार मंदिर समितीने जिओ आणि टाटा स्काय कंपनीला देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती, माहिती अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे. आजारी, दिव्यांग तसेच कामाच्या धावपळीत ज्यांना पंढरपूरला येणे शक्य नाही, असे अनेक लोक आता ऑनलाईन दर्शन घेऊ शकतात, या माध्यमातून मंदिर समितीला ५० ते ६० लाखाचे उत्पन्न मिळणार असल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.
****

 राज्यातल्या वीज निर्मिती, विजेचं वहन, विजेचे दर, ग्राहकांना दिली जाणारी सवलत याबाबत सविस्तर माहिती देऊन येत्या काही वर्षात वीज पुरवठ्या संदर्भातल्या सर्व समस्या निश्चित मार्गी लागतील, असा विश्वास ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी वसई इथं बोलतांना व्यक्त केला. सौभाग्य योजनेत १२ कोटी रुपये खर्च करून पालघर जिल्ह्यात वीजपुरवठ्याचं प्रमाण वाढवल्याचं त्यांनी सांगितलं.
****

 राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत जालना जिल्ह्यात एक कोटी पाच लाख ६७ हजार ४५० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. एक जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात तीन हजार ९७८ ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेसाठी वन विभागाकडे सव्वा कोटींहून अधिक रोपे तयार आहेत. जिल्ह्यातल्या ७७९ ग्रामपंचायतींना २५ लाख रोपांचं वाटप केलं जाणार आहे. शासकीय संस्थांबरोबरच जिल्ह्यातल्या सेवाभावी संस्था, उद्योजक, शाळा, महाविद्यालयांनी या वृक्षलागवड मोहिमेत सहभाग घ्यावा, असं आवाहन वन विभागानं केलं आहे.
****

 बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपुर तालुक्यात अंगावर वीज पडल्यामुळे २ जण ठार, तर २ जनावरे दगावल्याची घटना घडली आहे. वरवट खंडेराव येथील शेतकरी श्रीकृष्ण कांशिराम ढमा, तसंच संग्रामपूरच्या जस्तगाव येथील युवराज विश्वास गव्हांदे अशी मृतांची नावं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

  आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, भारत आणि यजमान इंग्लंड दरम्यानचा सामना आज इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं सुरु झाला. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं, तेव्हा इंग्लंडनं ३६ षटकांत, तीन बाद २१३ धावा केल्या होत्या.
*****
***

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.06.2019....Afternoon Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०१९ दुपारी .०० वा.
****
सुमारे चार महिन्यांच्या खंडानंतर आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. जल संरक्षणासाठी एक व्यापक जन आंदोलन उभारण्याची गरज असून, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. चित्रपट, क्रीडा, कथा-कीर्तन क्षेत्रांतल्या धुरीणांनी, प्रसार माध्यमांनी आपापल्या परीनं या क्षेत्रात नेतृत्त्व करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. ‘हॅशटॅग जनशक्ती फॉर जलशक्ती’ याचा उपयोग करून प्रत्येकानं आपलं या विषयीचं मत, माहिती आणि सूचना समाज माध्यमांवर ‘शेअर’ कराव्यात, असंही ते म्हणाले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत एकसष्ट कोटी लोकांनी मतदान केलं. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची ही आजवरच्या इतिहासातली सर्वात मोठी निवडणूक होती, हे सांगतानाच, लाखो शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा दलांनी दिवस-रात्र परिश्रम केल्यामुळेच निवडणुका पार पडू शकल्या, असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं. २१ जूनला जगभरात ‘योग दिन’ मोठ्या उत्साहात साजऱ्या करण्यात आल्याबद्दल त्यांनी जगभरातल्या नागरिकांचे आभार मानले.
तसंच, ‘बुके नाही तर बुक’ या आपल्या आग्रहाचा पुनरुच्चार करतानाच, त्यांनी प्रेमचंद यांच्या कथांतील काही भावलेल्या प्रसंगांचा उल्लेख केलाच, शिवाय वाचनसंस्कृती वाढवण्यात मोलाची भर घालणाऱ्या केरळमधल्या अक्षरा ग्रंथालयाचं, गुजरातमध्ये राबवण्यात आलेल्या ‘वांचे गुजरात’ मोहिमेचं उदाहरणही त्यांनी दिलं. 
****
जम्मू काश्मीरच्या, बडगाम जिल्ह्यातल्या, बुगाम चडूरा, भागात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. या परिसरात पोलीस आणि सुरक्षादलांनी घेराव करून शोधमोहीम सुरू केली असता, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. घटनास्थळावर हत्यारं आणि दारुगोळा हस्तगत केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आकाशवाणीला दिली आहे. तसंच मृत दहशतवाद्याची आणि त्याच्या गटाची ओळख पटवण्याचं कामही सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, भारत आणि यजमान इंग्लंड दरम्यानचा सामना आज इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या या सामन्याचं थेट समालोचन आकाशवाणी वरुन दुपारी २ वाजून ३० मिनिटांपासून प्रसारित केलं जाईल. आजचा सामना जिंकल्यास भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित होईल, तर इंग्लंडचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येईल. भारत सहा सामने खेळून ११ अंकासह दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड सात सामने खेळून आठ अंकासह पाचव्या स्थानावर आहे. काल झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा, तर पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा पराभव केला.
****
हिंगोली ते वाशिम रेल्वे मार्गावर, कनेरगावच्या, पैनगंगा नदीवरच्या, पुलाजवळ रुळाखालची, पट्टी तुटल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. ही बाब लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून, या मार्गावर धावणारी अकोला-पूर्णा रेल्वे लाल झेंडी दाखवून थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला. पट्टी बदलण्याचं काम केल्यानंतर एक तासाने रेल्वेगाडी मार्गस्थ झाली.
****
काल रात्रीपासून औरंगाबादसह मराठवाड्यात रिमझिम पाऊस सुरूच आहे. सर्वदूर झालेल्या या पावसानं मराठवाड्यातल्या जवळपास प्रत्येक तालुक्यात तुरळक हजेरी लावली. औरंगाबाद शहरात आज सकाळी १८ पूर्णांक ४ मिलिमिटर पावसाची नोंद झाल्याचं चिकलठाणा वेधशाळेनं सांगितलं. तसंच जिल्हाभरात सरासरी ४ पूर्णांक ३२, जालना जिल्ह्यात १२ पूर्णांक ४६, परभणीत १३ पूर्णांक ८१, हिंगोलीत १४ पूर्णांक ६२, नांदेडला १० पूर्णांक ३५, बीड जिल्ह्यात ९ पूर्णांक ४१, लातूरमध्ये ९ पूर्णांक ९१, तर उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी ३ पूर्णांक ८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचं विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.
दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस सुरू असून, मुळा नदीवरील आंबित धरण भरले आहे. त्यातून ५०० क्यूसेक्स वेगानं पाणी त्याखालच्या पिंपळखांड प्रकल्पात सोडलं जात आहे.
****

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.06.2019....07.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०१ सकाळी ७.१० मि.
****
·      आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याची काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांची सूचना.
·       गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
·      महिलांना राजकीय आरक्षण देण्याची भारतीय जनता पक्षाची भूमिका - प्रदेशाध्याक्ष रावसाहेब दानवे.
आणि
·      विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना.
****
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याची सूचना काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी केली आहे. दिल्लीत काल त्यांनी निवडणुकीच्या तयारीसंदर्भात राज्यातल्या पक्ष नेत्यांची बैठक घेतली, या बैठकीत बोलतांना त्यांनी ही सूचना केली. बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करण्याची पक्षाची तयारी असल्याचं सांगितलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम राहणार आहे, मात्र अद्याप दोन्ही पक्षात जागा वाटपाचा निर्णय अद्याप झाला नसल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
दरम्यान, पक्षाच्या किसान सेलचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला.
****
सरकार पुढच्या वर्षीपर्यंत देशात 'एक शिधापत्रिका' योजना राबवणार आहे. या नव्या योजनेनंतर कुणीही गरीब व्यक्ती सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, एका भागातून दुसऱ्या भागात स्थलांतरित झालेल्या नागरिकांनाही वितरण व्यवस्थेचा लाभ विनासायास घेता येईल. अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं असल्याचंही ते म्हणाले. महाराष्ट्रासह इतर दहा राज्यांनी याआधीच या योजनेचा लाभ देणं सुरु केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
‘स्टार्टअप इंडिया’योजने अंतर्गत गेल्या चार वर्षात देशभरात एकोणीस हजार ३५१ स्टार्टअप उद्योगांची नोंदणी झाली असून, यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक तीन हजार ६६१ ‘स्टार्टअप’ उद्योगांची नोंदणी झाली आहे. वैकल्पिक गुंतवणुकीतही महाराष्ट्रानं आघाडी घेत देशात दुसरा क्रमांक पटकवला आहे. राज्यात एकूण अडूसष्ट `स्टार्टअप`मध्ये ४४० कोटी ३८ लाख रुपयांची वैकल्पिक गुंतवणूक झाली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सहा आठवड्यांच्या उन्हाळी सुटीनंतर, सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज उद्यापासून सुरू होत आहे. अयोध्या राम जन्मभूमी प्रकरण, राफेल खरेदी प्रकरण आणि राहुल गांधी यांच्याविरोधातलं न्यायालय अवमान प्रकरण आदी संवेदनशील खटल्यांवर यापुढे सुनावणी होणं अपेक्षित आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज आपल्या संपूर्ण क्षमतेसह म्हणजे सर्व ३१ न्यायमूर्तींसह सुरू होईल, असं पीटीआय वृत्तसंस्थेनं नमूद केलं आहे.
****
गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राशी निगडीत विविध विषयांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये बोलत होते. या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर निश्चित ठोस उपाय शोधले जातील अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
पावसामुळं पुण्यात काल भिंत कोसळून दगावलेल्या पंधरा जणांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींना २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. काल पहाटेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत बिहार आणि पश्चिम बंगालमधून आलेल्या कामगारांच्या कुटुंबातल्या पंधरा जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहे. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेतल्या मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत आणि मोफत उपचार देण्याची घोषणा केली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बातया कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमानंतर लगेच, प्रादेशिक भाषांमधून पंतप्रधानांच्या संवादाचा अनुवाद प्रसारित होईल, आज रात्री आठ वाजता या अनुवादाचं पुन:प्रसारण केलं जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रम मालिकेचा हा ५४ वा भाग असेल. ंतप्रधानांच्या दुसऱ्या कार्यकाळातला हा पहिलाच कार्यक्रम आहे.
****
महिलांना राजकीय आरक्षण मिळावं ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे, त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सर्वाधिक महिला खासदार निवडून आल्या आहेत असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं भाजप महिला कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आणि भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा माधवी नाईक यांनी, येत्या राखीपौर्णिमेपासून सभासद नोंदणी सुरू होणार असल्याची माहिती दिली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माहूर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शीतल जाधव यांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली. उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या अश्विनी तुपडाळे यांची निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल जाधव आणि भाजपच्या दिपाली लाड यांच्यात झालेल्या लढतीत दोघींनाही समान मतं मिळाली, त्यामुळे काढण्यात आलेल्या चिठ्ठीद्वारे जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली.
****
औरंगाबादच्या विश्व संवाद केंद्रातर्फे दिला जाणारा देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार यावर्षी बीडचे पत्रकार प्रमोद कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. प्रांत संघचालक मधुकर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी या पुरस्काराचं वितरण औरंगाबाद इथल्या मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीच्या सभागृहात होणार आहे, अशी माहिती देवगिरी प्रांतचे अध्यक्ष कुलभूषण बाळशेटे यांनी दिली.  
****
क्रिकेट:
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यात सामना होणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांपैकी पाच सामन्यात भारतानं विजय मिळवला असून, एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही.
या स्पर्धेत काल पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा तर ऑस्ट्रेलियानं न्युझीलंडचा पराभव केला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्ताननं पाकिस्तानला विजयासाठी २२८ धावांचं आव्हान दिलं होतं. या विजयानंतर गुणतालिकेत पाकिस्तान चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. स्पर्धेतल्या अन्य सामन्यात, ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा ८६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियानं विजयासाठी न्यूझीलंडला २४४ धावांचं लक्ष्य दिलं होतं, मात्र न्युझीलंडचा संघ ४४व्या  षटकां१५७ या धावसंख्येवर सर्वबाद झाला.
****
विद्यापीठं फक्त परीक्षेपुरती मर्यादीत न राहता तिथून संशोधन होण्याची आवश्यकता त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि. ल. धारूरकर यांनी व्यक्त केली आहे. ते काल लातूर इथं गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात बोलत होते. समाज बदलायचा असेल तर शिक्षण बदललं पाहिजे, राष्ट्राची आणि चारित्र्याची उभारणी शिक्षणामधून करण्याची गरज असल्याचं मत धारुरकर यांनी व्यक्त केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी, निमअर्कासह योग्य त्या उपाय योजना येत्या आठ दिवसात कराव्यात, असं आवाहन जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांनी केलं.
****
राज्यात कालही अनेक भागात चांगला पाऊस झाला. औरंगाबाद शहरात काल रात्री तर, परभणी शहरासह जिल्ह्यात काल दमदार पाऊस पडला. मानवत, पाथरी, जिंतूर, सोनपेठ, तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर महानगरपालिकेनं केंद्र सरकारच्या ईईएसएल कंपनीसोबत पथदिव्यांबाबतचा करार केला आहे. यानुसार पहिल्या टप्यामध्ये सध्याचे पारंपारिक पद्धतीचे ९५ टक्के पथदिवे बदलण्यात येतील.
****

Saturday, 29 June 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.06.2019....18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-ट्वेंटी शिखर परिषदेत आज शेवटच्या दिवशी इंडोनेशिया, ब्राझील आणि तुर्कस्तानच्या अध्यक्षांशी चर्चा केली. इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विदोदो यांच्याबरोबरच्या चर्चेदरम्यान उभयपक्षी व्यापारासाठी सुमारे ५० अब्ज अमेरिकन डॉलरचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं. वर्ष २०२५ पर्यंत हे उद्दिष्ट गाठायचं असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली आहे. ब्राझिलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो आणि तर्कस्तानचे अध्यक्ष रेसिप तय्यब एर्दोगान यांच्या बरोबरही व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षण क्षेत्रातल्या सहकार्याविषयी पंतप्रधानांनी आज व्यापक चर्चा केली.
****
‘एक देश एक शिधापत्रिका’ या धोरणानुसार केंद्र सरकारनं, राज्य सरकार आणि घटक राज्यांना नावं नोंदवण्यासाठी एक वर्षाची अंतिम मुदत दिली आहे. या योजनेनुसार शिधापत्रिका धारकाला देशातल्या कोणत्याही भागात स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेता येणार असल्याचं केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ‘सर्वांसाठी घरं आणि परवडतील अशी घरं’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मुंबईतील गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राशी निगडीत विविध विषयांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये बोलत होते. या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर निश्चित ठोस उपाय शोधले जातील अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
पावसामुळं पुण्यात कोंढवा इथं तलब मशिदी जवळच्या झोपड्यांवर साठ फूट लांब भिंत कोसळल्यामुळं दगावलेल्या पंधरा जणांच्या कुटुंबीयांना बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत आणि मोफत उपचार देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींना २५ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात चौका, खुलताबाद तालुक्यातील काही गावं आणि वैजापूर तालुक्यातल्या सवंदगाव, लोणी बुद्रुक या गावांमध्ये मक्या अमेरिकन लष्करी अळीचा प्राद्रुर्भाव आढळून आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. जिल्ह्यात जवळपास एक लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी होणार असून या अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी निमअर्कासह योग्य त्या उपाय योजना येत्या आठ दिवसात करण्याचं आवाहन जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांनी यावेळी केलं.
****
परभणी शहरासह जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाला. मानवत, पाथ्री,जिंतूर सोनपेठ, तालुक्यात अद्याप सर्वत्र पाऊस पडत आहे. अमरावती जिल्ह्यातही सकाळपासून पाऊस पडत आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळं मुंबई गोवा महामार्गावर ठीक ठिकाणी भराव खचला आहे. काही ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. पालघर जिल्ह्यात सरासरी आतापर्यंत १७४ पूर्णांक ४४ मिमी पाऊस झाला आहे.
****
परभणी महानगर पालिकेच्यावतीनं शहरात स्वच्छता मोहीमेला सरुवात करण्यात आली असून शहरातील विविध परिसरातील अतिक्रमण आज काढण्यात आलं. आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत जीर्ण असलेल्या इमारतीची पाहणी करून त्यांना तत्काळ नोटीस देण्याचे तसंच स्वच्छता विभागाची बैठक बोलावून शहरातील नाला सफाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातल्या पोरज इंथं विहिरीतलं पाणी पाहत असताना अचानक विहीरीची कडा खचल्यानं मातीच्या भरावाखाली चार शाळकरी मुलं दबल्याची दुर्घटना घडली असून यात एका तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. अन्य तीन मुलं गंभीर जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं  आहे. 
****
लातूर इथल्या गांधीचौक पोलिस ठाण्यातील एका पोलिसाला लाच स्वीकारताना आज अटक करण्यात आली. एका खुनाच्या आरोपीला पोलिस कोठडीत न ठेवता न्यायालयात हजर केल्याचं बक्षीस म्हणून दोन हजार रुपयांची लाच मागणाऱा नारायण गरड या पोलिसाला या प्रकरणी अटक झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाच्या अकृषी विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  विविध मागण्यांसाठी आज लाक्षणिक संप केला. सातवा वेतन आयोग, नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ द्यावा आदी मागण्यांसाठी हे कर्मचारी आंदोलन करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.06.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 June  2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जून २०१९ दुपारी .०० वा.
****

 आपत्ती निवारण करण्यासाठी `जी ट्वेन्टी` राष्ट्रांनी एकत्र यावं, असं अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  केलं आहे. जपानच्या ओसाका इथं सुरू असलेल्या जी ट्वेंटी देशांच्या बैठकीत ते बोलंत होते. आपत्ती निवारणाला सर्वाधिक महत्त्व दिलं जावं, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. पंतप्रधानांनी इंडोनेशीया, ब्राझील आणि तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांशी स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक तसंच संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर निर्णय झाले.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी `जी   ट्वेंटी` देशांची तीन दिवसीय बैठक आटोपून दिल्लीला परतत आहेत.
****
 ‘स्टार्टअप इंडिया’योजने अंतर्गत गेल्या चार वर्षात देशभरात एकोणीस हजार ३५१ स्टार्टअप उद्योगांची नोंदणी झाली असून सर्वाधिक तीन हजार ६६१ `स्टार्टअप` उद्योगांची नोंदणी एकट्या महाराष्ट्रात झाली असल्याची माहिती केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. त्यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात ही माहिती दिली आहे. वैकल्पिक गुंतवणुकीतही महाराष्ट्रानं आघाडी घेत देशात दुसरा क्रमांक पटकवला असून  राज्यात एकूण अडूसष्ट `स्टार्टअप`मध्ये ४४० कोटी ३८ लाख रुपयांची वैकल्पिक गुंतवणूक झाली असल्याचं त्यांनी नमुद केलं.
****

 सहा आठवड्यांच्या उन्हाळी सुट्यांनंतर, सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज सोमवारपासून सुरू होत आहे.  अयोध्या राम जन्मभूमी वाद, राफेल खरेदी प्रकरण आणि राहुल गांधींचा न्यायालय अवमान खटला आदी अतीशय संवेदनशील खटल्यांवर सर्वोच्च न्यायालय सुरू झाल्यानंतर सुनावणी अपेक्षित आहे.  सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संपूर्ण क्षमतेसह म्हणजे सर्व ३१ न्यायमूर्तींसह सुरू होईल, असं पीटीआय वृत्तसंस्थेनं नमुद केलं आहे.
****
 सरकारनं जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी एनएससी अर्थात राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि पीपीएफ अर्थात सार्वजनिक भाविष्य निर्वाहनिधीसह छोट्या बचत योजनांवरच्या व्याजदरात एक दशांश टक्क्यांनी कपात केली आहे. बचत खात्यांवरचा व्याज दर मात्र वार्षिक चार टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. पीपीएफ आणि एनएससी वर आता सात पूर्णांक नऊ दशांश टक्के व्याज दर राहील तर ११३ महिन्यांची मुदत किसान विकासपत्रावर सात पूर्णांक सहा दशांश टक्के व्याज दर असेल.
****
 ठेकेदाराची तांत्रिक पात्रता पूर्ण नसताना कंत्राट देण्यात आलं तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याचे नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी दिली आहे. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत परळी-वैजनाथ या शहराच्या मलनिस्सारण प्रकल्पाला १०१ कोटी ८६ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीनं निविदा मागविण्यात आली होती. मात्र, ठेकेदाराची तांत्रिक पात्रता पूर्ण होत नसताना नियुक्ती करण्यात आली असल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी काल विधानसभेत सांगितलं.  परळी वैजनाथ शहराच्या मलनिस्सारण प्रकल्पासंदर्भात सदस्य संगिता ठोंबरे यांनी लक्षवेधी मांडली होती त्याला उत्तर देताना सागर बोलत होते.

 परळी शहराचा सहा कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचा घनकचरा व्यवस्थापनाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आला असल्याचंही नगरविकास राज्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****

पुण्याच्या कोंडवा इथं काल रात्री पावसामुळं एक संरक्षण भिंत कोसळून पंधरा मजूर ठार झाल्याच्या दूर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दिले आहेत. या दुर्घटनेमुळं आपल्याला अत्यंत दु;ख झालं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी एका संदेशात म्हटलं आहे. कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही दुर्घटनेबद्दल दु;ख व्यक्त केलं आहे. दुर्घटनाग्रस्त कुटूंबीयांना राज्य सरकारनं सर्वतोपरी मदत करावी, चौकशी करून गुन्हेगारांना शिक्षा करावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.
****

 नांदेड जिल्ह्यात उमरी इथं एका महिलेसह तिच्या सहा वर्षीय मुलाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. औरंगाबाद, नांदेडसह जालना तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात काल चांगला पाऊस झाला.

 अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये सरासरी ८० मिलिमीटर पाऊस पडला. रायगड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही सर्वत्र पाऊस पडत असल्याचं वृत्त आहे. महाड, अलिबाग, पेणमध्ये रिमझिम सुरू आहे. त्यामुळे सावित्री, गंधारी या नद्यांना पुर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस पडत आहे, काल सकाळी आठ वाजेपासून आज सकाळी आठ पर्यंत संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ११२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे  सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली आहे.
*****
***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.06.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२९ जून  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 जापानच्या ओसाका इथं सुरु असलेल्या जी-ट्वेन्टी शिखर परिषदेच्या आज शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक जागतिक नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका घेत आहेत. पंतप्रधान मोदींची पहिली बैठक इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांच्याबरोबर झाली. महिला सशक्तिकरणाबाबत होणाऱ्या विशेष कार्यक्रमातही पंतप्रधान सहभाग घेणार आहेत. जी-ट्वेन्टी शिखर परिषदेच्या मानवकेंद्रीत भावी समाजाच्या संकल्पनेच्या अनुशंगानं शाश्वत विकास, सर्वसमावेशकता आणि असमानता या मुद्यांवर चर्चा होणार आहे. परिषदेच्या चौथ्या आणि अंतिम सत्रात हवामान बदल, पर्यावरण आणि उर्जा या मुद्दांवर चर्चा होईल, असं पिटीआयचं वृत्त आहे.
****

 सरकारनं जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी एनएससी अर्थात राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि पीपीएफ अर्थात सार्वजनिक भाविष्य निर्वाहनिधीसह छोट्या बचत योजनांवरच्या व्याजदरात एक दशांश टक्क्यांनी कपात केली आहे. बचत खात्यांवरचा व्याज दर मात्र वार्षिक चार टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. सरकारी निर्णयानुसार छोट्या बचत योजनांसाठीचे व्याजदर दर तीन महिन्यांनी अधिसुचित केले जातात. पीपीएफ आणि एनएससी वर आता सात पूर्णांक नऊ दशांश टक्के व्याज दर राहील तर ११३ महिन्यांची मुदत किसान विकासपत्रावर सात पूर्णांक सहा दशांश टक्के व्याज दर असेल.
****

 पुण्यात पावसामुळं एका गृहनिर्माण संस्थेची संरक्षक भिंत कोसळून किमान पंधऱा मजुरांचा मृत्यू झाला आहे. कोंढवा भागात काल रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास ही दूर्घटना घडली. मुंबईतही पावसाशी संबंधित अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात उमरी इथं एका महिलेसह तिच्या सहा वर्षीय मुलाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला.
****

 औरंगाबाद, नांदेडसह जालना तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात काल चांगला पाऊस झाला.

 अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये सरासरी ८० मिलिमीटर पाऊस पडला. रायगड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही सर्वत्र पाऊस पडत असल्याचं वृत्त आहे. महाड, अलिबाग, पेणमध्ये रिमझिम सुरू आहे. त्यामुळे सावित्री, गंधारी या नद्यांना पुर आला आहे. ठिकठिकाणी  शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे.
*****
***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 29 June 2019
Time:  8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۲۹ ؍جون  ۲۰۱۹ئ؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸

 اسکولی تعلیم کے وزیر آشیش شیلار نے کل قا نون ساز اسمبلی کو بتا یا کہ گیارہویں جماعت میں داخلوں کے لیے زیادہ تر طلباء نے عام زمرے کے تحت داخلوں کی در خواستیں دی ہے جسکی وجہ سے محفوظ زمرے کے لیے مختص نشستیں خالی رہ جانے کا خدشہ ہے اسی لیے طلباء کی جانب سے پیش کر دہ در خواستوں میں زمرہ بلدنے کی سہو لت فراہم کی جا رہی ہے۔وزیر موصوف نے بتا یا کہ طلباء کے پاس ذات صداقت نا مہ  یا  معاشی طور پر پسماندہ ہونے کا صداقت نا مہ نہ ہونے کی صورت میں اُنکے سر پرستوں کی ضمانت پرداخلہ دیا جائے گا۔
اور یہ صداقت نامے پیش کرنے کے لیے تین ماہ کی مدت دی جائے گی۔شیلار نے بتایا کہ ICSEکے طلباء کے لیے داخلہ در خواست کے پہلے اور دوسرے حصے  میں تبدیلی کے لیے آئندہ یکم جولائی تک مہلت دی گی ہے۔

***** ***** *****

  مراٹھا ریزر ویشن میں حصہ لینے والے 13؍ ہزار سے زائد نو جوانوںکے خلاف دائر فردِ جرم واپس لیے جائیں ۔حزب اختلاف کے رہنما وِجئے وڈیٹی وار نے کل اسمبلی میںیہ مطالبہ کیا ۔ساتھ ہی اُنھوں نے احتجاج کے دوران فوت ہونے والوں کے لواحقین کے لیے معلنہ 10؍ لاکھ روپئے کی امداد اور  ملازمت دینے کا بھی مطالبہ کیا۔اسکے جواب میں وزیر محصول چندر کانت پاٹل نے ایوان کو بتا یا کہ فردِ جرم واپس لینے کا عمل جاری ہے  اور 10؍ لاکھ روپئے امدا د  اور  ملازمت  دینے سے متعلق جلد ہی تفصیلات فراہم کی جائے گی۔

***** ***** *****

 راشٹر وادی کانگریس کے رہنما اجیت پوار نے منشیات کی اسمگلنگ کرنے والوں اور فروخت کرنے والوںکے لیے موت کی سزا مقرر کرنے کا مطالبہ کیا ہے۔ وہ کل اسمبلی میں مخا طب تھے ۔اِس پر مملکتی وزیر داخلہ ڈاکٹر رنجیت پاٹل نے ایوان کو بتا یا کہ ریاست میں منشیات کے کار وبار پر روک لگا نے کے لیے ممبئی میں Independent anti-narcotic chamber قائم کیا گیا ہے اور
 ہر ضلعے میںایسے سیل قائم کیئے جائیں گے۔

***** ***** *****

 خواتین اور بہبودِ اطفال کی وزیر پنکجا منڈے نے کہا ہے کہ یتیم بچوں کے مسائل حل کرنے کے لیے حکو مت پر عزم ہے۔
وہ کل اسمبلی میں بچّو کڑو کی جانب سے جاری کی گئی یتیم بچوںکے مسائل سے متعلق توجہ دلائو نوٹس کا جواب دے رہی تھیں۔
وزیر موصوفہ نے بتا یا کہ وقت کی ضرورت کو مد ِ نظر رکھتے ہوئے اِن بچوں کو پیشہ ورانہ تربیت دے کر خود کفیل بنا نے کی غرض سے  اِنٹر پرینر شِپ مہم کے تحت  تر بیتی کور سیز متعارف کر وائیں جائیں گے۔

***** ***** *****

 صنعتی علاقوں کے لیے زمین تحویل میں لیتے وقت متعلقہ کاشتکاروں کو چار گنا معاوضہ دینے ،گفت و شنید کے ذریعے معاملہ طئے کرنے اور رضا مندی کے بغیر زمین حاصل نہ کر نے سے متعلق آڈریننس کل قا نون ساز اسمبلی میں منظور کر لیا گیا۔
وزیر محصول چندر کانت پاٹل نے اسمبلی کو بتا یا کہ کا بینہ کی ذیلی کمیٹی نے قحط زدہ علاقوں میں قائم کی گئی چارہ چھائو نیاں 9؍ اگست تک جاری رکھنے  اور ٹینکروں کے ذریعے پا نی فراہمی سے متعلق فیصلہ لینے  کے اختیارا ت ضلع کلکٹروں کو دینے کا فیصلہ کیا ہے۔

 ***** ***** *****

 وزیر برائے خوراک  و  ادویہ انتظا میہ جئے کمار راول نے دودھ میں ملاوٹ کرنے والو ںکے خلاف سخت کار وائی کرنے کی ہدا یت دی ہے۔اُنھو ںنے کہا کہ دودھ میں ملا وٹ میں تعاون کرنے والے افسران و ملازمین کے خلاف بھی سخت کار وائی کی جائے گی ۔
وہ کل ممبئی میں  خوراک و ادویہ انتظامیہ کی جا نب سے منعقدہ اجلاس میں اظہار خیال کر رہے تھے۔

***** ***** *****

 ریاست میں بارش سے متعلق واقعات میںکل20؍ افراد جا بحق ہو گئے۔ پو نا میں ایک دیوار گر جانے سے 15؍ افراد ہلاک ہو ئے۔
ممبئی میں بارش کی وجہ سے پیش آئے حادثات میں تین افراد جا بحق اور پانچ افراد شدیدزخمی ہو ئے۔ناندیڑ  ضلعے کے عمری میں ایک خاتون اور اُسکا 6؍ سالہ بیٹا بجلی گر نے سے جھلس کر ہلاک ہو گئے۔
 اِسی دوران اور نگ آباد شہر اور اُسکے مضا فا تی علاقوں میں کل دو پہر موسلا دھار بارش ہوئی۔ جالنہ اور عثمان آ بادمیں بھی کل زور داربارش ہونے کی خبر ہے۔

***** ***** *****

 خریف موسم کے لیے جالنہ ضلعے میں قومی بینکوں اور ضلع سینٹرل کو آپریٹیو بینکوں کے ذریعے اب تک 24؍ ہزار سے زائد کاشتکاروں میں 158؍ کروڑ60؍ لاکھ روپئے خریف فصل قرض تقسیم کیا گیا ہے۔ ہمارے نمائندے خبر دی ہے کہ ضلعے میں ایک ہزار50؍ کروڑ روپئے فصل قرض تقسیم کرنے کا نشا نہ مقرر کیا گیا ہے۔

***** ***** *****

 بے سہارا افراد کو ہر ماہ تین ہزار روپئے وظیفہ سمیت دیگر مطالبات کی یکسوئی کے لیے  نِر آدھار سنگھرش سمیتی کی جانب سے کل لاتور ضلعے کے اَوسا میں مورچہ نکالا گیا۔ریاست بھر سے تقریباً7 ؍سے8؍ہزار بے سہارا اور معذور افراد نے مورچے میں حصہ لیا۔
بے سہارا افراد کے حوالے سے مختلف مطالبات پر مبنی محضر بھی اِس موقعے پرتحصیلدار کے سپردکیا گیا۔

***** ***** *****

  مراٹھواڑہ تر قیاتی کارپوریشن کے چیئر مین  ڈاکٹر بھاگوت کراڑ نے محکمہ آبی وسائل و آبپاشی کو یہ ہدا یت دی ہے کہ اورنگ آباد ضلعے کے کنڑ اور سوئے گائوں میں آبی وسائل منصوبوں کے کام فوراً مکمل کریں۔ کراڑ نے کل پھُلمبری اور کنڑ تعلقے میں آبی ذخائر کے مختلف کا موں کا جائزہ لیا۔اِس موقعے پر اُنھوں نے عوام سے پانی کا مناسب استعمال کرنے کی
اپیل۔

***** ***** *****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.06.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जून २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  अकरावीच्या आरक्षित जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पालकांच्या हमीपत्रावर प्रवर्ग बदलण्याची मुभा
Ø   मादक द्रव्य तस्कर आणि विक्रेत्यांसाठी मृत्युदंडाची तरतूद करावी - अजित पवार यांची मागणी
Ø  मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल
आणि
Ø  राज्यात पावसाशी निगडित घटनांमध्ये वीस जणांचा मृत्यू; मराठवाड्यात अनेक भागात पाऊस
****

 राज्यात अकरावी प्रवेशासाठी अधिकांश विद्यार्थ्यांनी सामान्य प्रवर्गातून अर्ज भरले असून, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग तसंच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातल्या अनेक आरक्षित जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जातून प्रवर्ग बदलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. ज्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र किंवा आर्थिक दुर्बल घटकाचं प्रमाणपत्र नसेल, त्यांना पालकांच्या हमीपत्रावर प्रवेश देण्यात येईल तसंच ही प्रमाणपत्रं सादर करण्यासाठी तीन महिने मुदत देण्यात आल्याची माहिती शेलार यांनी दिली. राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी राखीव कोट्यातून फक्त १३ टक्के तर आर्थिक दुर्बल घटकातून फक्त ९ टक्के विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. औरंगाबाद विभागातून हे प्रमाण अनुक्रमे १५ आणि सुमारे अकरा टक्के एवढं आहे.

 भारतीय माध्यमिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम- आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाच्या भाग एक आणि दोनमध्ये सुधारणांसाठी एक जुलैपर्यंत मुदत दिली असल्याची माहितीही शेलार यांनी दिली.

 दरम्यान, पुढील पाच वर्षात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांसाठी सौर ऊर्जा सयंत्र बसवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल, असं शेलार यांनी काल विधानसभेत सांगितलं. यावर्षी जिल्हा परिषदांच्या शाळांच्या दुरुस्तीसह अन्य भौतिक सुविधांसाठी ४०० कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी दिली.
****

 मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेल्या तेरा हजारावर तरुणांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल विधानसभेत केली. आंदोलनादरम्यान मृतांच्या कुटुंबियांना नोकरी आणि दहा लाख रुपये मदत जाहीर झाली होती ती तात्काळ मिळावी, असंही वडेट्टीवार म्हणाले. याबाबत महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी, गुन्हे मागे घेण्याची प्रकिया सुरू असून, नोकरी आणि दहा लाख रुपये मदतीबाबतचा लवकरच माहिती देण्यात येईल असं सदनाला सांगितलं.
****

 मादक द्रव्य तस्कर आणि विक्रेत्यांसाठी मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल विधानसभेत केली. यावर, राज्यात अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापाराला आळा घालण्याकरता मुंबई शहरात स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला असून, प्रत्येक जिल्ह्यात असा एक कक्ष स्थापन करण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी दिली.
****

 अनाथांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. काल विधानसभेत बच्चू कडू यांनी राज्यातल्या अनाथ बालकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना त्या बोलत होत्या. या मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियानांतर्गत प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवण्यात येणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****

 खटले सुरू असणाऱ्या आणि दोषी ठरलेल्या व्यक्तींची वाढती संख्या लक्षात घेत राज्यात तीन नवीन तुरुंग उभारण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्य मंत्री रणजीत पाटील यांनी काल विधानसभेत दिली. यवतमाळ, गोंदिया आणि अहमदनगर इथे हे तुरुंग उभारले जाणार आहेत.

 औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन करतांना संबंधित शेतकऱ्यांना चौपट मोबदला देण्यासाठी, वाटाघाटीनं दर ठरवण्याची आणि संमतीशिवाय भूसंपादन न करण्याची तरतूद असलेलं विधेयक काल विधानसभेत मंजूर झालं.

 दुष्काळी भागातल्या चारा छावण्या १ ऑगस्टपर्यंतच सुरू ठेवणं आणि टँकरनं पाणी पुरवठ्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत झाला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत ही माहिती दिली.
 राज्यातले अडीच कोटी, सात बारा उतारे संगणकीकृत झाले असून त्यापैकी ८० लाख उताऱ्यांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी झाल्याचंही त्यांनी यावेळी दिली.
****

 बुलडाणा जिल्ह्यातल्या ऐतिहासिक लोणार सरोवराच्या समस्यांबाबत स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत सांगितलं. वन्य प्राण्यांमुळे शेतीच्या नुकसानाची भरपाई १५ दिवसांत नाही मिळली तर  ती व्याजासह दिली जाईल, असं मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत सांगितलं.
****

 दूध भेसळी विरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या. दूध भेसळीला सहकार्य करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांविरूद्ध कारवाई केली जाईल, असं त्यांनी काल मुंबईत स्पष्ट केलं. राज्यात्या दूध स्थीतीबाबत अन्न प्रशासन विभागाच्या अधिकार्यांबरोबर विधानभवनातल्या दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

मराठा आरक्षणासाठी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी काल सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केलं. मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षण वैध ठरवल्यानंतर, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाण्याची शक्यता असल्यानं कॅव्हिएट दाखल केल्याचं पाटील यांनी सांगितलं. यामुळे, आता मराठा आरक्षणाविरोधात कोणीही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली, तरी न्यायालय आधी विनोद पाटील यांची बाजू ऐकेल.
****

 मुंबई स्टॉक एक्सचेंजनं हळद व्यापारात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर, या एक्सचेंजमार्फतच्या हळद व्यापाराला काल सांगली इथून सुरुवात करण्यात आली. देशातले चार कोटी ग्राहक ऑनलाईन पद्धतीनं या व्यवहारात आता सहभागी होऊ शकतील.
****

 राज्यात पावसाशी निगडित घटनांमध्ये वीस जणांचा मृत्यू झाला. पुण्यात एका गृहनिर्माण संस्थेची संरक्षक भिंत कोसळून पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली. मुंबईत पावसाशी संबंधित अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले, नांदेड जिल्ह्यात उमरी इथं एका महिलेसह तिच्या सहा वर्षीय मुलाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. दरम्यान, नांदेडसह जालना तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात काल चांगला पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असल्याचं वृत्त आहे. औरंगाबाद शहर आणि परिसरातही काल दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
****

 यवतमाळ जिल्ह्यातल्या कोसदनी घाटात रस्ता वाहून गेल्यानं नागपूर तुळजापूर राज्य महामार्ग बंद झाल्याचं वृत्त आहे. काल पहाटेच्या सुमारास उमरखेड तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर कोसदनी घाटातला नाला दुथडी भरून वाहत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरुवात होत आहे. शून्य टक्के पाणी साठा असलेल्या भंडरदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यानं, नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
****

 खरीप हंगामासाठी जालना जिल्ह्यात आतापर्यंत राष्ट्रीयीकृत बँका तसंच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून चोवीस हजारांहून अधिक शेतकऱ्यांना एकशे अट्ठावन्न कोटी साठ लाख रुपये खरीप पीककर्ज वाटप करण्यात आलं आहे. जिल्ह्याला एक हजार पन्नास कोटी रुपये पीककर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना कर्ज वाटपाची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या आहे.
****

 निराधारांना महिन्याला तीन हजार रुपये मानधन द्यावं या आणि अन्य मागण्यांसाठी निराधार संघर्ष समितीच्यावतीनं काल लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून निराधार तसंच दिव्यांमोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. निराधारांसाठी दारिद्र्य रेषेची अट रद्द करावी, अपंगत्वासाठीचं वैद्यकीय प्रमाणपत्र तालुकास्तरावर देण्यात यावं या प्रमुख मागण्यांचं निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आलं.
****

 औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड, सोयगाव तालुक्यातल्या सिंचन प्रकल्पांची कामं तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. काल औरंगाबाद इथं फुलंब्री तालुक्यातल्या सांजूळ लघु तलाव तसंच कन्नड तालुक्यातल्या प्रस्तावित नेवपूर आणि जामडी धरणासह विविध कामांचा आढावा कराड यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. सर्वांनी पाणी वापराचं योग्य नियोजन करावं, असं आवाहन कराड यांनी केलं आहे.
****

 झारखंडमध्ये जमावाच्या मारहाणीत एका इसमाचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ काल मराठवाड्यात ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. औरंगाबाद, परभणी, हिंगोली इथं  नागरिकांनी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन सादर केलं.
****

 परभणी शहरात अनेक ठिकाणची अतिक्रमणं हटवण्यात आली आहेत. स्वछता मोहिमेअंतर्गत नाल्यांवरची अतिक्रमणं काढण्याचे आदेश महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
****

 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघानं काल श्रीलंकेचा नऊ गडी राखू न पराभव केला. श्रीलंकेनं दिलेलं दोनशे चार धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेनं सदतिसाव्या षटकांत एक गडी गमावून पार केलं.

दरम्यान, या स्पर्धेत आज पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड असे दोन सामने होणार असून, उद्या भारत आणि यजमान इंग्लंड संघात सामना होणार आहे.
*****
***