Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 January 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 January 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जानेवारी २०२१ सायंकाळी ६.१०

****

** देशात बनवलेली कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लस देशाच्या आत्मनिर्भरतेचं प्रतिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी

**राज्यात पाच वर्षांत एक लाख सूक्ष्म आणि लघूउद्योग प्रस्थापित करण्याचं उदिष्ट - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन  

**जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे नवे २९ रुग्ण तर औरंगाबादमध्ये एका रुग्णाचा मृत्यू

आणि

**गझलकार इलाही जमादार यांचं निधन

****

देशात बनवलेली कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लस आज देशाच्या आत्मनिर्भरतेची प्रतिक आहे तसंच देशाच्या आत्मसन्मानाचंही प्रतिक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमाच्या ७३व्या भागामध्ये देशवासियांशी संवाद साधताना ते आज बोलत होते. आता आपला लसीकरण कार्यक्रम जगात एक उदाहरण ठरत आहे. आपण सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाबरोबरच जगात सर्वाधिक वेगानं आपल्या नागरिकांचं लसीकरणही करत आहोत. कोरोना विषाणू संसर्गानं जी परिस्थिती निर्माण केली त्याचा सामना करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अशी विलक्षण कामं झाली असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करताना पंतप्रधानांनी विविध उदाहरणं दिली. `माय गोव्ह` या संकेतस्थळावर जालन्याचे डॉक्टर स्वप्नील मंत्री यांनी रस्ते सुरक्षे विषयी चर्चा करण्याचा आग्रह केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या महिन्यात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान रस्ते सुरक्षा महिना साजरा केला जात असल्याचं आणि देशात रस्ते सुरक्षेसाठी सरकारच्या बरोबरीनं वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदी यांनी सूचनांचा उल्लेख केल्याबद्दल डॉक्टर मंत्री यांनी पंतप्रधानांचं आभार मानलं आहे.  

 

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘मन की बात’ साठी मी रस्त्याची सुरक्षा एवंम ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ संबंधी मी काही सूचना व स्लोगन पाठविले होते. आजच्या ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधानांनी रस्त्याच्या सुरक्षेसंबंधी माझ्या सूचनांचे सर्व नागरिकांना आवाहन केले. त्याबद्दल मी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे आभार एवंम धन्यवाद व्यक्त करतो. आज ‘मन की बात’ मध्ये माझ्या सारख्या सामान्य नागरिकाच्या सूचनांचा उल्लेख करुन माननीय पंतप्रधानांनी मन की बातला ‘जन जन की बात’ करुन दाखवले. त्याबद्दल मला त्यांचा अभिमान आहे. आणि मी त्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो.

****

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम हा राज्यशासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून पाच वर्षात एक लाख सूक्ष्म आणि लघूउद्योग प्रस्थापित करण्याचं उदिष्ट असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. आज बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान इथं मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमा अंतर्गत 'माझा व्यवसाय, माझा हक्क' या उपक्रमाची सुरुवात पवार यांच्या उपस्थितीत झाली, त्यावेळी ते बोलंत होते. या योजनेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद करण्यात येईल, रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय आढावा आणि समन्वयन समिती स्थापन करण्यात आली असून उत्पादन, सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसायांमध्ये युवकांना आणि युवतींना संधी मिळतील असं उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलं.

****

नाशिक इथं २६ ते २८ मार्च दरम्यान होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाला ज्ञानपीठ विजेते कवी आणि साहित्यिक  कुसुमाग्रज यांचं नाव देण्यात आलं आहे. संमेलन स्थळाला कुसुमाग्रज नगरी असं संबोधलं जाणार आहे. आज नाशिक शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटी इथं नाशिकचे पालकमंत्री तसंच संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. आपण नव्हे तर समस्त नाशिककर स्वागताध्यक्ष असल्याचं समजून संमेलन यशस्वी करावं असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमेलनासाठी ५० लाख रुपयांचं अनुदान दिल्याबद्दल भुजबळ आणि आयोजक लोकहितवादी मंडळान मुख्यमंत्री ठाकरे यांच आभार मानल आहे. संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण आणि घोषवाक्याचं प्रकाशनही आज करण्यात आलं.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात २९ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १३ हजार ७४९ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या २ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले १३ हजार १५९ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या बाधित असलेल्या २२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात या संसर्गानं झालेल्या एकूण मृतांची संख्या आता ३६७ झाली आहे.

****

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शहरातल्या एन आठ इथल्या एका ६३ वर्षीय कोरोना विषाणू बाधित महिलेचा आज मृत्यू झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता एक हजार २३८ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण कोराना बाधितांची संख्या ४६ हजार ९५५ झाली आहे.

****

औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचा आज राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. त्यांनी कोरोना विषाणू संसर्ग काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावेडकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

****

देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्यात आली. औरंगाबाद महापालिकेतर्फे सिडको एन - आठ रुग्णालय इथं या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. आरोग्य उप संचालक डॉ. जी. एम. गायकवाड यावेळी प्रमुख उपस्थित होते. परभणी शहर महानगरपालिकेच्यावतीनं उपमहापौर भगवान वाघमारे, स्थायी समितीचे सभापती गुलमीर खान आणि उपायुक्त प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते पोलिओची लस देत या उपक्रमाचा प्रारंभ झाला. नांदेड तालुक्यात धनेगाव परिसरातल्या विटभट्टी कामगारांच्या लहान बालकाला जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर आणि नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर यांच्या हस्ते लस देऊन मोहिम सुरू करण्यात आली.

****

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ या तालुक्यांतल्या ४० गावांमध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता तीन पुर्णांक दोन रिश्टर स्केल होती. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत, औंढा नागनाथ तालुक्यात मागील काही दिवसापासून भूगर्भातून मोठ आवाज येत होता. दरम्यान, काल मध्यरात्रीच्या भूकंपामुळे जिल्ह्यात कुठेही मोठी हानी झाली नसल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षानं म्हटलं आहे. या भागामध्ये तातडीन पाहणी करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत.

****

मराठी गझलेला शिखरावर नेणारे सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं आज सांगलीमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं, ते ७५ वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातल्या दुधगाव इथं जमादार यांचा १ मार्च १९४६ रोजी जन्म झाला झाला होता. जमादार यांनी १९६४ पासून काव्यलेखन सुरू केलं. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांनी कार्यक्रम केले. मराठी, हिंदी, उर्दू आदी दैनिकं आणि मासिकांसाठी इलाही जमादार यांनी कविता आणि गझल लिहिल्या. ते नवोदित कवींसाठी `इलाही गझल क्लिनिक` नावाची गझल कार्यशाळाही घ्यायचे.`वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे`, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे’ `घर वाळूचे बांधायाचे, स्वप्न नसे हे दिवान्याचे` या त्यांच्या गझला चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरल्या.

****

कष्टकरी, शेतकरी आणि सत्ताधारी यांच्यात संवाद उरलेला नसून याचं चित्रण निर्भीडपणे साहित्यातून आलं पाहिजे, अशी अपेक्षा नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातल्या सिंधी या गावी आयोजित पंधराव्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भगवान अंजनीकर यांनी आज संमेलन उदघाटनावेळी व्यक्त केली. संमेलनाचे उद्घाटन राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी केल. या साहित्य संमेलनात विरभद्र मिरेवाड यांच्या "माती शाबूत राहावी म्हणून" या कविता संग्रहाचं तर माधव चुकेवाड यांच्या गोडधोड या बालकाव्य संग्रहाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.

****

नवे कृषी कायदे म्हणजे केंद्र सरकारनं शेतमाल बाजार सुधारणा आणि खुलीकरणाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल असल्याचं शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी, ललित बहाळे, गुणवंत हंगरगेकर, दिनेश शर्मा यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं. खासगी खरेदीदारावर आधारभूत किंमतीनं शेतमाल खरेदी करण्याचं कायदेशीर बंधन घालण्याची तरतूद व्यवहारात निरुपयोगी ठरत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. देशात यावर सुरू आंदोलकांनी याचा पुनर्विचार करावा, असं ते म्हणाले.

//************//

 

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 January 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जानेवारी २०२१ दुपारी १.०० वा.

****

देशात बनवलेली कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लस आज देशाच्या आत्मनिर्भरतेची प्रतिक आहे तसंच देशाच्या आत्मसन्मानाचंही प्रतिक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमाच्या ७३व्या भागामध्ये देशवासियांशी संवाद साधताना ते आज बोलत होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या विरोधातल्या आपल्या लढ्याला जवळपास एक वर्ष पूर्ण झालं असून ज्याप्रमाणं, आपली ही लढाई एक उदाहरण म्हणून समोर आली, तसंच, आता आपला लसीकरण कार्यक्रम हा ही जगात एक उदाहरण ठरत आहे. आपण सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाबरोबरच जगात सर्वाधिक वेगानं आपल्या नागरिकांचं लसीकरणही करत आहोत. केवळ १५ दिवसांमध्ये, देशानं आपल्या ३० लाखांहून अधिक, ‘कोरोना योद्ध्यांचं’ लसीकरण केलं असून अमेरिकेसारख्या समृद्ध देशातही, या कामासाठी १८ दिवस लागले होते, असं त्यांनी यावेळी नमुद केलं. कोरोना विषाणू संसर्गानं जी परिस्थिती निर्माण केली त्याचा सामना करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अशी विलक्षण कामं झाली असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करताना पंतप्रधानांनी यावेळी विविध उदाहरणं दिली. कृषी क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे विविध प्रयोग सुरू आहेत. हे प्रयोग नवोन्मेषाची उर्मी तर दर्शवतातच, पण त्याच बरोबर हे ही दाखवतात की आपल्या देशातलं कृषिक्षेत्र कसा नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करत आहे. शेतीला आधुनिक बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे आणि अनेक पावलं उचलत आहे. सरकारचे प्रयत्न यापुढेही असेच सुरू राहतील, असं पंतप्रधान म्हणाले. ‘माय गोव्ह’ या संकेतस्थळावर जालन्याचे डॉक्टर स्वप्नील मंत्री यांनी रस्ते सुरक्षे विषयी चर्चा करण्याचा आग्रह केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या महिन्यात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान रस्ते सुरक्षा महिना साजरा केला जात असल्याचं आणि देशात रस्ते सुरक्षेसाठी सरकारच्या बरोबरीनं वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. आपला जीव वाचवण्यासाठी असलेल्या या प्रयत्नांमध्ये आपल्याला सर्वांनाच आपलं सक्रिय योगदान दिलं पाहिजे, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. ‘फास्टॅग’ च्या उपयुक्ततेची माहिती त्यांनी यावेळी दिली. आपल्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीचा समारंभ- अमृतमहोत्सव आपण सुरू करत आहोत. अशातच, आपल्या त्या महानायकांशी संबंधित स्थानिक स्थळांचा शोध घेण्याचा हा उत्कृष्ट काळ असल्याचं त्यांनी नमूद केलं. खासकरून युवक मित्रांनी देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल, स्वातंत्र्याशी संबंधित घटनांबद्दल लिहावं. आपल्या भागातल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातल्या वीरगाथांबद्दल पुस्तक लिहावं, असं पंतप्रधानांनी सुचवलं. या महिन्यात, क्रिकेटच्या मैदानातूनही खूप चांगली बातमी मिळाली. आपल्या क्रिकेट संघानं सुरूवातीच्या अडचणींनंतर, शानदार पुनरागमन करत, ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका जिंकली. आपल्या खेळाडुंची कठोर मेहनत आणि सांघिक वृत्ती ही प्रेरित करणारी असल्याची प्रशंसा पंतप्रधानांनी केली. हे सर्व घडत असताना, दिल्लीत, २६ जानेवारीला तिरंग्याचा अपमान झालेला पाहून, देश, अत्यंत व्यथित झाल्याचं ते म्हणाले. आपल्याला आगामी काळ हा नवीन आशा आणि नाविन्यानं भरून टाकायचा आहे. गेल्या वर्षी आपण असामान्य संयम आणि धाडसाचं प्रदर्शन घडवलं होतं. यावर्षीही आपल्याला कठोर मेहनत करून आपल्या संकल्पांची पूर्तता करायची आहे. आपल्या देशाला आणखी वेगानं पुढं न्यायचं असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.

****

देशभरातली चित्रपटगृहं फेब्रुवारी महिन्यापासून पूर्ण क्षमतेनं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून चित्रपटांच्या तिकिटांच्या ‘ऑनलाईन’ नोंदणीस प्रोत्साहन द्यावं असं जावडेकर यांनी म्हटलं आहे. चित्रपटात दोन मध्यांतर असावेत, तसंच कोरोना विषाणू प्रतिबंधाच्या निकषांचं पालन करणं आवश्यक असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.

****

नाशिक इथं होणाऱ्या नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण आणि घोषवाक्याचं प्रकाशन आज नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. ‘अनंत अमुची ध्येयासक्ती’ हे घोषवाक्य निश्चित करण्यात आलं आहे. यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेसाठी ५६ जणांनी पाठवलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्यातून कोल्हापूर इथल्या अनंत गोपाळ खासबारदार यांनी तयार केलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याची निवड करण्यात आली.

****

देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवली जात आहे. सोलापूर, रायगड, वाशिम, नाशिक, जिल्ह्यांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागात शून्य ते पाच वर्षे वयाच्या बालकांना पोलिओचे डोस दिले जात आहेत.  

****

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 January 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जानेवारी २०२१ सकाळी ७.१० मि.

****

·      सुधारित कृषी कायदे स्थगितीचा सरकारचा प्रस्ताव कायम; पंतप्रधानांचं प्रतिपादन.

·      संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यंदा ३३ विधेयकं सादर होणार.

·      आज पोलिओ रविवार; शून्य ते पाच वर्षाच्या बालकांसाठी पोलिओ लसीकरण अभियान.

·      राज्यात ९५ पूर्णांक २३ शतांश टक्के रुग्ण कोविडमुक्त; मराठवाड्यात नव्या १७३ रुग्णांची नोंद.

·      पर्यावरणपूरक सौर ऊर्जेला प्राधान्य देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार.

·      मराठवाडा वॉटरग्रीड योजनेला स्थगिती देऊ नये - माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची मागणी.

आणि

·      जालना जिल्ह्यात महिला सरपंच पदासाठी उद्याची नियोजित आरक्षण सोडत लांबणीवर.

****

सुधारित कृषी कायदे दीड वर्ष स्थगित करण्याबाबत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेला प्रस्ताव अजूनही कायम असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते. कृषी कायद्यांसंदर्भात आंदोलकांशी चर्चेचे सर्व पर्याय खुले आहेत, त्यासाठी आंदोलकांनी कृषी मंत्र्यांना फक्त एक फोन करणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. प्रजासत्ताक दिनी झालेल्या दुर्दैवी घटनांबाबत कायदा आपलं काम करेल, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. विविध पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर सदनात चर्चेला सरकार तयार आहे, मात्र त्यासाठी सदनाचं कामकाज सुरळीत चालण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी व्यक्त केली. सदनाच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आल्यानं, छोट्या पक्षांना आपली मतं मांडता येत नसल्याकडे त्यांनी या बैठकीत लक्ष वेधलं. गांधीजींची स्वप्नं पूर्ण करण्याच्या दिशेने सर्वांनी मार्गक्रमण करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

****

उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज राज्यसभेतल्या सभागृह नेत्यांची बैठक बोलावली आहे. उपराष्ट्रपती भवनात होणाऱ्या या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन तसंच संबंधीत विधेयकं आणि अन्य महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यंदा ३३ विधेयकं सादर होणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल ही माहिती दिली. यापैकी चार विधेयकं अध्यादेशांना कायदेशीर रुप देण्यासाठी असतील, अशी माहिती त्यांनी दिली. अर्थसंकल्प उद्या सोमवारी सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर होणार आहे. दोन टप्प्यात होणाऱ्या या अधिवेशनाचा पहिला टप्पा १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, दुसरा टप्पा ८ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान होणार आहे.

****

या अर्थसंकल्पात आरोग्य सेवांसाठीच्या तरतुदीत वाढ करावी, अशी अपेक्षा मुंबईतील कूपर रुग्णालयातल्या भूलतज्ज्ञ डॉ. नयना दळवी यांनी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या –

कमीत कमी तीन ते चार टक्के एवढा भागतरी हेल्थ केअर सेक्टरला देण्यात यावा. वाढत्या लोकसंख्येकरता वैद्यकीय महाविद्यालये आणि सर्वसाधारण रुग्णालये यांची संख्या वाढवण्यात आली पाहिजे. जीवनावश्यक वैद्यकीय उपकरणांना जीएसटी मधून सुट मिळावी. आयुष्यमान भारत सारख्या विमा योजना तळागळातल्या जन सामान्यांपर्यंत पोहचल्या पाहिजेत जेणेकरुन प्रत्येक नागरिकासाठी वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होईल. आरोग्य विमा योजनेला प्रोत्साहन देण्याकरता त्याची मर्यादा वाढवली पाहिजे. त्याचप्रमाणे मेडिकल टुरिझमला प्रोत्साहन मिळाल्यास प्रायव्हेट हॉस्पिटल्स आपलं योगदान व्यवस्थितरित्या देऊ शकतील.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७३व्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभर त्यांना अभिवादन करण्यात आलं. हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून पाळण्यात येतो. मुंबईत राजभवनात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.

गांधीजींच्या पुण्यतिथीच्या अनुषंगानं औरंगाबाद इथं, काँग्रेस सेवादलाच्या वतीनं शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ, एक दिवसीय उपोषण करण्यात आलं. काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या उपोषणात सहभागी झाले. मराठवाड्यात सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयं तसंच शैक्षणिक संस्थांमधून गांधीजींना आदरांजली अर्पण करण्यात आली.

****

आज पोलिओ रविवार. शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या सर्व बालकांना आज पोलिओ डोस दिला जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल राष्ट्रपती भवनात काही बालकांना पोलिओ लसीचे डोस देऊन या मोहिमेचा प्रतिकात्मक शुभारंभ करण्यात आला. देशाच्या प्रथम महिला सविता कोविंद, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पोलिओ लसीकरण मोहीम आधी १७ जानेवारीला राबवली जाणार होती, मात्र १६ जानेवारीला कोविड लसीकरण मोहीम सुरू झाल्यानं, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रपती कार्यालयाशी सल्लामसलत करून पोलिओ लसीकरण मोहीम दोन आठवडे उशीरा घेण्याचा निर्णय घेतला.

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं या पल्स पोलिओ लसीकरणासाठी सुक्ष्म नियोजन केलं आहे. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातल्या एक लाख ९८ हजार २३९ बालकांना पोलिओ डोस दिला जाणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी सांगितलं. ते म्हणाले –

एकूण ६७८ पल्स पोलिओ बुथ ठेवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शुन्य ते पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ डोस पाजवले जाणार आहेत. यापूर्वी कितीही डोस पाजले किंवा बाळ नुकतेच जन्माला आले असले किंवा बाळ किरकोळ आजारी असेल तरीही पोलिओ डोस देणं गरजेचं आहे. जी मुले ३१ जानेवरी २०२१ रोजी पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहतील त्यांना पुढील पाच दिवस गृह भेटीद्वारे पोलिओ डोस पाजवण्यात येणार आहेत.

 

लातूर जिल्ह्यात २ लाख ७७ हजार २२० बालकांना पोलिओ डोस दिले जाणार आहेत. ही मोहीम १००% यशस्वी करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७३वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

राज्यात काल १ हजार ५३५ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख २७ हजार ३३५ रुग्ण या संसर्गातून बरे झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९५ पूर्णांक २३ शतांश टक्के झाला आहे. काल राज्यभरात २ हजार ६३० नव्या बधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातल्या बाधितांची एकूण संख्या २० लाख २३ हजार ८१४ झाली आहे. राज्यात काल ४२ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. या आजारामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ५१ हजार ४२ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५२ शतांश टक्के एवढा आहे. राज्यात सध्या ४४ हजार १९९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल औरंगाबाद आणि नांदेड इथं प्रत्येकी एका कोविडबाधितांचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या १७३ रुग्णांची नोंद झाली.

नांदेड जिल्ह्यात काल ३९ रुग्ण आढळले. लातूर ३८, जालना ३२, औरंगाबाद ३०, बीड २६, हिंगोली पाच, तर परभणी जिल्ह्यात काल तीन नवे रुग्ण आढळले.  

****

राज्यात पर्यावरणपूरक सौर ऊर्जेला प्राधान्य देणार असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथं विद्युत रोहित्राच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. सौर उर्जेमुळे हानिकारक कार्बन डाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन होत नाही, तसंच शेतीला दिवसा वीज पुरवठा करता येत असल्याचं पवार म्हणाले. यावेळी उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तनपुरे यांनी यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांना महामंडळाकडून भाडे अदा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. शेती पंपाच्या थकित देयकावरील दंड माफ करुन, व्याजात सवलत देण्यात आली असल्यानं वीज देयक भरण्याचं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं.

****

मराठवाड्याची एकात्मिक पाणी पुरवठा योजना - वॉटरग्रीडला स्थगिती न देण्याची मागणी माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कडे केली आहे. मराठवाड्याचे सर्व जिल्हे आणि तालुक्यातलं पाण्याचं दुर्भिक्ष्य दूर होऊन, सर्वांना मुबलक पाणी मिळावं, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना मंजूर केली होती. ही योजना तांत्रिकदृष्ट्या योग्य नाही अशा वल्गना विद्यमान महाविकास आघाडी सरकार करत आहे. मात्र, कोणतीही शहानिशा न करता, फक्त राजकीय द्वेषापोटी ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं लोणीकर यांनी या निवेदनात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय कला महाविद्यालयाचं जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तसंच प्राध्यापक वामन चिंचोलकर यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रिंट मेकिंग कलावृत्तीचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीत भरवण्यात आलं, या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी आमदार अंबादास दानवे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार दानवे यांनी यावेळी बोलताना, महाविद्यालयाच्या रुपातला ऐतिहासिक ठेवा पुन्हा उभारण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

****

जालना जिल्ह्यात मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या ५० टक्के महिला राखीव सरपंच पदासाठी उद्या एक फेब्रुवारीला नियोजित आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. प्रशासकीय कारणास्तव आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात येत असून, पुढील तारीख कळवण्यात येईल, असं उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातल्या आठही तहसील कार्यालयात नुकत्याच निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

****

मराठी भाषेच्या जडणघडणीत संत साहित्याचं भरीव योगदान असल्याचं, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. विद्यासागर पाटंगणकर यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या, मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या समारोप सत्रात ते ऑनलाईन व्याख्यानात बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांसाठी निबंधलेखन स्पर्धेसह कविता वाचन, सामान्य ज्ञान चाचणी या स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या.

****

नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यात मनाठा इथल्या जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी, ज्योती कदम सुनेगावकर यांच्यावतीने शिक्षिका आणि विद्यार्थ्यांना मास्कचं वाटप करण्यात आलं. यावेळी त्यांनी कोविडपासून सावध राहण्यासाठी सॅनिटायझर किंवा साबणानं हात धुणं, मास्क वापरणं आणि सुरक्षित अंतर राखण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.

****

मराठवाड्यात आंतरराष्ट्रीय हवामान संशोधन केंद्र होण्याची गरज ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते काल बोलत होते. पत्रकार चंद्रसेन देशमुख, सतीश टोणगे, निळकंठ कांबळे यांना यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. पुरस्कारांचं हे दुसरं वर्ष आहे.

****

बीड जिल्ह्यात केज इथल्या आदर्श पत्रकार समितीचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार अंबाजोगाई इथले ज्येष्ठ पत्रकार विजय हमीने यांना जाहीर झाला आहे. हमीने यांनी गेल्या ४२ वर्षांच्या बातमीदारीतून विविध प्रश्नांना वाचा फोडली असून, वेगवेगळे विषय बातमीच्या माध्यमातून सर्वसामान्यांसमोर आणले आहेत.

दरम्यान, मराठी पत्रकार परिषदेच्या अंबाजोगाई तालुका शाखेच्या अध्यक्षपदी गजानन मुडेगावकर यांची, सचिवपदी विरेंद्र गुप्ता यांची तर कार्याध्यक्षपदी नागेश औताडे यांची निवड झाली आहे. ही कार्यकारणी ज्येष्ठ पत्रकार राम कुलकर्णी, हनुमंत पोखरकर आणि एम एम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करेल.

****

मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाला मुदतवाढ द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यात उदगीर इथं काल मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. नांदेड इथंही या मागणीसाठी परिषदेच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली. यासंदर्भात विविध मागण्यांचं निवेदन विभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.

****

बीड जिल्ह्यात माजलगाव परभणी मार्गावर दोन मोटार सायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. काल सायंकाळी सात वाजता हा अपघात घडला.

****

नामांकित विडीच्या नावावर बनावट विडी विकणाऱ्या आरोपीला बुलडाणा जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोंदिया इथून अटक केली आहे. सुनील गुप्ता असं या आरोपीचं नाव असून, न्यायालयानं त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संपूर्ण राज्यभरात ही बनावट विडी विकली जात असल्याप्रकरणी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

****

परभणी जिल्ह्यातल्या युवकांची कर्ज प्रकरणं निकाली काढण्यासाठी आमदार राहुल पाटील यांच्या पुढाकारातून काल बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह बँकेचे व्यवस्थापक आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या कौशल्य क्षमतेनुसार त्याला कुठलीही अट न लावता तत्काळ कर्ज देण्यात यावं, परभणी जिल्ह्यासाठी निर्धारित कर्जवाटपाचं उद्दीष्ट वेळेत पूर्ण करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. युवकांनी केलेले अर्ज, तसंच बँकांनी केलेल्या कर्ज पुरवठ्याचा यावेळी आढावा घेण्यात आला.

****

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 January 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 January 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जानेवारी २०२१ सायंकाळी ६.१०

****

** कृषी कायद्यांसंदर्भात आंदोलकांशी चर्चेचे सर्व पर्याय खुले- पंतप्रधानांचं चर्चेचं आवाहन

** संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यंदा ३३ विधेयकं सादर होणार

** पोलिओ लसीकरण मोहिमेला राष्ट्रपतींच्या हस्ते प्रारंभ; उद्या देशभरात लसीकरण अभियान

आणि

** औरंगाबाद इथल्या शासकीय कला महाविद्यालयाचं जुनं वैभव परत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत- जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही

 

****

कृषी कायद्यांसंदर्भात आंदोलकांशी चर्चेचे सर्व पर्याय खुले असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते. कृषी कायदे दीड वर्ष स्थगित करण्याबाबत कृषी मंत्र्यांनी दिलेला प्रस्ताव अजूनही कायम असून, त्यावर चर्चेचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. प्रजासत्ताक दिनी झालेल्या दुर्दैवी घटनांबाबत कायदा आपलं काम करेल, असं पंतप्रधान म्हणाले. विविध पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर सदनात चर्चेला सरकार तयार आहे, मात्र त्यासाठी सदनाचं कामकाज सुरळीत चालण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी व्यक्त केली. सदनाच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आल्यानं, छोट्या पक्षांना आपली मतं मांडता येत नसल्याकडे त्यांनी या बैठकीत लक्ष वेधलं. गांधीजींची स्वप्नं पूर्ण करण्याच्या दिशेने सर्वांनी मार्गक्रमण करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

****

उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी उद्या राज्यसभेतल्या सभागृह नेत्यांची बैठक बोलाली आहे. उपराष्ट्रपती भवनात होणाऱ्या या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन तसंच संबंधीत विधेयकं, आणि अन्य महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यंदा ३३ विधेयकं सादर होणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. यापैकी चार विधेयकं अध्यादेशांना कायदेशीर रुप देण्यासाठी असतील, अशी माहिती त्यांनी दिली. अर्थसंकल्प परवा सोमवारी सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर होणार आहे. दोन टप्प्यात होणाऱ्या या अधिवेशनाचा पहिला टप्पा १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, दुसरा टप्पा ८ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान होणार आहे.

****

राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम उद्या देशभरात राबवली जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात काही बालकांना पोलिओ लसीचे डोस देऊन या मोहिमेचं प्रतिकात्मक शुभारंभ करण्यात आला. यावेळी देशाच्या प्रथम महिला सविता कोविंद, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन, आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पोलिओ लसीकरण मोहीम आधी १७ जानेवारीला राबवली जाणार होती, मात्र १६ जानेवारीला कोविड लसीकरण मोहीम सुरू झाल्यानं, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रपती कार्यालयाशी सल्लामसलत करून पोलिओ लसीकरण मोहीम दोन आठवडे उशीरा घेण्याचा निर्णय घेतला. शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या सर्व बालकांना उद्या पोलिओ लस देऊन या रोगाचं समूळ उच्चाटन करण्यात सहभागी होण्याचं आवाहन सर्व देशवासियांना करण्यात येत आहे.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७३व्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभर त्यांना अभिवादन करण्यात आलं. हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून पाळण्यात येतो. मुंबईत राजभवनात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.

विधिमंडळात पीठासीन अधिकारी तसंच सचिवालयातल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी गांधीजींच्या स्मृतींना अभिवादन केलं. मंत्रालयाजवळच्या उद्यानातील गांधीजींच्या पूर्णाकृती पुतळ्याला, महात्मा गांधी स्मारक समितीतर्फे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

महात्मा गांधी हे फक्त व्यक्ती नसून मानवकल्याणाचा, विश्वकल्याणाचा विचार आहेत. हा विचार अमर असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिवादन संदेशात म्हटलं आहे.

गांधीजींच्या पुण्यतिथीच्या अनुषंगानं औरंगाबाद इथं, काँग्रेस सेवादलाच्या वतीनं शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ, एक दिवसीय उपोषण करण्यात आलं. काँग्रेस सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सचिव अनिल मानकापे, यांच्यासह सेवादल पदाधिकारी आणि कार्यकर्ते या उपोषणात सहभागी झाले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७३वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

 

****

औरंगाबाद इथल्या शासकीय कला महाविद्यालयाचं जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तसंच प्राध्यापक वामन चिंचोलकर यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रिंट मेकिंग कलावृत्तीचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीत भरवण्यात आलं, या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी आमदार अंबादास दानवे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध कारणामुळे या ऐतिहासिक इमारतीची जीर्णावस्था झाली आहे. महाविद्यालयाच्या नूतनीकरणाचा आराखडा तयार असून त्यात नवीन सुविधाही पुरविण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

आमदार दानवे यांनी यावेळी बोलताना, महाविद्यालयाच्या रुपातला ऐतिहासिक ठेवा पुन्हा उभारण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

****

यवतमाळ शहरातल्या रोहिलेबाबा झोपडपट्टी वस्तीत सिलेंडर चा स्फोट झाल्यानं लागलेल्या आगीत ४ घरं खाक झाली आहे. एका घरात चूल पेटविल्यानंतर सिलेंडरमध्ये गॅसची गळती होत असल्यानं आगीचा भडका उडाला. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान आगीची सूचना मिळताच नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

****

जालना जिल्ह्यात मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या ५० टक्के महिला राखीव सरपंच पदासाठी येत्या एक फेब्रुवारीला नियोजित आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. प्रशासकीय कारणास्तव आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात येत असून, पुढील तारीख कळवण्यात येईल, असं उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातल्या आठही तहसील कार्यालयात नुकत्याच निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

****

नांदेड जिल्ह्यात आज नव्याने ३९ कोरोनाविषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात कोविड रुग्णांची एकूण संख्या आता २२ हजार ५०२ झाली आहे. दरम्यान या संसर्गामुळे आज एका रूग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात या संसर्गाने दगावलेल्या रुग्णांची संख्या आता ५८६ झाली आहे. दरम्यान, संसर्गमुक्त झालेल्या ४० रुग्णांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण २१ हजार ३९४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ३१९ रुग्ण उपचार घेत आहेत.

बीड जिल्ह्यातही आज नवे २६ रुग्ण आढळून आले. यामध्ये बीड तालुक्यातल्या ९, गेवराई ४, आष्टी तसंच केज इथल्या प्रत्येकी २, अंबाजोगाई तसंच शिरुर प्रत्येकी ३, तर परळी, माजलगाव, आणि धारूर इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यात मनाठा इथल्या जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी, ज्योती कदम सुनेगावकर यांच्यावतीने शिक्षिका आणि विद्यार्थ्यांना मास्कचं वाटप करण्यात आलं. यावेळी त्यांनी कोविड पासून सावध राहण्यासाठी सॅनिटायझर किंवा साबणाने हात धुणे, मास्क वापरणे, आणि सुरक्षित अंतर राखण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं

****

१९७१ मध्ये पाकिस्तानसोबतच्या युद्धात मिळालेल्या विजयाला यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं अहमदनगर इथं सैन्य दलाच्या छावणीत एका विशेष समारंभात, या युद्धातले सैनिक तसंच वीरपत्नींचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांनी ७१च्या युद्धातले अनुभव कथन केले. वीरयोद्धे आणि त्यांनी दाखवलेल्या शौर्याचं यावेळी स्मरण करण्यात आलं.

****

परभणीहून वसमतकडे भरधाव जाणाऱ्या कारचं टायर फुटल्याने ती कार राहटी पुलावरून नदीत कोसळली, आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत कारमधील चालकासह अन्य एकजण सुरक्षित असल्याचं समजतं. आज सकाळी कारचा शोध घेऊन ती पाण्याबाहेर काढण्यात आली.

****

नामांकित विडीच्या नावावर बनावट विडी विकणाऱ्या आरोपीला बुलडाणा जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोंदिया थून अटक केली आहे. सुनील गुप्ता असं या आरोपीचं नाव असून, न्यायालयानं त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संपूर्ण राज्यभरात ही बनावट विडी विकली जात असल्याप्रकरणी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

//*************//