Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 31.12.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  31 December 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ डिसेंबर २०२२    सायंकाळी ६.१०

****

·      प्रधानमंत्री जनऔषधी योजनेमुळे गेल्या आठ वर्षांत नागरिकांच्या औषधांच्या खर्चात सुमारे १८ हजार कोटी रुपयांची बचत.

·      टपाल कार्यालयातल्या विविध अल्पबचत योजनांवरच्या व्याज दरात उद्यापासून वाढ.

·      औरंगाबाद पासपोर्ट सेवा केंद्र आता कॅम्प मोडमधून ऑनलाइन मोडमध्ये अपग्रेड होणार.

आणि

·      सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साह.

****

प्रधानमंत्री जनऔषधी योजनेमुळे गेल्या आठ वर्षांत नागरिकांच्या औषधांच्या खर्चात सुमारे १८ हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. केंद्रीय खतं आणि रसायन मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. चालू आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत नागरिकांनी ७५८ कोटी रुपयांची औषधं खरेदी केली, त्यातही नागरिकांची सुमारे साडे चार हजार कोटी रुपये बचत झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. देशभरातल्या ७४३ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत नऊ हजारांहून अधिक जनऔषधी केंद्र सुरू करण्यात आले असून, २०२५ पर्यंत ही संख्या साडे दहा हजारावर नेण्याचं उद्दीष्ट असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे.

****

‘गोटपॉक्स’ आणि ‘लंपी प्रोव्हॅक’ या लंपी प्रतिबंधक लसींचे व्यावसायिक उत्पादन करण्यासाठी केंद्रीय मत्स्यसाठे, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रुपाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर इथं सामंजस्य करार करण्यात आला. पुण्यातल्या ‘आयव्हीबीपी आणि उत्तर प्रदेशातील ‘आयसीएआर’यांच्यात हा करार करण्यात आला. ‘लंपी प्रोव्हॅक’ लसीच्या व्यावसायिक उत्पादनासाठी भारत सरकारच्या एग्रिनोवेट इंडिया लिमिटेड कंपनीने सामंजस्य कराराद्वारे आयव्हीबीपीला ठराविक अधिकार दिले आहेत.

****

कॅथलिक चर्चचे माजी पोप बेनेडिक्ट १६ वे यांचं आज दीर्घ आजारपणामुळे निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. २००५ मध्ये तत्कालीन पोप जॉन पॉल यांच्या निधनानंतर बेनेडिक्ट यांची पोप पदी निवड झाली होती. आठ वर्षे या पदावर राहिल्यानंतर त्यांनी आजारपणामुळे पदाचा राजीनामा दिला होता. ६०० वर्षांच्या इतिहासात पदाचा राजीनामा देणारे बेनेडिक्ट हे पहिलेच पोप होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप बेनेडिक्ट यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

****

चीनने आठ जानेवारीपासून आपल्या सीमा पूर्णपणे खुल्या करणार असल्याचं म्हटलं आहे. कोविडची वाढती प्रकरणं असूनही प्रवासी निर्बंध कमी करण्याच्या चीनच्या निर्णयानंतर भारतासह अनेक देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड चाचण्या अनिवार्य केल्या आहेत. चीन मधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्याच्या अनेक देशांच्या निर्णयाचं जागतिक आरोग्य संघटनेनं समर्थन केलं आहे. संघटनेनं चीन सरकारला कोविड संदर्भात खरी परिस्थिती स्पष्ट करण्यास सांगितलं आहे.

****

कृषी आणि प्रक्रिया-युक्त खाद्य उत्पादनांच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्कयांनी वाढ झाली असल्याचं वाणिज्य गुप्तवार्ता आणि सांख्यिकी महासंचालकांनी दिलेल्या अंदाजित आकडेवारीनुसार सांगण्यात आलं आहे. प्रक्रिया युक्त फळे आणि भाज्यांनी ३२ पूर्णांक साठ टक्के वाढ नोंदवली, तर ताज्या फळांनी मागील वर्षाच्या याच महिन्यांच्या तुलनेत चार टक्के वाढ नोंदवली. चालू आर्थिक वर्षाच्या आठ महिन्यांत डाळींच्या निर्यातीत नव्वद पूर्णांक एकोणपन्नास टक्के इतकी वाढ झाली आहे.

****

चालू आर्थिक वर्षात उद्यापासून सुरू होत असलेल्या अखेरच्या तिमाहीपासून केंद्र सरकारने टपाल कार्यालयातल्या विविध अल्पबचत योजनांवरच्या व्याजदरात वाढ केली आहे. पाच वर्ष मुदतीच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर ६ पूर्णांक ८ दशांश टक्क्यांवरून ७ टक्के तर, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदरही ७ पूर्णांक ६ दशांश टक्क्यांवरून ८ टक्के इतका झाला आहे. मासिक उत्पन्न बचत खात्यावरील व्याजदार आता ७ पूर्णांक १ दशांश टक्के इतका करण्यात आला आहे. यासोबतच किसान विकास पत्रासाठीही आता १२० महिन्यांच्या मुदतीसह ७ पूर्णांक २ दशांश टक्के असा वाढीव दर लागू करण्यात आला आहे. याचप्रमाणे एक वर्ष मुदतीच्या अल्पबचत ठेवींसाठीचा व्याजदरही ५ पूर्णांक ५ दशांश टक्क्यांवरून ६ पूर्णांक ६ दशांश टक्क्यापर्यंत वाढवला आहे. दरम्यान, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी खाते आणि बचत ठेवींवरच्या व्याजदरात कोणतेही बदल केले नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

****

नागरिकांनी आपला आधार कार्ड क्रमांक कोणालाही सांगू अथवा देऊ नये, तसंच सार्वजनिकरीत्या तो जाहीर करू नये, तसंच कोणत्याही समाज माध्यमावर त्याबाबत माहिती देऊ नये, असा सल्ला, विशिष्ट ओळख प्राधिकरणानं दिला आहे. आधार कार्ड धारकांनी कोणत्याही अनधिकृत संस्थेला आपला ओ टी पी देऊ नये, त्याचप्रमाणे एम आधार पिन कोणालाही देणं टाळावं, असं आवाहन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं केलं आहे.

****

विधीमंडळ हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कोल्हापूर इथं आज निदर्शनं करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करून पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. यावेळी भाजपा प्रवक्ते अजित ठाणेकर आणि सरचिटणीस हेमंत आराध्ये यांच्यासह कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. 

****

औरंगाबाद इथलं पासपोर्ट सेवा केंद्र आता कॅम्प मोडमधून ऑनलाइन मोडमध्ये अपग्रेड होणार आहे. प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ.राजेश गवांडे यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राला दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली. या प्रक्रियेला आणखी गती देण्यात येणार असल्याचं डॉ गवांडे यांनी या पत्रातून कळवलं आहे. हा बदल झाल्यानंतर औरंगाबाद इथून दररोज ८० ऐवजी किमान २०० नागरिकांचे पासपोर्ट अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

****

आजच्या सूर्यास्तासह सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जगभरात नागरिकांमधून उत्साह दिसून येत आहे. नववर्ष आगमनाच्या शुभेच्छा संदेशांची देवाणघेवाणही सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलिया खंडात न्यूझीलंड इथं नागरिकांनी नवीन वर्षाचं नयनरम्य रोषणाई तसंच आतषबाजी करून जल्लोषात स्वागत केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन आनंद, ध्येय, प्रेरणा आणि मोठे यश घेऊन येईल. हे नवीन वर्ष प्रगती आणि भरभराटीचे ठरो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. देशाची एकता, अखंडता आणि सर्वसमावेशक विकासासाठी स्वत:ला समर्पित करण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे.

****

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. हा आनंदाचा प्रसंग विकासाची गती सुनिश्चित करण्यासाठी आपले प्रयत्न अधिक जोमाने टिकवून ठेवण्याची संधी असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. देशाला प्रगती आणि समृद्धीच्या नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प करून नवीन वर्षाची सुरुवात करण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी जनतेला केलं.

****

राज्यातल्या देवस्थानांच्या ठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर, कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर, अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे.

शिर्डीत आज पहाटेपासूनच साई भक्तांची मोठी गर्दी दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यासह देशभरातून भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. सगळ्या भक्तांना साईदर्शन घेता यावं यासाठी आज रात्रभर साई मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थाननं घेतला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात शेगाव संत नगरीतही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे शेगाव नगरीला मोठ्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी मंदिर परिसरात भाविकांची अलोट गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे सप्तशृंगी मंदिर संस्थानकडून चोवीस तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात येत आहे.

औरंगाबाद इथं सायंकाळी साडेसहा वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत पावणे सहाशे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मद्यपी वाहनचालकांवर देखरेख ठेवण्यासाठी ११ ठिकाणी वाहनचालकांची तपासणी करण्यात येईल. अधिकृत रेस्टॉरंट्स, बार आणि हॉटेल्स उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

****

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.12.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 31 December 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३१ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यासह देशभरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु आहे. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या उत्साहानं तयारी करत असल्याचं, आणि त्याकरता पर्यटन स्थळी जात असल्याचं चित्र जागोजागी दिसत आहे. मात्र या उत्साहाला कोणतंही गालबोट लागू नये, तसंच नागरिकांची कोणतीही अडचण होऊ नये यासाठी प्रशासनानंही खबरदारी घेतली आहे. औरंगाबाद इथं सायंकाळी साडे सहा वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत सुमारे पावणे सहाशे पोलिस बंदोबस्तावर तैनात असतील. मद्यपी वाहनचालकांवर देखरेख ठेवण्यासाठी ११ ठिकाणी वाहनचालकांची तपासणी करण्यात येईल. अधिकृत रेस्टॉरंट्स बार आणि हॉटेल्स उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

 

राज्यातल्या देवस्थानांच्या ठिकाणी देखील सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नगरीकांनी गर्दी केली आहे. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर, शिर्डीचं साई मंदिर, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे.

शिर्डीत आज पहाटेपासूनच साई भक्तांची मोठी गर्दी दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. सगळ्या भक्तांना साईदर्शन घेता यावं यासाठी आज रात्रभर साई मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थाननं घेतला आहे.

****

भीमा - कोरेगाव इथं उद्या एक जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतूक, आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून उद्या रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश, पुणे शहराचे वाहतूक पोलीस उपायुक्त  विजयकुमार मगर यांनी जारी केले आहेत. वाहनतळापासून विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

****

देशात एक लाख ५० हजार  आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रे कार्यरत झाली आहेत. ही कामगिरी निर्धारित तारखेपूर्वीच साध्य करण्यासाठी देशाने केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आणि ही केंद्रे देशभरातल्या सर्व नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा सहजतेने उपलब्ध करण्यात आणि त्यांचा लाभ देण्यात मोलाची भूमिका बजावतील, असं सांगितलं. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी या कामगिरीबद्दल देशाचं अभिनंदन केलं आणि निर्धारित केलेले हे लक्ष्य भारताने साध्य केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

****

देशात काल कोरोना विषाणूचे नवे २२६ रुग्ण आढळले, तर १७९ रुग्ण बरे झाले. काल देशात या आजाराने एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. देशात सध्या तीन हजार ६५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, काल ९१ हजार ७३२ नागरीकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. देशात आतापर्यंत लसीच्या २२० कोटी दहा लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.

****

चीननं आपलं शून्य-कोविड धोरण शिथिल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना कोविड चाचणी बंधनकारक करणाऱ्यांमध्ये आता फ्रान्स, स्पेन, दक्षिण कोरिया आणि इस्रायल हे देशही सामील झाले आहेत.

****

खेलो इंडिया २०२२ युवक युवती क्रीडा स्पर्धेअंतर्गत हॉकीमध्ये, पुरुष गटात मध्य प्रदेशनं ओडिशाचा सहा - पाच असा पराभव करून पात्रता स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. मध्य प्रदेश, ओडिशा, हरियाणा आणि झारखंड पुढील वर्षी मध्य प्रदेशात होणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. हरियाणाच्या महिला संघानं काल भुवनेश्वर इथं झालेल्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशचा दोन - शून्य असा पराभव करून पात्रता फेरी जिंकली.

****

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना येत्या दोन जानेवारीपासून पुण्यात बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं राज्यात क्रीडा वातावरण निर्मिती होण्यासाठी, तसंच या स्पर्धेची भव्यता नागरिकांना माहिती होण्यासाठी राज्यात विभागनिहाय क्रीडा ज्योत फेरीचं आयोजन करण्यात येत  आहे. काल मुंबईत क्रीडा ज्योत फेरी आयोजित करण्यात आली होती. या फेरीचा प्रारंभ गेट वे ऑफ इंडिया इथून मुंबईचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर कल्याण पांढरे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर या क्रीडा ज्योतीचं काल नवी मुंबईत महानगरपालिका मुख्यालयात आगमन झालं. महापालिकेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी धनराज गरड यांनी  या क्रीडा ज्योतीचं स्वागत केलं.

****

औरंगाबाद इथल्या देवगिरी महाविद्यालयात उद्या एक जानेवारीला संशोधन विकास या विषयावर उद्बोधन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरामध्ये औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी जिल्यातील सुमारे ३०० प्राध्यापक सहभागी होणार आहेत.

****

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

केंद्र सरकारनं एक जानेवारी २०२३ पासून सुरू होणाऱ्या चालू आर्थिक वर्षातल्या चौथ्या तिमाहीसाठी विविध अल्पबचत योजनांवरच्या व्याज दरांमध्ये वाढ केली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं यासंदर्भातलं निवेदन जारी केलं. यानुसार पाच वर्ष मुदतीच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रासाठीचा व्याजदर सहा पूर्णांक आठ दशांश टक्क्यांवरून सात टक्के इतका केला आहे.

****

२०२१-२२ आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यात झालेल्या कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीच्या तुलनेत, २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतल्या निर्यातीत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सांख्यिकी महासंचालनालयाने जारी केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, या अवधीत कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीचं मूल्य अंदाजे १७ अब्ज डॉलरहून अधिक होतं.

****

पुढच्या तीन वर्षात पंचायत स्तरावर दोन लाख सहकारी समित्या स्थापन करण्याच्या निर्णयामुळे सहकार क्षेत्राचा तिपटीने विकास होण्यास मदत होण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही फायदा होईल, असं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगितलं. बंगळुरू इथं आयोजित सहकार परिषदेला ते संबोधित करत होते. दूध वितरण, साठवणूक, मत्स्यपालन, पाणी आणि गॅस पुरवठा यामध्ये या सहकारी समित्या बहुआयामी भूमिका बजावतील असंही शाह म्हणाले.

****

सागरी क्षेत्रावर निगराणी ठेवण्यासाठी तसंच संरक्षण क्षमतांमध्ये वाढ करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलानं प्रथमच दहा मल्टीकॉप्टर ड्रोनच्या खरेदीचा करार केला आहे. ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या सरकारच्या धोरणाच्या अनुषंगानंच तटरक्षक दलानं हा निर्णय घेतला आहे.

****

नागरिकांनी आपला आधार कार्ड क्रमांक कोणालाही सांगू अथवा देऊ नये, तसंच सार्वजनिकरीत्या तो जाहीर करू नये, तसंच कोणत्याही समाज माध्यमावर त्याबाबत माहिती देऊ नये, असा सल्ला, विशिष्ट ओळख प्राधिकरणानं दिला आहे. आधार कार्ड धारकांनी कोणत्याही अनधिकृत संस्थेला आपला ओ टी पी देऊ नये, त्याचप्रमाणे एम आधार पिन कोणालाही देण टाळावं, असं आवाहन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केलं आहे.

****

آکاشوانی اَورنگ آ باد علاقائی خبریں تاریخ : 31 ؍ دسمبر 2022 ؁ ء وقت : صبح 09.00 سے 09.10 بجے

 Regional Urdu Text Bulletin, Aurangabad

Date : 31 December 2022

Time : 09.00 to 09.10 AM

آکاشوانی اَورنگ آ باد

علاقائی خبریں

تاریخ  :  ۳۱؍  دسمبر   ۲۰۲۲؁ ء

وقت  :  صبح  ۹.۰۰   سے  ۹.۱۰   بجے 


چند اہم خبروں کی سر خیاں سماعت کیجیے  ... 

٭ اسمبلی کے سر ما ئی اجلاس کا اختتام  ‘  مالی بجٹ اجلاس 27؍ فروری سے ممبئی میں

٭ اجلاس کامیاب  اور  ثمر آور ہوا  ‘  وزیر اعلیٰ کا دعویٰ  تاہم  حزب مخالف کی جانب سے ناراضگی کا اظہار

٭ ریاستی ثانوی  و  اعلیٰ ثانوی تعلیمی بورڈ اِسی طرح 

CBSE 

کے دسویں  اور  بارہویں امتحا نات کا

نظام الاوقات ظاہر

٭ اورنگ آباد-  روٹے گائوں ریلوے لائن کی بر قی ریلوے کی جانچ کامیاب

اور

٭ سال نو کا استقبال کرنے کے لیے شہر ی پُر جوش ‘  انتظامیہ کا سخت بندوبست


اب خبریں تفصیل سے...

ٌٌ اسمبلی کے سر مائی اجلاس کا کَل اختتام عمل میں آ یا ۔ اسمبلی کا مالی بجٹ اجلاس 27؍ فروری2023؁ء  سے ممبئی میں شروع ہو گا ۔ دریں اثناء سر مائی اجلاس کے دوران قانون ساز اسمبلی اِسی طرح قانون ساز کونسل کی فی کس 10؍ میٹنگ ہوئی ۔ اِس میں قانون ساز اسمبلی کا جملہ84؍ گھنٹے 10؍ منٹ کا م کاج ہوا ۔12؍ بِل  اور  2؍ سر کاری تجاویز منظور کی گئی ۔ 3؍ ہدایتوں  اور36؍ سوالات پر بحث ہوئی ۔ اِس کی اطلاع اسپیکر راہُل نارویکر نے دی۔ قانون ساز کونسل میں تقریباً52؍ گھنٹے35؍ منٹ کام کاج ہوا  تاہم  سوّا پانچ گھنٹے ضائع ہوئے ۔ اِس کی اطلاع قانون ساز کونسل کی ڈِپٹی اسپیکر نیلم گورہے نے دی ۔

اجلاس کے دوران5؍ آرڈِنینس  ‘38؍ سوالات  کے جوابات دیے گئے تاہم 3؍ بِل پاس کیے گئے اِس کی اطلاع اُنھوں نے دی ۔

***** ***** ***** 

ہمار ی حکو مت مُدّت پوری کرے گی اِس کےعلا وہ باڑا صاحب کی شیو سینا  اور  بھارتیہ جنتا پارٹی اتحاد آئندہ انتخا ب میں کامیابی حاصل کرے گی ۔ ایسا تیقن وزیر اعلیٰ ایکناتھ شِندے نے ظاہر کیا ہے ۔ وہ کَل قانون ساز اسمبلی کے سر مائی اجلاس کا اختتام کرتے ہوئے مخاطب تھے ۔ ہماری حکو مت کو 6؍ ماہ مکمل ہو گئے ۔ اِن چھ ماہ میں حکو مت نے لیے گئے مختلف عوامی بہبود کے فیصلوں کا وزیر اعلیٰ نے جائزہ لیا ۔ حزب مخالف پارٹیوں کی جانب سے ہی اہم شخصیتوں کی تو ہین کی جا رہی ہیں ایسا الزام وزیر اعلیٰ نے ثبوت کے ساتھ عائد کیا ۔ بد عنوا نی کے تمام الزامات کو اُنھوں نے مسترد کر دیا ۔

***** ***** ***** 

قانون سازکونسل میں نائب وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے آخری خطبہ دیا ۔ اہم شخصیتوں کی تو ہین کرنے والوں پر قابو پانے کے لیے ایک کمیٹی قائم کی جائے گی اِس کے ذریعے سے خاطیوں پر سخت کار وائی کی جائے گی ۔ یہ بات پھڑنویس نے کہی ۔ کسانوں کو 6؍ ہزار 195؍ کروڑ کی نقصان بھر پائی دینے کی اطلاع پھڑ نویس نے دی ۔

اِسی بیچ اجلاس کا اختتام ہونے کے بعد صحافتی کانفرنس میں وزیر اعلیٰ نے کہا کہ اِس اجلاس میں نہایت اہم فیصلے کیے گئے ۔ اِس کی وجہ سے اجلاس بے حد کامیاب  اور  ثمر آور ہوا ۔ اجلاس میں وِدربھ کو بڑے پیما نے پر دِلاسہ  اور  انصاف دینے کی کوشش کی گئی ۔ یہ بات وزیر اعلیٰ نے کہی ۔

***** ***** ***** 

اہم شخصیتوں کی توہین کے معاملے میں وزیر اعلیٰ نے ہماری بات کو مکمل طور پر نظر انداز کیا ۔ ایسا الزام قانون ساز اسمبلی کے حزب مخالف پارٹی رہنما اجیت پوار نے عائد کیا ۔ قانو ن ساز اسمبلی کا کام کاج ختم ہونے کے بعد وہ صحا فیوں سے مخاطب تھے ۔ آخری تجا ویز میں پیش کیے گئے حز ب مخالف کے مسائل پر وزیر اعلیٰ نے اطمینان بخش جواب نہیں دیا ۔ یہ بات اُنھوں نے کہی ۔

***** ***** ***** 

مہا وِکاس فرنٹ کی جانب سے پریس کانفرنس میں بھی حکو مت پر تنقید کی گئی ۔ عبد الستار کا اراضی گھپلہ‘

NITاراضی گھپلہ اِس پر حسب ِ اقتدار جواب نہیں دے سکتی ۔ یہ بات اجیت پوار نے کہی ۔ یہ حکو مت کسانوں کے خلاف ہے ایسی تنقید رکانگریس ریاستی صدر نا نا پٹو لے نے کی ۔ کسانوں کو دی جا نے والی بیمہ رقم معمو لی ہے ۔ یہ بات پٹو لے نے کہی ۔

***** ***** ***** 

اقلیتی سماج کی تعلیمی پالیسی تیار کرنے کے لیے تشکیل دیے گئے اسٹڈی گروپ کی رپورٹ حاصل ہو گئی ہے ۔ اِس ضمن میں معا شی نکات کی جانچ کر کے سفا رشات قبول کی جا ئے گی ۔ یہ بات اِسکو لی تعلیمی وزیر دیپک کیسر کرنے قانون ساز کونسل میں کہی ۔ اقلیتی سماج کے تعلیمی اِداروں میں عہدوں کی بھر تی اِس تعلیمی سال کے اختتام سے قبل کی جا ئے گی ۔ایسا تیقن اُنھوں نے دیا ۔ اسا تذہ کی تنخواہیں آن لائن طریقہ کار سے راست بینک میں جمع کرنے کا طریقہ ریاستی حکو مت شروع کرے گی ۔ تنخواہیں وقت پر ادا کر نے کے لیے مزید فنڈ دیا جائے گا ۔ یہ بات کیسر کر نے کہی ۔

***** ***** ***** 

اسکو لی تعلیمی خوراک کا اکتوبر سے دسمبر تک کا التواء میں پڑا ہوا فنڈ حکو مت فوراً دیں ۔ ایسا مطالبہ قانون ساز کونسل کے حزب مخالف پارٹی رہنما امبا داس دانوے نے کَل ایوان میں کیا ۔ اِس پر کیسر کر نے کہا کہ متعلقہ کنٹراکٹر کو آف لائن طریقہ کار سے در خواست کر نے کی اجازت دی گئی ہے ۔ التواء میں پڑا فنڈ جلد تقسیم کیا جا ئےگا۔

***** ***** ***** 


اب سماعت فرمائیں ایک ضروری اعلان

آکاشوانی اورنگ آباد کی علاقائی خبررساں اکائی سے نشر ہونے والی اُردو خبروں کیلئے نیوزریڈر اور مترجم درکارہیں۔ درخواست گذارکی عمر یکم جنوری 2023 کو21؍ تا 50؍ برس کے درمیان ہونالازمی ہے۔علاوہ ازیں درخواست گذار اورنگ آباد میونسپل کارپوریشن حدود کا ساکن ہوناضروری ہے۔ بیرون شہر کے درخواست گذاروں کی درخواست پرغورنہیں کیاجائیگا۔

اس عہدے سے متعلق دیگر تفصیلات اوردرخواست فارم آکاشوانی اورنگ آباد کے نیوز یونٹ سے حاصل کیے جاسکتے ہیں۔ 

خواہشمند افراداپنی درخواست فیس کے ساتھ ’’ہیڈآف آفس آکاشوانی ،جالنہ روڈ اورنگ آباد 431005 ‘‘پر اسپیڈ پوسٹ یابذریعہ ڈاک 05؍جنوری 2023  تک بھیج سکتے ہیں۔


اعلان ختم ہوا 

***** ***** ***** 


ریاستی ثانوی  و  اعلیٰ ثانوی تعلیمی بورڈ کے دسویں  اور  بارہویں کے تحریری امتحا نات کا متوقع نظام الاوقات ظاہر کر دیا گیا ہے ۔ اِس کے تحت دسویں  کے تحریری امتحان2؍ مارچ سے 25؍ مار چ کے در میان تاہم بارہویں کے تحریری امتحان 21؍ فروری سے21؍ مارچ کے در میان لینے کا منصوبہ بورڈ نے تیار کیا ہے ۔ تفصیلی نظام الاوقات بورڈ کی ویب سائٹ maha.hscboard.in پر فراہم ہے ۔

***** ***** ***** 

مرکزی ثانوی تعلیمی بورڈ کی جانب سے لیے جانے والے جماعت دسویں  اور  بارہویں کے امتحا نات 15؍ فروری سے شروع ہو ں گے ۔ اِن امتحا نات کے تفصیلی نظام الاوقات بورڈ نے ظاہر کیے ہیں۔ یہ بورڈ کی ویب سائٹ پر فراہم ہے ۔

***** ***** ***** 

الیکشن کمیشن نے اورنگ آباد ڈویژن اساتذہ حلقہ انتخاب کے چُنائو کا پروگرام ظاہر کر دیا ہے ۔ اِس چُنائو پروگرام کے تحت آدرش ضابطہ اخلاق ظاہر کر دیا گیا ہے ۔ اِس کے پس منظر میں آدرش ضابطہ اخلاق پر سختی سے عمل در آمد کیا جا ئے ۔ ایسی اپیل ڈویژنل کمشنر سُنیل کیندریکر نے کی ہے ۔ انتخاب کے پس منظر میں سیاسی پارٹیوں کی ایک میٹنگ سے وہ مخاطب تھے ۔

***** ***** ***** 

اورنگ آباد روٹے گائوں ریلوے لائن پر بر قی ریلوے کاٹیسٹ کامیاب ہو گیا ہے ۔ کَل شام ساڑھے سات بجے روٹے گائوں سے روانہ کی گئی 10 ؍ ڈبوں کی ریلوے گاڑی بر قی لائن کے ذریعے سے صرف آدھے گھنٹے میں یعنی آٹھ بجے کے قریب اورنگ آباد پہنچ گئی ۔ اورنگ آباد ریلوے اسٹیشن پر اِس گاڑی کا پر جوش استقبال کیا گیا ۔

***** ***** ***** 

آج 31؍ دسمبر نئے سال کا استقبال کرنے کے لیے شہری بڑے پیما نے پر جوش و خروش سے تیار یاں کر رہے ہیں  اور  اِس کے لیے سیاحتی مقا مات پر جا رہے ہیں ۔ ایسا منظر دیکھا ئی دے رہا ہے  تاہم اِس خوشی میں کوئی ناخوشگوار واقعہ نہ ہو ۔ اِسی طرح شہر یوں کو کوئی دشواری پیش نہ آئیں اِس لیے انتظامیہ نے سخت بندوبست کیا ہے ۔  اورنگ آ باد میں شام ساڑھے چھ بجے سے صبح پانچ بجے تک تقریباً پونے چھ سو پولس بندوبست تعینات کیا گیا ہے ۔ شراب پی کر گاڑیاں چلانے پر نظر رکھنے کے لیے گیا رہ مقا مات پر گاڑی ڈرائیورس کی جانچ کی جا ئےگی ۔منظور شدہ ریسٹورنٹس‘ بار  اور  ہوٹلس کَل صبح پانچ بجے تک کھلی رکھنے کی اجازت دی گئی ہے ۔

***** ***** ***** 

اورنگ آباد میں ہونے والے 

G-20

؍ کانفرنس کے نمائندوں کی میٹنگ کے پس منظر میں اورنگ آ باد سے اجنتا راستے کا کام  جنوری کے آخری تک مکمل کرنے کی ہدایت ضلع کلکٹر آستِک کمار پانڈے نے قومی راستے تر قیاتی  اتھاریٹی  اور  عوامی تعمیرات محکمہ کے افسران کو دی ہے ۔ تحصیلدار  اور  متعلقہ محکمے کے افسران مشتر کہ طور پر کام مکمل کریں ۔ اس کام میں لا پر وا ہی کرنے والے افسران کے خلاف کار وائی کرنے کا اشا رہ ضلع کلکٹر پانڈے نےدیا ۔

***** ***** ***** 

کر کٹ کھلاڑی رِشبھ پنت کی کار کا حادثہ ہوا ہے ۔ دِلّی سے دہرا دُن جاتے ہوئے حمد پور سے قریب کَل صبح یہ حادثہ ہوا ۔ اِس میں رِشبھ پنت شدید زخمی ہو گیا ۔ اُسے دہرا دُن کے اسپتال میں شریک کیا گیا ہے ۔

***** ***** ***** 

وزیر اعظم نریندر مودی کی والدہ کی آخری رسو مات کَل صبح گاندھی نگر میں سا دگی سے ادا کی گئی ۔ وزیر اعظم نریندر مودی نے اپنی ماںکے جسد خا کی کو آگ دی ۔

***** ***** ***** 


آخر میں چند  اہم خبروں کی سر خیاں دوبارہ سماعت کیجیے    ...


٭ اسمبلی کے سر ما ئی اجلاس کا اختتام  ‘  مالی بجٹ اجلاس 27؍ فروری سے ممبئی میں

٭ اجلاس کامیاب  اور  ثمر آور ہوا  ‘  وزیر اعلیٰ کا دعویٰ  تاہم  حزب مخالف کی جانب سے ناراضگی کا اظہار

٭ ریاستی ثانوی  و  اعلیٰ ثانوی تعلیمی بورڈ اِسی طرح 

CBSE 

کے دسویں  اور  بارہویں امتحا نات کا

نظام الاوقات ظاہر

٭ اورنگ آباد-  روٹے گائوں ریلوے لائن کی بر قی ریلوے کی جانچ کامیاب

اور

٭ سال نو کا استقبال کرنے کے لیے شہر ی پُر جوش ‘  انتظامیہ کا سخت بندوبست


علاقائی خبریں ختم ہوئیں

٭٭٭


Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 31 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३१ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप;अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून मुंबईत

·      अधिवेशन यशस्वी आणि फलद्रूप झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा;विरोधकांकडून मात्र नाराजी व्यक्त

·      राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तसंच सीबीएसईच्या दहावी-बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

·      तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला घटस्थापनेनं प्रारंभ

·      औरंगाबाद रोटेगाव रेल्वे मार्गावर वीजेच्या रेल्वेची चाचणी यशस्वी

आणि

·      नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिक उत्सुक;प्रशासनाचा चोख बंदोबस्त

 

सविस्तर बातम्या

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी २०२३ पासून मुंबईत सुरू होणार आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशन काळात विधानसभा तसंच विधान परिषदेत प्रत्येकी दहा बैठका झाल्या. यात विधानसभेत एकूण ८४ तास १० मिनिटं कामकाज झालं. १२ विधेयकं आणि दोन शासकीय ठराव मंजूर झाले, २९३ अन्वये तीन सूचनांवर तर ३६ तारांकित प्रश्नांवर चर्चा झाल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

विधान परिषदेत सुमारे बावन्न तास ३५ मिनिटं कामकाज झालं, तर सुमारे सव्वा पाच तासांचा वेळ वाया गेल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिली. अधिवेशन काळात पाच अध्यादेश, ३८ तारांकित प्रश्नांना उत्तरं देण्यात आली तर तीन विधेयकं संमत झाल्याची माहिती त्यांनी दिली.

****


आपलं सरकार कार्यकाळ पूर्ण करेलच शिवाय बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती पुढच्या निवडणुकीतही विजयी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते काल विधानसभेत हिवाळी अधिवेशनाचा समारोप करताना अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत होते. आपल्या शांततेला विरोधकांनी हतबलता समजू नये, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. आपल्या सरकारला सहा महिने पूर्ण झाले, या सहा महिन्यात सरकारनं घेतलेल्या विविध लोकोपयोगी निर्णयांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. विरोधी पक्षांकडूनच महापुरुषांचा अवमान केला जात असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी पुराव्यांसह केला. भ्रष्टाचाराचे सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले.  

****

विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिलं. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार असून, त्या माध्यमातून दोषींवर कडक कारवाही केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. दारिद्र्यरेषेच्या वरच्या APL शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ देण्याऐवजी थेट लाभ हस्तांतरणच्या माध्यमातून बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना सहा हजार १९५ कोटींची नुकसान भरपाई दिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

****

दरम्यान, अधिवेशनाचा समारोप झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी, या अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय घेऊ शकलो, त्यामुळे हे अधिवेशन अतिशय यशस्वी आणि फलद्रूप झाल्याचं सांगितलं. अधिवेशनामधून विदर्भाला मोठ्या प्रमाणावर दिलासा आणि न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी १५ हजार रुपये बोनस थेट जमा होणार असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, इतर निर्णयांची माहिती दिली. नागपूरच्या अधिवेशनात विदर्भाला प्राधान्य असतं, या अधिवेशनात निश्चितच विदर्भाच्या विविध प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

****

महापुरुषांच्या अवमानना प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. विधानसभेचं कामकाज संपल्यावर ते माध्यमांशी बोलत होते. अंतिम आठवडा प्रस्तावात विरोधकांनी मांडलेल्या मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी समाधानकारक उत्तर दिलेलं नाही, असं ते म्हणाले. मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्ताने लोकसहभागातून कार्यक्रम घ्यावेत, अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे. शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत हा संग्राम पोहोचवावा, असं अजित पवार यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीच्या वतीनं पत्रकार परिषदेतही सरकारवर टीका करण्यात आली. अब्दुल सत्तार यांचा भूखंड घोटाळा, एनआयटी भूखंड घोटाळा यावर सत्ताधाऱ्यांना उत्तर देता आलेलं नाही, असं अजित पवार म्हणाले. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी जाणारी रक्कम ही तुटपुंजी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

****

राज्यातल्या इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना स्वतंत्रपणे राबवण्याचा प्रस्ताव असून, याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी काल विधानसभेत दिली.

****

अल्पसंख्याक समाजाचं शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी नेमलेल्या अभ्यासगटाचा अहवाल प्राप्त झाला असून, याबाबत आर्थिक बाबी तपासून शिफारशी स्वीकारल्या जातील, असं, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितलं. अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक संस्थांमधली पदभरती हे शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी करण्याची ग्वाही, त्यांनी दिली. शिक्षकांचा पगार ऑनलाईन पद्धतीनं पगार थेट बँकेत जमा करण्याची पद्धत राज्य शासन सुरू करणार असून, पगार वेळेवर होण्यासाठी अतिरिक्त निधी दिला जाईल, असंही केसरकर यांनी सांगितलं.

****

शालेय शिक्षण पोषण आहारातलं ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंतचं प्रलंबित अनुदान सरकारनं त्वरित द्यावं, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल सभागृहात केली. यावर, संबंधित कंत्राटदारांना ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करण्याची परवानगी दिली असून, प्रलंबित अनुदान लवकरच वितरित होईल, असं केसरकर यांनी सांगितलं.

****

बेरोजगार तरुणांना नोकरीची प्रलोभनं दाखवून त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या प्लेसमेंट कार्यालयांवर अंकुश ठेवण्यासाठी, नियमावली तयार करण्याचा राज्य शासनाचा विचार असल्याचं, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. नोकरीच्या आमिषानं देशाबाहेर नेलेल्या तरुणांना परत आणण्यासाठी केंद्र शासनानं स्वतंत्र कक्ष तयार केलेला असून, राज्यातल्या अशा प्रकारच्या तक्रारी त्या कक्षाच्या माध्यमातून सोडवण्यात येत असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

 

विधवांच्या बाबतीत प्रचलित असलेल्या अनिष्ट प्रथा बंद करून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असं आश्वासन फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलं. या कुप्रथांच्या परिणामांबाबत येत्या एकतीस मे रोजी महिला विशेष ग्रामसभा घेतली जाईल, तसंच याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृतीही केली जाईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

****


कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देत नसल्याच्या तक्रारींची दखल राज्य शासनानं घेतली असून, आवश्यक ती कार्यवाही करण्यासंदर्भात जानेवारी महिन्यात बैठक घेणार असल्याची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी काल विधानसभेत दिली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी चार अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे, तरीही याप्रकरणी फेरचौकशी करण्यात येईल आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी काल विधानसभेत दिली. सदस्य कैलास पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

****

परभणी जिल्ह्यात सोयाबीन पिकाकरता आठ महसूल मंडळांमध्ये, ७३ हजार ८१४ शेतकरी अर्जदारांना नुकसान भरपाईपोटी, ४० कोटी ७१ लाख रुपये निश्चित करण्यात आले आहेत, त्यापैकी ७२ हजार ५७६ शेतकरी लाभार्थ्यांना, ४० कोटी नऊ लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित रकमेचंही लवकरात लवकर वाटप केलं जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी काल विधानसभेत दिली. डॉक्टर राहुल पाटील यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

****

बनावट खत विक्री करणाऱ्यांवर धाक बसावा यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक नियुक्त करून, बी-बियाणे आणि खतांची गोदामं तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येतील, अशी माहिती  शंभूराज देसाई यांनी काल विधानसभेत दिली. बनावट खत विक्री करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना तत्काळ दिल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या सगळ्या विद्यापीठांच्या परीक्षा निकालाचं एकत्रित वेळापत्रक तयार करुन जाहीर करण्यात येईल, असं उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधान सभेत सांगितलं. सदस्य प्रकाश सोळंके यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ते बोलत होते. परीक्षा आणि निकालामध्ये एकसूत्रता नसल्यामुळे सामायिक प्रवेश परीक्षेची तारीख बदलत जाते. मे महिन्यात परीक्षा घ्याव्यात, जून अखेर निकाल जाहीर करावा आणि एक ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचना सगळ्या महाविद्यालयांना देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा मोदी यांच्या पार्थिव देहावर काल सकाळी गांधीनगर इथं अत्यंत साधेपणानं अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी आईंच्या पार्थिव देहाला मुखाग्नी दिला.

****

क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला आहे. दिल्लीहून देहरादून इथं जाताना हम्मदपूरजवळ काल पहाटे हा अपघात झाला. यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर देहरादून इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं १० वी आणि १२ वीच्या लेखी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार दहावीच्या लेखी परीक्षा दोन मार्च ते २५ मार्च दरम्यान, तर बारावीच्या लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान घेण्याचं मंडळाचे नियोजन आहे. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या maha hsc board.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा येत्या १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांचं तपशीलवार वेळापत्रक मंडळानं जाहीर केलं असून ते मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक तयार करताना जेईईसह स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकाची दखल घेण्यात आली असल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे.

****

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केलं आहे. ते काल राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते.

बीड जिल्हयात या निवडणुकीची आचारसंहिता तात्काळ प्रभावानं लागू करण्यात आल्याची सूचना, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी संबंधितांना दिली आहे.

नांदेड जिल्ह्यासाठीही अशा सूचना जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या आहेत.

****

तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शाकंभरी नवरात्रोत्सवाला काल घटस्थापनेनं सुरुवात झाली. सात दिवसांची मंचकी निद्रा संपवून काल पहाटे देवी सिंहासनारुढ झाली, त्यानंतर मंदिरात विधीवत घटस्थापना करण्यात आली. या शाकंभरी नवरात्र महोत्सव काळात दररोज रात्री छबिना, मिरवणूक असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. शाकंभरी नवरात्रोत्सवातलं प्रमुख आकर्षण असलेली जलकुंभ यात्रा ३ जानेवारीला होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****


औरंगाबाद रोटेगाव रेल्वे मार्गावर वीजेच्या रेल्वेची चाचणी यशस्वी झाली आहे. काल सायंकाळी साडे सात वाजता रोटेगावहून निघालेली ही दहा डब्यांची रेल्वे गाडी अर्ध्या तासात आठ वाजेच्या सुमारास औरंगाबादला पोहोचली. औरंगाबाद स्थानकावर या गाडीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

****

आज ३१ डिसेंबर. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या उत्साहानं तयारी करत असल्याचं, आणि त्याकरता पर्यटन स्थळी जात असल्याचं चित्र जागोजागी दिसत आहे. मात्र या उत्साहाला कोणतंही गालबोट लागू नये, तसंच नागरिकांची कोणतीही अडचण होऊ नये यासाठी प्रशासनानंही खबरदारी घेतली आहे. औरंगाबाद इथं सायंकाळी साडे सहा वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत सुमारे पावणे सहाशे पोलिस बंदोबस्तावर तैनात असतील. मद्यपी वाहनचालकांवर देखरेख ठेवण्यासाठी ११ ठिकाणी वाहनचालकांची तपासणी करण्यात येईल. अधिकृत रेस्टॉरंट्स बार आणि हॉटेल्स उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

****

औरंगाबाद इथं होणाऱ्या जी - 20 प्रतिनिधींच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याचं काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयानं रस्त्याचं काम पूर्ण करावं, या कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिला आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात सध्या रबी पिकं वाढीच्या अवस्थेत असून शेतकरी पिकांना खताची मात्रा देत आहेत, जिल्ह्यात खताचा पुरवठा पुरेसा असून, कोणीही जास्त दरानं खतं खरेदी करू नयेत, असं आवाहन हिंगोलीच्या कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.

****