Friday, 17 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 February 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ फेब्रुवारी २०१ दुपारी .००वा.

*****

हवामान बदलावर माहिती देणारी विज्ञान एक्सप्रेस ही रेल्वे आज दिल्लीहून सुटणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत ही रेल्वे नवी दिल्लीहून प्रस्थान करेल. ही एक्सप्रेस संपूर्ण देशात भ्रमण करणार असून २० राज्यातल्या ६८ स्थानकावर तिचा मुक्काम असेल. या ठिकाणी नागरिकांना हे विज्ञान प्रदर्शन पाहता येईल. या रेल्वेत विज्ञान आणि हवामान विषयक संपूर्ण माहिती मिळणार आहे. हवामान बदलाबात नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशानं ही रेल्वे देशभरात फिरणार आहे. या रेल्वे प्रवास मोहिमेचा आठ सप्टेंबरला गुजरातमधल्या गांधीनगर इथं समारोप होणार आहे.   

****

विमुद्रीकरणानंतर बँकेत पाच लाखांपेक्षा जास्त रकमेचा भरणा केलेल्या नागरिकांना आयकर विभागानं नोटीस बजावली आहे. यातल्या नऊ लाख खातेधारकांवर काळा पैसा आणि अघोषित मालमत्ता बाळगल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ३१ मार्च रोजी, नवीन कर माफी योजनेची मुदत संपल्यानंतर या लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे. क्लीन मनी मोहिमेअंतर्गत आयकर विभागानं अशा खातेधारकांना एसएमएस आणि ईमेल पाठवले होते, त्यापैकी काही खातेधारकांनी या नोटीसला उत्तर दिलं आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत संपत्ती जाहीर करुन कर भरल्यास चौकशी थांबवण्यात येईल, असं आयकर विभागानं स्पष्ट केलं आहे. 

****

मुस्लिम समाजातल्या तीन वेळा तलाक, निकाह हलाला आणि बहुविवाह यासारख्या प्रथांविरुद्ध दाखल विविध याचिकांवरील सुनावणी आणि निर्णयासाठी   सर्वोच्च न्यायालय पाच न्यायाधीशांचं एक घटनापीठ स्थापन करणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम समाजातल्या या प्रथांना लैंगिक समानता, धर्म निरपेक्षतेच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

****

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपत आहे. या तिसऱ्या टप्प्यात बारा जिल्ह्यातल्या ६९ विधानसभा जागांसाठी परवा रविवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात ८९ महिलांसह ८३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

****

तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री इ के पलानिसामी उद्या विधानसभेत विश्वास ठराव मांडणार आहेत. पलानिसामी यांनी काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी ११७ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. पक्षाच्या दहा आमदारांनी मात्र ओ पनीरसेल्वम यांना पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, पलानिसामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर मोदी यांनी पलानिसामी यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा तालुक्यातलं डोंजा हे गाव क्रिकेटपटू खासदार सचिन तेंडुलकरनं संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलं आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात या गावाच्या विकासासाठी चार कोटी चार लाख रूपयांचा निधी खासदार निधीतून मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून डोंजा गावात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत, पाणीपुरवठा, सिमेंट रस्ते, सांडपाणी व्यवस्था, आदी कामं करण्यात येणार आहेत. 

****

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत राज्यातल्या सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी प्रतिवर्षी ग्रंथोत्सव हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. हा उपक्रम राबवण्यासाठी सर्व जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ग्रामीण आणि शहरी भागातल्या लोकांमध्ये वाचनसंस्कृतीमध्ये वाढ व्हावी या हेतूनं राज्य शासनातर्फे ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात येतं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर इथल्या किसान कोटक्स या कापसाच्या जिनिंगला आ सकाळच्या सुमारास आग लागली. अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्याचं काम सुरु असल्याचं गंगापूर पोलिसांनी सांगितलं.

****

अहमदनगर जिल्ह्यालत्या पांगरमल इथं बनावट मद्य प्राशन केल्यानं, मरण पावलेल्यांची संख्या सात झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानं अहमदनगर शहरातल्या दारू अड्ड्यांवर छापे टाकले. यात जिल्हा रुग्णालय परिसरात एका उपाहारगृहात बनावट दारू तयार होत असल्याचं आढळून आल्यानं या उपाहारगृहाला टाळं ठोकण्यात आलं आहे.

****

नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या आयटीटीएफ आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत सहा भारतीय खेळाडूंनी उप उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीत अचंत शरत कमल, हरमीत देसाई आणि सानिल शेट्टी यांनी, तर महिला एकेरीत माउमा दास, मोसमी पॉल आणि सुथीर्ता मुखर्जी यांनी अंतिम सोळा मध्ये प्रवेश केला. 

//******//

No comments:

Post a Comment