Monday, 27 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 February 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ फेब्रुवारी २०१ दुपारी .००वा.

*****

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान सुरू असून सकाळी ११ वाजेपर्यंत २७ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. १२ जिल्ह्यातल्या ५१ मतदारसंघांमध्ये हे मतदान होत असून, ४० महिलांसह ६०७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

****

अमेरिकेतल्या कन्सास सिटी इथं झालेल्या गोळीबारात एका भारतीय अभियंत्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी अमेरिकेनं कडक भूमिका घ्यावी, अशी मागणी भारतानं केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एम वैंकय्या नायडू यांनी ही माहिती दिली. या घटनेविरोधात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि जनतेनं जाहीर निषेध नोंदवावा, तसंच कठोर उपाययोजना करावी, असं ते म्हणाले.

****

वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरु झाकीर नाईक याला सक्तवसुली संचालनालयानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौथ्यांदा नोटीस बजावली आहे. परदेशात असणाऱ्या झाकीर नाईकनं दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून चौकशीत सहभागी होण्याची मागणी केली होती, मात्र संचालनालयानं ती मागणी फेटाळून लावत त्याला स्वत: हजर राहण्यास सांगितलं आहे. यावेळेसही नाईक चौकशीला हजर न राहील्यास त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात येणार आहे. नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या संस्थेविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सगळी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.   

****

      वाहतूक व्यवस्थेत सुधारणा आणि प्रवाशांसाठी वाहतुकीची उपलब्धता वाढावी, यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, हे जाणून घेण्यासाठी नीति आयोगानं नवी दिल्ली इथं आजपासून दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. यात केंद्रीय नागरी विकास मंत्री एम व्यंकय्या नायडू, परिवहन मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री सुरेश प्रभु आणि अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्यासह अन्य उच्चस्तरीय मंत्री कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत.

****

राज्यातल्या मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावं, अशी मागणी करणाऱ्या याचिकेची अंतिम सुनावणी आजपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिश मंजुला चेल्लूर यांच्यासमोर होणार आहे. या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला दिले होते. सामाजिक कार्यकर्ते विनोद नारायण पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.

****

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयातर्फे बीड जिल्ह्यातल्या खालापुरी, नाळवंडी आणि पिंपळनेर या गावांमध्ये माता, बाल आणि किशोरवयीन आरोग्यया विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. खालापुरी इथं आज आणि उद्या, नाळवंडी इथं तीन आणि चार मार्च आणि पिंपळनेर इथं आठ आणि नऊ मार्चला हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान जनजागृती रॅली, विविध स्पर्धा तसंच मार्गदर्शनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

****

आगामी गुढी पाडवा आणि लगतच्या सुट्ट्यांच्या कालावधीत रेल्वे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनानं नागपूर - मुंबई विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. २५ ते २८ मार्च दरम्यान या गाडीच्या तीन फेऱ्या करण्यात येणार आहेत. वातानुकुलित द्वितीय श्रेणीच्या एका डब्यासह तृतीय श्रेणीच्या दोन आणि सर्वसाधारण द्वितीय श्रेणीच्या सात डब्यांचा यात समावेश आहे.

****

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासोबत एक लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबालाही मिळणार असून, या योजनेअंतर्गत ९७१ आजारांसाठी वैद्यकीय मदत दिली जाणार आहे. रुग्णालयाच्या माध्यमातून थेट रुग्णांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी आरोग्य मित्र मदत करणार आहेत. पहिल्या टप्प्यात ही योजना नांदेड, गडचिरोली, अमरावती, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई या जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आली आहे.

****

रिओ ऑलिम्पिय थनाकल गोपी आणि मोनिका अथारे यांनी नवी दिल्ली इथं झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. गोपीनं पहिल्यांदाच पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन, दोन तास १५ मिनिटात, तर महिला मॅरेथॉमध्ये मोनिकानं दोन तास ३९ मिनिटात शर्यत पूर्ण केली.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातल्या गिरवली इथं विवाहीत महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज गिरवली इथं नराधम प्रतिबंधक मोर्चा काढण्यात आला. आरोपीस तत्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. 

****

८९व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. मूनलाईट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासह ला ला लॅण्ड या चित्रपटानं सहा पुरस्कार पटकावले. 

//****//

No comments:

Post a Comment