Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 12 February 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
या महिनाअखेरीस लंडन इथं बकिंगहॅम पॅलेसमध्ये
इंग्लंड भारत सांस्कृतिक वर्ष कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे. इंग्लंडच्या क्वीन एलिझाबेथ
द्वितीय यावेळी यजमानपद भूषवणार आहेत. भारत आणि इंग्लंडच्या सांस्कृतिक संबंधांना दृढ
करण्याच्या दृष्टीनं हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमादरम्यान
उभय देशांमधील कला, संस्कृती आणि परंपरा दर्शवणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार
आहे.
****
विवाहित बहिणीला तिच्या पतीकडून किंवा
सासरच्यांकडून वारसा हक्कानं मिळालेल्या मालमत्तेवर भाऊ आपला हक्क सांगू शकत नाही असं
सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. हिंदू वारसाहक्क कायद्यानुसार भाऊ हा विवाहित बहिणीचा
वारस किंवा कुटुंबाचा सदस्य होऊ शकत नाही असं यासंदर्भातल्या एका प्रकरणात न्यायालयानं
नमूद केलं आहे. विवाहित बहिणीला अपत्य नसल्यास, तिचा वारसाहक्क तिच्या पतीच्या अन्य
वारसांकडे जाऊ शकतो असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****
अर्थव्यवस्थेला
चालना देण्यासाठी सरकारनं अप्रत्यक्ष करात तातडीनं कपात करण्याची गरज असल्याचं माजी
केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी म्हटलं आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीदरम्यान
ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते. अप्रत्यक्ष करात कपात झाल्यास मालाची विक्री वाढेल
आणि परिणामी उत्पादनाला चालना मिळेल असं ते म्हणाले. युवकांसाठी रोजगार निर्मितीचा
अभाव असणं ही गंभीर स्थिती असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
येत्या
जुलैपासून वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर सरकारला अर्थसंकल्पीय करसंकलन अंदाजात
सुधारणा करावी लागण्याची शक्यता असल्याचं केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी आज
नवी दिल्ली इथं पीटीआयला सांगितलं. अर्थसंकल्पात अप्रत्यक्ष करातून मिळणाऱ्या महसुलाचा
अंदाज ठरवताना नेहमीची पध्दत वापरण्यात आली आहे. मात्र जुलैपासून अप्रत्यक्ष करांऐवजी
वस्तू आणि सेवाकर लागू होणार असल्यानं यंदाचं वर्ष वेगळं असणार आहे, असं ते यावेळी
म्हणाले.
****
येत्या २०२२ सालापर्यंत शेतकऱ्यांचं
उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं स्थापन केलेली समिती कृषी क्षेत्रासाठी
मोठ्या सुधारणांवर विचार करत आहे. शेतीकडे नफाकेंद्री दृष्टीकोनातून पाहणं, उत्पादकता
वाढवणं आणि खर्च कमी करणं यासाठी समिती काही सूचना करणार असल्याचं समितीचे अध्यक्ष
अशोक दळवी यांनी आज हैदराबाद इथं सांगितलं. कृषी मालाला उठाव मिळण्यासाठी बाजारपेठ
व्यवस्थेत सुधारणा करणं आणि पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यासारख्या जोडधंद्यांवर
लक्ष केंद्रीत करणं याबाबत सुध्दा ही आंतरमंत्रालयीन समिती उपाय सुचवणार आहे. या संदर्भात
राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील सरकारांना व्यवहार्य आणि प्रत्यक्षात आणण्यास सोप्या
उपायांवर समिती विचार करत असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
पुढच्या
वर्षी केंद्र सरकारच्या सुमारे दोन लाख ८३ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचा अंदाज
आहे. याबाबत अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचं पीटीआयनं म्हटलं आहे. पोलीस खातं,
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, टपाल खातं आदी विभागांमध्ये
अनेक पदांवर कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.
****
जनतेला अन्न, वस्त्र, निवाऱ्यासह आरोग्य
आणि शिक्षण देण्यासाठी शासन कटीबध्द असून त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येतील
असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत
समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातील उमेदवारांच्या प्रचारासाठी
परभणीनजिक पिंगळी इथं आयोजित सभेत ते आज बोलत होते. शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत
पोहोचवण्यासाठी परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या पक्षाकडे द्यावी असं आवाहन
त्यांनी यावेळी केलं.
****
भारतानं दृष्टिबाधितांचा ट्वेंटीट्वेंटी
क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. आज बंगलुरु इथल्या एम.चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या
अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा नऊ गडी राखून पराभव केला. पाकिस्ताननं ठेवलेलं
१९८ धावांचं उद्दिष्ट भारतानं अठराव्या षटकातच पूर्ण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी
आणि केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी भारतीय संघाचं अभिनदंन केलं आहे.
****
भारत आणि बांग्लादेश
दरम्यान हैदराबाद इथं सुरु असलेल्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसाचा
खेळ संपला तेव्हा बांग्लादेशच्या दुसऱ्या डावात तीन गडी बाद १०३ धावा झाल्या. त्याआधी
भारतानं आपला दुसरा डाव चार गडी बाद १५९ धावांवर घोषित करत, बांग्लादेशला ४५९ धावांचं
लक्ष्य दिलं. विजयासाठी बांग्लादेशला अजून ३५६ धावा करायच्या आहेत.
****
No comments:
Post a Comment