Wednesday, 15 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 15 February 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

उत्तर प्रदेशातल्या ११ जिल्ह्यातल्या ६७ मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान आज पाच वाजता संपलं. दुपारी चार वाजेपर्यंत या मतदार संघांमध्ये सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. हे मतदान शांततेत पार पडल्याचं वृत्त आहे.

****

 भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं एकूण १०४ उपग्रह प्रक्षेपित करून नवा इतिहास रचला आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रात सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी पी.एस.एल.व्ही-सी ३७ या यानातून या सर्व उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपणाचे सर्व चारही टप्पे नियोजनानुसार पार पडले असून पाचशे पाच किलोमीटरच्या उंचीवर सुर्याच्या समकालिक कक्षेत हे सर्व उपग्रह स्थापित करण्यात आले आहेत.
इस्त्रोनं केवळ विक्रमी संख्येनं उपग्रह अवकाशात सोडले नसून पी.एस.एल.व्ही.च्या क्षमतेतही वाढ झाली असल्याचं, इस्रोचे अध्यक्ष किरण कुमार यांनी सांगितलं.
राष्‍ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान नरेन्‍द्र मोदी यांनी विक्रमी संख्येनं उपग्रह अवकाशात सोडल्याबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.

****

अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाच्या सरचिटणीस शशिकला यांची आत्मसमर्पण करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. या आदेशात कोणताही बदल केला जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. यानुसार शशिकला आत्मसमर्पण करण्यासाठी बंगळुरुकडे रवाना झाल्या आहेत.   
दरम्यान, शशिकला आणि पक्षाचे विधिमंडळ नेते ई पलानी सामी यांच्याविरोधात पक्षाच्या आमदारांना हॉटेलमध्ये ओलीस ठेवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पक्षाचे आमदार एस.सर्वनन यांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

****

राज्यात पहिल्या टप्प्यातल्या १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. १५ जिल्हा परिषदांच्या ८५५ जगांसाठी चार हजार २७८, तर १६५ पंचायत समित्यांच्या एक हजार ७१२ जागांसाठी सात हजार ६९३ उमेदवार रिंगणात आहेत. यात मराठवाड्यातल्या आठ जिल्हा परिषदा, ७६ पंचायत समित्यांच्या समावेश आहे. यासाठी जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. शांततेत आणि निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त करण्यात आला आहे. मराठवाड्यात प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुरंगी लढतीचं चित्र आहे.
लातूर जिल्ह्यात शांततामय वातावरणात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची सर्व तयारी झाली असल्याची माहिती, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली आहे. तसंच सर्व मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
परभणी जिल्ह्यात मतदानासाठी पाच हजार १५७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यात १० हजार ५१२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, उद्या सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. 

****

माता बाल आरोग्य सुधारण्यासंदर्भात जागतिक स्तरावर प्रयत्न करण्यात येणार असून, यासाठी निवडलेल्या नऊ देशांमध्ये भारताचा समावेश करण्यात आला आहे. २०३० पर्यंत माता आणि बाल मृत्यूचं प्रमाण पुर्णपणे कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर अभियान राबवण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटना-डब्ल्यू एच ओनं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. गरोदरपणात योग्य काळजी न घेतल्यामुळे जगात दर वर्षी तीन लाख महिलांचा, तर २७ लाख बालकांचा मृत्यू होतो. त्यामुळे आई आणि बाळाची योग्य पद्धतीनं काळजी घेतल्यास हे मृत्यू रोखले जाऊ शकतात असं या निवेदनात म्हटलं आहे.      

****

शाळांमध्ये शिक्षा करताना छडीच्या वापराबात सरकारनं निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांची माहिती, शाळांना देण्याची सूचना केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाला केली आहे. उत्तर प्रदेशातल्या एका शाळेत लहान मुलांना शिक्षा करताना मोठ्या प्रमाणात छडीचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर हे नियम तयार करण्यात आले आहेत. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं हे नियम तयार केले असून, ते लवकरात लवकर शाळांपर्यंत पोहोचवावेत, असं त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

राष्ट्र निर्माणात शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणात योगदान देण्याचं आवाहन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं एका आंतरराष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते. कल्पना प्रत्यक्षात आणून गरीब जनतेच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

No comments:

Post a Comment