Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 15 February 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ फेब्रुवारी २०१७
सकाळी ६.५० मि.
****
·
मराठवाडा आणि
विदर्भातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त दहा जिल्ह्यांमध्ये तीनशे चाळीस कोटी रुपयांचा
दुग्ध विकास प्रकल्प राबण्यास केंद्रीय कृषी
मंत्र्यांची तत्वत: मंजुरी
·
हृदयविकारात
अतिशय महत्वाच्या असणाऱ्या स्टेंटच्या किंमतींमध्ये ८५ टक्के कपात
·
मराठवाड्यात
उद्या जिल्हा परीषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान, काल प्रचार संपला
आणि
·
अधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांप्रकरणी
औरंगाबाद महानगरपालिकेचे लेखाधिकारी तसंच अनियमिततेच्या
कारणावरून महावितरणचे पाच अधिकारी निलंबित
****
मराठवाडा आणि विदर्भातल्या
शेतकरी आत्महत्याग्रस्त दहा जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प राबण्यासाठी केंद्रीय
कृषी मंत्री राधामोहनसिंग यांनी काल तत्वत: मंजुरी दिली. यात मराठवाड्यातल्या नांदेड,
लातूर, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्याचा समावेश आहे. तीनशे चाळीस कोटी रुपयांच्या या
प्रकल्पाचा फायदा तीन हजार गावांमधल्या सुमारे साठ हजार दुध उत्पादक शेतकऱ्यांना होईल
तसंच सुमारे दहा हजार युवकांना रोजगार मिळू शकेल. जनावरांसाठी पोषण आहार, आरोग्य आणि
कृत्रीम रेतन सुविधा, दुध संकलन, प्रक्रिया आणि विपणन संस्था उभारणे अशा उपक्रमांचा
या योजनेत समावेश असेल.
****
जम्मू काश्मीर मधल्या बंदीपुरा
जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले, तर सहा
जवान आणि एक नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. या
परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळताच लष्करानं काल पहाटेपासून शोध मोहीम
सुरु केली.
दरम्यान,
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना जम्मूमधल्या सांबा जिल्ह्यात भारत - पाकिस्तान सीमेवर
एक भुयार आढळलं आहे. वापर होण्यापूर्वीच हे भुयार आढळल्यानं पाकिस्तानचा घुसखोरीचा
प्रयत्न उधळून लावला गेला.
****
आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोट्टा इथल्या सतीश
धवन अवकाश केंद्रावरुन आज सकाळी नऊ वाजून २८ मिनिटांनी पी.एस.एल.व्ही.सी ३७ या प्रक्षेपकाद्वारे
एकाच वेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित होणार आहेत. एकाचवेळी सर्वाधिक ३७ उपग्रह प्रक्षेपित
करण्याचा विक्रम सध्या रशियाच्या नावावर आहे.
****
अण्णाद्रमुक पक्षाच्या सरचिटणीस व्ही.के.शशिकला
यांना बेहिशेबी संपत्ती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दोषी ठरवलं असून, या प्रकरणी
शिल्लक असलेली चार वर्ष कारावासाची शिक्षा पूर्ण करण्यासाठी तात्काळ आत्मसमर्पण करण्याचे
निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे शशिकला यांचं तमिळनाडूच्या मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न संपुष्टात आलं आहे. जवळपास दोन दशकांपासून
सुरू असलेल्या या खटल्यात काल सर्वोच्च न्यायालयानं कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय
रद्द ठरवत, शशिकला यांच्यासह व्ही.एन.सुधाकरन आणि अन्य एकाला दोषी ठरवलं. या निर्णयामुळे
पुढची दहा वर्षे कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवण्यास शशिकला अपात्र ठरल्या आहेत.
दरम्यान,
अण्णाद्रमुक पक्षाच्या सरचिटणीस असणाऱ्या शशिकला यांनी, मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांचं पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व रद्द केलं असून मंत्री ई. पलानी
सामी यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे.
पलानी सामी यांनी राज्यपाल सी.विद्यासागर
राव यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी समर्थक आमदारांची यादी सादर केल्याचं पीटीआयचं
वृत्त आहे.
****
सर्वांना स्वस्तात उत्तम
वैद्यकीय उपचार देण्याच्या दृष्टीने हृदयविकारात अतिशय महत्वाच्या असणाऱ्या स्टेंटच्या
किंमतींमध्ये सरकारने सुमारे ८५ टक्के कपात केली आहे. यानुसार आता धातुच्या स्टेंटची
किंमत साधारणत: ७ हजार २६० रुपये तर विरघळणाऱ्या स्टेंटची किंमत २९ हजार ६०० रुपये
इतकी होईल, असं केंद्रीय रसायन आणि खत मंत्री अनंतकुमार यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी
बोलतांना सांगितलं.
****
राष्ट्रगीत
हे चित्रपट किंवा माहितीपटाचा भाग असेल तर त्यासाठी उभं राहणं बंधनकारक
नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. मात्र चित्रपट सुरू होण्यापूर्वी लावण्यात
येणाऱ्या राष्ट्रगीतासाठी प्रेक्षकांनी उभं राहावं असं न्यायालयानं सांगितलं आहे. चित्रपटांदरम्यानही
राष्ट्रगीत वाजल्यास उभं राहण्यासंबंधी नियम निश्चित करावे, अशी मागणी करणारी याचिका
न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रगीतासाठी उभं न राहिल्यास, कारवाई
करणारा कोणताही कायदा नसल्याचं केंद्रानं म्हटलं आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी १८
एप्रिलला होणार आहे.
****
मानसिक
रुग्णांसाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला
दिले आहेत. उत्तर प्रदेशातल्या विविध रुग्णालयांमधून ३०० मनोरुग्णांना उपचार पूर्ण
होण्यापूर्वीच घरी सोडण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, न्यायालयात याचिका दाखल झाली
होती. त्यावरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले.
****
समाजाच्या
वंचित वर्गातल्या लोकांना जबरदस्ती मजुरी करण्यासाठी भाग पाडल्यास कडक कारवाई करण्यात
येईल, असं केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारु दत्तात्रय यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली
इथं मजुरांच्या राष्ट्रीय परिसंवादात ते काल बोलत होते. सध्याच्या कामगार कायद्यांना
एकत्रित करुन एक कामगार संहिता तयार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारीत केलं
जात आहे.आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
ज्या गावात २५ टक्के महिला मतदान करुन संमती देतील तिथे ग्रामरक्षक
दलाची स्थापना करण्यात येईल असं राज्याचे उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी काल सांगितलं. अवैध दारूच्या धंद्याबाबत ग्रामीण भागात ग्रामरक्षक दल
स्थापन करण्याचा कायदा पारित करण्यात आला याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत
होते.
गावांमधील अवैध मद्य व्यवसाय, मद्यपींचं समुपदेशन, व्यसनाधिनतेचे
दुष्परिणाम, लोकशिक्षण, जनजागृती आदी कामं ग्रामरक्षक दल करेल असं बावनकुळे म्हणाले.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामरक्षक दलांना पुरस्कार आणि अनुदान देण्यात येणार आहे.
****
उद्योगांना चालना देण्याच्या दृष्टीनं राज्य
शासनानं कंत्राटी कामगार कायद्यात सुधारणा केली आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील
असं कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. उद्योग व्यवसाय करणं सुलभ
करण्याच्या योजनेअंतर्गत तसंच मेक इन महाराष्ट्र कार्यक्रमाच्या अनुषंगानं हा निर्णय
घेतल्याचं त्यांनी काल मुंबई इथं सांगितलं.
****
मराठवाड्यातल्या आठ जिल्हा परिषदा,
७६ पंचायत समित्यांच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला. या
सर्व ठिकाणी उद्या मतदान होत आहे. यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. शांततेत
आणि निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त
करण्यात आला आहे. मराठवाड्यात प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुरंगी लढतीचं
चित्र आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रभारी मुख्य
लेखाधिकारी संजय पवार यांना आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी काल निलंबित केलं. अधिकाऱ्यांच्या
बनावट सह्यांनी लाखोंची देयकं काढणे, ई-निविदा काढताना
केलेली दिरंगाई, स्थायी समितीची मंजूरी न घेता एका खाजगी कंपनीला मुदतवाढ देणे आणि
पालिकेकडे असलेल्या सर्व बाबींची माहिती वरिष्ठांपासून लपवणे आदी आरोपांवरुन पवार
यांचं निलंबन करण्यात आलं आहे. वर्षभरात मनपा आयुक्तांनी आतापर्यंत पवार यांच्यासह
सहा बड्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद
आणि जालना ग्रामीण भागातल्या पाच अधिकाऱ्यांना काल वीज महावितरणनं निलंबित केलं. कामातील
अनियमितता, वीज देयकांची कमी वसूली, अवैध मीटर रिडिंग आदी आरोप त्यांच्यावर ठेवण्यात
आले आहेत.
****
राज्यातल्या अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या
प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या यंदाच्या सामाईक प्रवेश परीक्षा-एमएचटी-सीईटीसाठी ऑनलाईन
पध्दतीनं अर्ज भरण्यास कालपासून सुरुवात झाली आहे. येत्या ११ मे रोजी ही परीक्षा होणार
आहे. येत्या २३ मार्चपर्यंत नियमित शुल्कासह तर २४ ते ३० मार्च या कालावधीत पाचशे रुपये
विलंब शुल्कासह हे
अर्ज भरता येणार आहेत.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं “रिसेन्ट ॲडव्हान्सेस इन मॅथेमॅटिक्स”
या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेचा काल समारोप झाला. या दोन दिवसीय परिषदेमध्ये देशभरातून
प्राध्यापक, संशोधक तसंच विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. विविध विषयावर
तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्यानं तसंच संशोधनपर लेख परिषदेत सादर झाले.
****
परभणी जिल्हा रूग्णालयात राष्ट्रीय असंसर्गजन्य
रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जागतिक कर्करोग पंधरवड्यानिमित्त काल जनजागृती प्रभातफेरीचं आयोजन करण्यात आलं. जिल्हाधिकारी राहुल
रंजन महिवाल यांनी हिरवा झेंडा दाखवून फेरीचा प्रारंभ केला. कर्करोग जनजागृतीसंदर्भातील
विविध भित्तीपत्रकांचं अनावरणही यावेळी करण्यात आलं. तंबाखूसेवन सोडण्याचा संकल्प करणाऱ्या
व्यक्तींचा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
लातूर जिल्ह्यातल्या
जास्तीत जास्त विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, महिला बचत गट, पर्यावरण
आणि वृक्षप्रेमी नागरिकांनी हरित सेना अभियानात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी
पांडुरंग पोले यांनी केलं आहे. प्रत्येक नागरिकाला वन तसंच वन्यजीवांचं संरक्षण आणि
संवर्धन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
//*******//
No comments:
Post a Comment