Saturday, 18 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 February 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ फेब्रुवारी २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      हृदयविकारावर उपचारासाठीच्या स्टेंटचा कृत्रीम तुटवडा भासवणाऱ्या कंपन्यांचे परवाने निलंबित करणार - केंद्रीय मंत्री अनंतकुमार

·      मतमोजणी प्रक्रियेत मतदान केंद्रनिहाय मतं जाहीर न करणाऱ्या टोटलायझर यंत्राच्या वापराला केंद्र सरकारचा नकार

·      कारखान्यांमध्ये प्राणघातक अपघातांना प्रतिबंधासाठी कृती आराखडा तयार करण्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील - निलंगेकर यांचे निर्देश

आणि

·      भारतीय स्टेट बँकेत विलिनीकरणाच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांची निदर्शनं

****

हृदयविकारावर उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या स्टेंटचा तुटवडा भासवणाऱ्या कंपन्यांविरोधात केंद्र सरकारनं कारवाईचा इशारा दिला आहे. अशा कंपन्यांचे परवाने निलंबित केले जातील, असं केंद्रीय खतं आणि रसायन मंत्री अनंतकुमार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. हृदयविकारानं पीडित रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात स्टेंट उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात असल्याचं औषध विभागाचे सचिव जयप्रिय प्रकाश यांनी सांगितलं. सरकारनं स्टेंटच्या किंमतीत ८५ टक्के कपात करून, किंमतीवर नियंत्रण आणल्यानंतरही काही कंपन्या पुनर्वेष्टनासाठी स्टेंट परत मागवत असल्याचं निदर्शनास आलं असून, अशा कंपन्यांवर लक्ष ठेऊन असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

****

मतमोजणी प्रक्रियेत मतदान केंद्रनिहाय मत जाहीर न करणाऱ्या टोटलायझर या यंत्राच्या वापराला केंद्र सरकारनं नकार दिला आहे. निवडणूक आयोगानं केंद्राकडे या यंत्राच्या वापराचा प्रस्ताव दिला होता, यासंदर्भात गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन मंत्रिगटानं हा प्रस्ताव अमान्य केला असून, निवडणूक आयोगाला हा निर्णय कळवला आहे. सध्या मतमोजणी प्रक्रियेत मतदान केंद्रनिहाय मतसंख्या जाहीर होते, या यंत्राच्या वापरानं हे टाळता येईल, असं निवडणूक आयोगाच्या प्रस्तावात म्हटलं होतं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह काही राजकीय पक्ष या यंत्राच्या वापरास अनुकूल असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

विमुद्रीकरणानंतर चलनस्थिती काही आठवड्यातच पूर्वपदावर आली, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या चलनी नोटांच्या छापखान्यामधून अव्याहतपणे चलन छपाईचं काम चालू असल्याचं त्यांनी सांगितलं. रोखेछपाई आणि टाकसाळ महामंडळाच्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात काल ते बोलत होते. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करुन चलन छपाईमध्ये दिलेल्या योगदानाचं केंद्रीय अर्थ व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी यावेळी कौतुक केलं.

****

दरम्यान, विमुद्रीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था नव्यानं उभारी घेईल, असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी व्यक्त केला आहे. एका खाजगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काल ते बोलत होते. चालू आर्थिक वर्षात आर्थिक वृद्धीचा दर अंशत: घसरला असला, तरी येत्या आर्थिक वर्षात वृद्धीचा दर वाढेल, असं ते म्हणाले.

****

कारखान्यांमध्ये प्राणघातक अपघात होऊ नये यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश कामगार मंत्री संभाजी पाटील - निलंगेकर यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात, औद्योगिक सुरक्षा तसंच आरोग्य संचालनालयाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या छत्तीस हजार आठशे चौसष्ठ कारखान्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, सुरक्षेचे मापदंड आणि सुरक्षा लेखा परीक्षण आदी बाबींची पूर्तता करावी, तसंच प्राणघातक अपघात टाळण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबतचा अहवाल तातडीनं सादर करण्याचे निर्देश कामगार मंत्र्यांनी यावेळी दिले.

****

शिर्डी इथल्या श्री साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय मंडळावर येत्या १५ मार्च पर्यंत आय ए एस दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्यसरकारला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं २०१४ मध्ये शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी पदावर आय ए एस अधिकाऱ्याच्या नेमणूकीचा आदेश दिला होता. राज्यशासनानं या निकालावर, सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. मात्र काल झालेल्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत, महिनाभरात ही नियुक्ती करण्याचे निर्देश दिले.

****

गजानन महाराज प्रकट दिन आज साजरा होत आहे. या निमित्त औरंगाबादहून शेगावला जाण्यासाठी राज्य परिवहन महमंडळातर्फे आज मध्यवर्ती बसस्थानकावरुन तीन जादा बस सोडल्या जाणार आहेत. सिडको बसस्थानकातूनही शेगावसाठी जादा बस सोडल्या जाणार आहेत.

****

ज्येष्ठ पत्रकार, संपादक युधिष्ठीर जोशी यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. १९६० च्या दशकात पत्रकारितेला सुरुवात केलेले जोशी यांनी अनेक दैनिकांमधे काम केलं. सामाजिक तसंच राजकीय घडामोडींवर जोशी यांनी वैविध्यपूर्ण लेखन केलं आहे.

****

या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी च्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केल्या जात आहेत, हे बातमीपत्र न्युज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

भारतीय स्टेट बँकेत पाच बँकांच्या विलिनीकरणाच्या विरोधात काल बँक कर्मचारी संघटनांच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. औरंगाबाद इथं भारतीय स्टेट बँकेच्या विभागीय कार्यालयासमोर तर लातूर इथं हैद्राबाद स्टेट बँकेसमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली. हैदराबाद स्टेट बँक, बिकानेर आणि जयपूर, म्हैसूर, पटियाला आणि त्रावणकोर स्टेट बँक या पाच बँकांच्या भारतीय स्टेट बँकेत विलिनीकरणाला केंद्र सरकारनं नुकतीच मान्यता दिली, या निर्णयाला या संघटनांनी विरोध दर्शवला आहे.

****

बीड जिल्ह्यतल्या माजलगाव इथं राज्यस्तरीय कृषी आणि पशुप्रदर्शनाला कालपासून प्रारंभ झाला. आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. या तीन दिवसीय प्रदर्शनात विविध विषयावर तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्यानं तसंच कार्यशाळा होणार आहेत. महाराष्ट्रातली ८६ टक्के जमीन कातळ पाषाणाची असून या जमिनीची आर्द्रता कमी झाली असल्याबाबत पवार यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.

****

वनौषधी क्षेत्रातल्या अमर्याद संधी आणि उद्योग उभारणीसाठी शेतकरी तसंच त्यांच्या सुशिक्षित मुलांनी पुढाकार घेणं आवश्यक असल्याचं, उद्योजक डॉक्टर के. आर. कदम यांनी म्हटलं आहे. उद्योग संचालनालयाच्या जिल्हा पुरस्कार योजनेंतर्गत काल नांदेड इथं २०१६ साठीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. कदम यांच्या के. के. हर्बल इंडस्ट्रीजला प्रथम, तर विठ्ठल पोलावार यांच्या अनंत ॲग्रो इंडस्ट्रीजला द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

****

परभणी महानगरपालिकेनं स्थानिक संस्था कर भरण्यास पात्र असलेल्या व्यापाऱ्यांना निर्धारित वेळेत कर भरणा करण्याचं आवाहन केलं आहे. काल यासंदर्भात एक पत्रक जारी करून, महापालिकेनं, पात्र व्यापाऱ्यांनी कर न भरल्यास, कायदेशीर कार्यवाहीचा इशारा दिला आहे.

****

गावस्तरावर पाणी पुरवठा योजनेसाठी जलस्वराज्य योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत नांदेड जिल्ह्यात शाश्वत शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचं, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांनी सांगितलं आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी तसंच स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीनं झरी इथं आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत काल ते बोलत होते. या योजनेत नांदेडसह बारा जिल्ह्यांचा समावेश आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर इथं कापसाच्या जिनिंगला आग लागून मोठ्या प्रमाणावर कापूस जळून खाक झाला. गंगापूर - वैजापूर रस्त्यावर किसान कोटेक्स जिनिंगमध्ये काल सकाळी ही दुर्घटना घडली.

****

मराठी भाषा दिन आणि सप्ताहानिमित्त औरंगाबाद इथल्या शिवछत्रपती महाविद्यालयातर्फे काल ग्रथ दिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये गण गवळण, पावली, भजन सादर करण्यात आले. प्रसिद्ध कथाकार उत्तम बावस्कर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. सप्ताहानिमित्त सुंदर हस्ताक्षर आणि निबंध स्पर्धा घेण्यात आली.

****

इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ पात्र ठरला आहे. काल कोलंबो इथं झालेल्या पात्रता चाचणीमध्ये भारतानं बांगलादेशचा न गडी राखन पराभव केला.

****


No comments:

Post a Comment