Monday, 6 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 February 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ फेब्रुवारी २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासह विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज मतमोजणी

·      एक एप्रिलपासून तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा रोख व्यवहार करणाऱ्यांना दुप्पट दंड आकारणार - केंद्र सरकार

·      मतदान न करणाऱ्यांना सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही - सर्वोच्च न्यायालयाचं मत

आणि

·      ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

****

राज्यातल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातल्या एकूण पाच जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. यात औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदार संघांचा, तर अमरावती आणि नाशिक या पदवीधर मतदार संघांचा समावेश आहे. तीन फेब्रुवारीला औरंगाबाद विभागात आठ जिल्ह्यांतल्या २७५ मतदान केंद्रांवर सरासरी ८७ टक्के मतदान झालं होतं. औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा औद्योगिक परीसरातल्या एका कंपनीत मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. काल या मतमोजणीचं कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं.

****

एक एप्रिलपासून तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा व्यवहार रोखीनं करणाऱ्यांना तेवढ्याच रकमेचा दुप्पट दंड आकारण्यात येईल, असं महसूल सचिव हसमुख अधिया यांनी स्पष्ट केलं. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत, २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात तीन लाख रुपयांपेक्षा अधिक व्यवहार रोखीनं करण्यावर बंदी घालण्याची तरतूद आहे. विमुद्रीकरणानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बँकांमध्ये जमा झाला असून, यापुढे भ्रष्टाचराला आळा घालण्यासाठी सरकारकडून अशा उपाययोजना करण्यात येत असल्याचं अधिया यांनी सांगितलं.

****

मुस्लिम समाजातली तिहेरी तलाक पद्धत समाप्त करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. उत्तरप्रदेशातल्या गाझीयाबाद इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकार या वाईट सामाजिक प्रथेला नष्ट करू इच्छित असल्याचं सांगून हा मुद्दा कोणत्याही धर्माशी संबधित नसून स्रियांविषयी आदर आणि त्यांच्या प्रतिष्ठेशी संबंधित हा मुद्दा असून त्याचा कोणत्याही धर्माशी संबंध नसल्याचं प्रसाद म्हणाले. स्त्रियांना न्याय, समानता आणि त्यांचं मोठेपण या तीन मुद्यांवर सरकार हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित करणार असल्याचं ते पुढं म्हणाले.

****

मतदान न करणाऱ्या मतदारांना, सरकारला प्रश्न विचारण्याचा किंवा सरकारला दोष देण्याचा अधिकार नाही, असं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. अतिक्रमण काढण्यासंदर्भात एका सामाजिक कार्यकर्त्यानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयानं हे मत व्यक्त केलं. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला दोष देता येणार नाही असंही न्यायालयानं पुढं म्हटलं आहे. दरम्यान, या कार्यकर्त्यानं आतापर्यंत एकदाही मतदान केलेलं नाही असं त्यानं न्यायालयाला सांगितलं.

****

मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या एका समितीनं १२ कीटकनाशकांवर पूर्णपणे बंदी घालण्याची शिफारस केली आहे. तसंच २०२० पर्यंत आणखी सहा अन्य कीटकनाशकांवर बंदी घालण्यात येणार आहे. सरकारनं देशातल्या ६६ नोंदणीकृत कीटकनाशकांचं परीक्षण करण्यासाठी एक विशेषज्ञांची  समिती नेमली आहे.

*****

आरक्षित कोट्यातून निवडून आलेल्या उमेदवारानं सहा महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असून, या कायद्याची राज्य निवडणूक आयोग कठोरपणे अंमलबजावणी करत असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी सांगितलं. ते काल कोल्हापूर इथं आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कामांचा आढावा घेतल्यानंतर बोलत होते. राज्यात अजूनही ४५० नगरसेवकांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलं नाही, त्याचा आढावा घेतला जात असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, या निवडणुकीत भाड्याचे विमान, हेलिकॉप्टर यांवरही निवडणूक आयोग लक्ष देणार असल्याचं सहारीया यांनी सोलापूर इथं बोलतांना सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्यावेळी हवाई वाहतुकीद्वारे गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे आता अशी विमानं आणि हेलिकॉप्टरची तपासणी केली जाईल, असं ते म्हणाले.

****

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच ऑनलाईन अर्ज भरतांना तांत्रिक चुका झाल्यानं तब्बल १४० उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. २२७ प्रभागांकरता शेवटच्या दिवशी निवडणूक कार्यालयाकडे २६८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. मात्र ऑनलाईन प्रक्रियेत पहिल्यांदा अर्ज भरतांना अनेकांचा गोंधळ उडाला. परिणामी १४० उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले. यात अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त आहे.

****

या बातम्या आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केल्या जात आहे. आमचं  हे बातमीपत्र न्यूज ऑन ए.आय.आर.डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

डोंबिवली इथल्या तीन दिवसाच्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. या संमेलनाच्या समारोपाच्या सत्रात एकूण ३० ठराव मांडण्यात आले. यात शेत जमिनींचं अधिग्रहण आणि एकरकमी मोबदला द्यावा, सर्व समाजांच्या मोर्चांची केंद्र सरकारनं दखल घ्यावी, स्वतंत्र भाषा धोरण निश्चिती आदिंचा समावेश आहे. ठरावातल्या कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रातून वगळण्यात आलेल्या २७ गावांची स्वतंत्र नगर किंवा महापालिका स्थापण्याच्या ठरावावर कल्याण-डोंबिवली महापालिका महापौर राजेंद्र देवळेकर यांनी जाहीर आक्षेप नोंदवला.

याप्रसंगी भाषा आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्यासह, संमेलनाध्यक्ष डॉक्टर अक्षयकुमार काळे, मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस उपस्थित होते. यावेळी बोलतांना तावडे यांनी, इंटरनेटवरुन मराठी भाषेतील मजकूराचं प्रमाण वाढणं गरजेचं असल्याचं सांगितलं.

****

वीज बिल न भरल्यामुळे औरंगाबाद शहरातल्या रस्त्यावरच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणनं बंद केला आहे, त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून हे पथदिवे बंद आहेत. ग्रामीण भागातल्या वीज बिल न भरणाऱ्या गावांचाही वीज पुरवठा तोडण्यात आला आहे.

****

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी चौकटीबाहेर पडून विचार करायला हवा, असं आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथल्या वसंतराव नाईक महाविद्यालयात झालेल्या स्पर्धा परीक्षा करिअर साहित्य संमेलनात ते आज बोलत होते. स्पर्धा परीक्षांचं बदलतं स्वरुप आणि अडचणींविषयी ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केलं.

****

महिलांच्या आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या गेट गोईंग संस्थेनं आयोजित केलेली हाफ मॅरेथॉन काल औरंगाबाद इथं पार पडली. विभागीय क्रीडा संकुलापासून सकाळी सहा वाजता स्पर्धेला सुरवात झाली. पाच, दहा आणि एकवीस किलोमिटर अशा तीन गटात झालेल्या या मॅरेथॉनमध्ये सुमारे दोन हाजार नागरिकांनी सहभाग घेतला.

****

मराठवाड्यातले पहिले सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचा शतकपूर्तीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीनं काल गौरव करण्यात आला.

या सत्काराला उत्तर देतांना कुलकर्णी यांनी इतकी वर्ष काम करायला, रहायला मिळालं  हे मी माझं भाग्य समजतो अशा भावना व्यक्त केल्या. त्यापूर्वी भुजंगरावांच्या जीवनावर एक लघुपट दाखवण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष एस बी वराडे यांच्या हस्ते भुजंगरावांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं. कार्यक्रमाला सरस्वती भुवन संस्थेचे अध्यक्ष दिनकर बोरीकर, निवृत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

मुक्ता साळवे यांनी लिहिलेला निबंध म्हणजे दलित साहित्याची गंगोत्री असल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांनी व्यक्त केलं. लातूर इथं तिसऱ्या राजस्तरीय सत्यशोधिका मुक्ता साळवे साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल वाघमारे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्षा प्राध्यापक प्रतिमा परदेशी आणि प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते रमेश राक्षे यावेळी उपस्थित होते. मुक्ता साळवे यांच्यासंबंधी अधिक माहिती मिळवून समाजासमोर आणण्याचं मोठं आव्हान इतिहासकारांपुढे असल्याच मत संमेलनाचे संयोजक डॉ. माधव गादेकर यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी विशेष न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यासाठी तीन आठवडे उत्तर प्रदेशात जाण्याची मुभा न्यायालयानं दिल्याचं विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ यांनी सांगितलं. उपाध्याय यांना अखिल भारत हिंदू महासभेनं उत्तर प्रदेशातल्या बलिया जिल्ह्यातून उमेदवारी दिली आहे.

****

चंद्रपूर इथल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ बघण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना आता फुलपाखरांसोबत वनविहाराची संधी उपलब्ध होणार आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशदारापाशी असलेल्या मोहार्ली गावाच्या परिसरात फुलपाखरु उद्यान विकसित करण्यात येणार असल्याचं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

No comments:

Post a Comment