Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 04 March 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ मार्च २०१७ सकाळी
६.५० मि.
****
·
संसदेत महिलांचं प्रतिनिधीत्व
वाढण्यासाठी महिला आरक्षण लागू करणं आवश्यक - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
· तुरीसह सर्व डाळींच्या साठवणूक
मर्यादेत तिप्पट वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
·
ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांची काल कोल्हापुरात हत्या
आणि
·
स्वच्छ भारत अभियान पूर्णपणे यशस्वी करावं - प्रधान सचिव राजेशकुमार
यांचं आवाहन
****
संसदेत महिलांचं प्रतिनिधीत्व वाढण्यासाठी महिला आरक्षण लागू
करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. ते काल चेन्नईत वुमन्स
इंडियन असोसिएशनच्या शताब्दी समारोहाचं उद्घाटन केल्यावर बोलत होते. जगभरातल्या संसदांमध्ये
महिलांचं प्रमाण २२ पूर्णांक आठ टक्के असताना, भारतात मात्र हे प्रमाण फक्त ११ पूर्णांक
तीन टक्के असल्याचं ते म्हणाले. महिलांचा सन्मान हीच सभ्य समाजाची प्राथमिक ओळख आहे,
मात्र आपण त्यापासून अजून फार दूर असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाले.
****
राज्यात यंदा तुरीची वाढती आवक लक्षात घेता तुरीसह सर्व डाळींच्या घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठीच्या साठवणूक मर्यादेत तिप्पट
वाढ करण्याचा निर्णय राज्य
मंत्रिमंडळानं घेतला आहे. काल मुंबईत झालेल्या या बैठकीनंतर, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी याबाबत माहिती देताना, या निर्णयामुळे तुरीचे दर स्थिर होण्याबरोबरच डाळींची
खरेदी वाढण्यास मदत होणार असल्याचं सांगितलं.
दरम्यान, नाफेडनं जास्तीची १ लाख
टन तूर आणि ७५ हजार टन हरभरा खरेदी करण्याची तयारी दाखविली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. धान्य साठवणुकीसाठी राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत
सार्वजनिक तसंच खासगी सहभागातून भाडे तत्त्वावर गोदामे उपलब्ध करुन घेण्यास काल झालेल्या
बैठकीत मंजुरी देण्यात आली.
केंद्र शासनाच्या शिकाऊ उमेदवारी अधिनियमात सुधारणा
करण्यासाठीच्या प्रारुप विधेयकाच्या मसुद्यालाही काल
मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल सी विद्यासागर राव करणार असलेल्या अभिभाषणाच्या मसुद्यावर या बैठकीत चर्चा झाली. येत्या ९ मार्चपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला
सुरूवात होणार आहे.
महानगरपालिका आणि जिल्हा
परिषदांच्या निवडणुकीनंतर काल प्रथमच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री उपस्थित होते. राज्यसरकारच्या
कारभारात पारदर्शकता येण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत विरोधी पक्षनेते, लोकायुक्त तसंच
पत्रकारांना उपस्थित राहता यावं, अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली आहे.
****
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये आणि शासकीय तंत्रनिकेतन संस्थांसाठी
स्पेनच्या इडिबन टेक्निकल टीचिंग इक्विपमेंट संस्थेची साधनसामग्री, उपकरणे वापरण्यासाठी चाचणी प्रकल्प
राबवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी काल या कंपनीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या
बैठकीनंतर ही माहिती दिली. सध्या औरंगाबाद सह चार तंत्रनिकेतन महाविद्यालयं तसंच
दोन अभियांत्रिकी महाविद्यालयात हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यासाठी प्रत्येकी २० कोटी रुपये निधी स्पेनकडून दिला जाणार
आहे.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी
असलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - एन ई ई टी मध्ये उर्दू माध्यमाचा समावेश करावा,
अशा आशयाची मागणी करणारी याचिका
विद्यार्थी इस्लामिक संघटनेनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारनं या प्रस्तावास संमती दर्शवली असल्याचं याचिकाकर्त्यांकडून
न्यायालयात सांगण्यात आलं आहे. यावरील पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी
१० मार्चला होणार आहे.
****
माध्यान्न
भोजन योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधारकार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र
सरकारनं घेतला आहे. या योजनेतील पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला
असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना येत्या ३ जूनपर्यंत
आधारकार्ड काढण्याची मुदत देण्यात आली आहे.
****
ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांची काल कोल्हापुरात अज्ञात हल्लेखोरानं राहत्या
घरी धारदार शस्त्रानं वार करून हत्या केली. काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली. आर्थिक व्यवहारावरून ही हत्या झाली
असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला असून, या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात
आली आहे. बीड जिल्ह्यातले मूळ रहिवासी असलेले डॉ. किरवले यांनी औरंगाबाद इथल्या मिलिंद महाविद्यालयात शिक्षण घेतलं तसंच ज्येष्ठ साहित्यिक डॉ गंगाधर पानतावणे यांच्या मार्गदर्शनात
पीएच डी प्राप्त केली होती. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख पदावरून
ते काही महिन्यांपूर्वीच निवृत्त झाले होते. जळगाव इथं झालेल्या ३१ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. दलित चळवळ
आणि साहित्य, समग्र लेखक बाबुराव बागुल ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. दलित आणि
ग्रामीण शब्दकोश निर्मितीत त्यांचं मोलाचं योगदान होतं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं
जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
स्वच्छ भारत अभियान पूर्णपणे यशस्वी करावं, असं आवाहन राज्याचे
प्रधान सचिव राजेशकुमार यांनी केलं आहे. काल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या
बैठकीत ते बोलत होते. विभागात परतूर, जाफ्राबाद, देवणी, खुलताबाद, हे तालुके उघड्यावर
शौचापासून मुक्त झाल्याबद्दल राजेशकुमार यांनी अभिनंदन केलं. जळकोट, उदगीर, शिरुर अनंतपाळ,
लोहारा, अर्धापूर, मंठा या तालुक्यांत होत असलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केलं,
तर केज, आष्टी, पाटोदा, कळंब, देगलूर, परंडा, लोहा, किनवट, कंधार, या तालुक्यात सर्वांनी
पुढाकार घेऊन जोमानं काम करण्याची गरज व्यक्त केली. खुलताबाद तालुक्यात खिर्डी इथं
राजेशकुमार यांच्या उपस्थितीत दोन शोषखड्ड्यातलं सोनखत काढण्याचं प्रात्यक्षिकही काल
घेण्यात आलं.
****
या वर्षाअखेरपर्यंत मराठवाड्यातल्या
एकूण बाराशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामं पूर्ण करण्यात येणार असल्याचं सार्वजनिक
बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मुकुंद सुरकुटवार यांनी सांगितलं. ते काल औरंगाबाद
इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. यासाठी येत्या आर्थिक वर्षात ५१६ कोटी २७ लाख रुपये
तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. मराठवाड्यातल्या पुलांच्या दुरुस्तीचं
काम ३१ मे पर्यंत पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
महाराष्ट्र वक्फ मंडळाच्या
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नसिमाबानो पटेल यांना नाशिक जिल्ह्यातल्या जमीन घोटाळा
प्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. फेब्रुवारी
२०१६ मध्ये झालेल्या या प्रकरणी प्राथमिक तपासणीत दोषी ठरल्यामुळे ही कारवाई करण्यात
आली.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या
यशाचं रहस्य त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यात असून आज देशाला त्याची गरज असल्याचं व्यवस्थापन
तज्ज्ञ आणि शिवचरित्रकार डॉ. नामदेवराव जाधव यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं आयोजित
फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प काल जाधव यांनी गुंफलं, त्यावेळी ते
बोलत होते. कौशल्य असेल तर शिक्षणाची गरज नसते असं सांगत शिवाजी महाराजांनी आठ प्रकारची
कौशल्ये वयाच्या बाराव्या वर्षी आत्मसात केली आणि सर्व प्रकारचे धोके पत्कारून त्यांनी
स्वराज्य उभारलं, असं जाधव म्हणाले.
****
केंद्र शासनाच्या श्यामा
प्रसाद मुखर्जी रुरबन योजनेमध्ये समाविष्ट, जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यामधल्या
१६ गावांमध्ये विविध विकास कामं करण्यासाठी सविस्तर अहवाल तातडीनं सादर करण्याचे निर्देश
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. या योजनेसंदर्भात जालना इथं आयोजित आढावा बैठकीत
ते काल बोलत होते. ग्रामीण आणि शहरी भागातल्या विकासाचा असमतोल दूर करणं हे या योजनेचं उद्दीष्ट आहे.
****
अंगणवाडी कर्मचाऱ्यांकरिता
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करण्यासाठी अर्थमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केला
असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. या योजनेंतर्गत
अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये आणि अपघात झाल्यास १ लाख रुपये मदत मिळणार आहे.
राज्यातल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यासाठी २४ लाख ७३ हजार
५०० रुपये शासनाकडून दिले जाणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
मानधन वेळेवर देण्यासह
इतर मागण्यांसाठी काल परभणी जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी धरणे
आंदोलन केलं. आंदोलकांच्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आलं.
//*******//
No comments:
Post a Comment