Monday, 6 March 2017

AIR News Bulletin, Aurangabad 06.03.2017 6.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 March 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ

·      शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय योग्य वेळ आल्यावर घेणार - मुख्यमंत्री

·      भाजप आणि शिवसेनेनं जनतेला फसवल्याची विरोधी पक्षाची टीका; चहापानावर बहिष्कार

·      भाजपच्या नंदा जिचकार यांची नागपूरच्या तर संजय नरवणे यांची अमरावतीच्या महापौरपदी निवड

आणि

·      दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची भारतावर ४८ धावांची आघाडी

****

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत प्रारंभ होत आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं अधिवेशनास सुरूवात होईल. त्यानंतर १८ मार्च रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करतील. या अधिवेशनात २३ प्रस्तावित तर तीन प्रलंबित विधेयकं सादर होतील. सात एप्रिलपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय योग्य वेळ आल्यावर घेतला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आजपासून सुरु होत असलेल्या  अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते.

राज्यातलं सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही, पण कर्जमाफीची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी न झाल्यास त्याचा दुरुपयोग होऊ शकतो, हे यापूर्वी दिसून आलं आहे. तसंच संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात कर्जमाफी देण्यात आली. मात्र ती शेतकऱ्यांना नव्हे तर बॅंकांना होती. तसं यावेळी होता कामा नये, असं फडणवीस  म्हणाले. सरकारनं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं नसल्याचं सांगताना मुख्यमंत्र्यांनी गेल्या हंगामात पीक नुकसान भरपाईपोटी ८९४ कोटी रूपयांचं वाटप केलं असल्याचं सांगितलं. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना ४०२ कोटी रूपयांची मदत वाटप केली जाणार असल्याचं ते म्हणाले.

तूरीबरोबरच हरभरादेखील शेतकऱ्यांकडून हमी भावानं खरेदी करणार असल्याचं मुख्यमंत्री सांगितलं. आतापर्यंत राज्यात १७ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. उत्पादन वाढल्यामुळे तूर साठवण्यासाठी बारदाना आणि गोदामं कमी पडत असून यावर मात करण्यासाठी १६ लाख गोण्यांची खरेदी करण्यात आली आहे तर  साठवणुकीसाठी खाजगी गोदामं भाड्यानं घेण्याचे निर्देश दिले आहेत, असं ते म्हणाले.

शिवसेनेसोबत मतभेद असले तरी राज्याच्या हितासाठी दोन्ही पक्ष एकत्र असल्याचं ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना यश मिळालं असल्यामुळे विरोधी पक्ष हताश झाल्याचं ते म्हणाले.

****

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला.

भाजप आणि शिवसेनेनं जनतेला फसवलं असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते काल वार्ताहरांशी बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते. शिवसेनेच्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी राजीनामे देण्याचे नाटक केले, मात्र त्यांना फक्त मुंबई महापालिकेतच रस असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पारदर्शक सरकारचा अपारदर्शक कारभार समोर आणू असं ते म्हणाले.

      विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी हीच प्रमुख मागणी असणार असल्याचं सांगितलं. सरकारनं कर्जमाफीचे निर्देश द्यावे या मागणीसाठी राज्यपालांचीही भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

ॲसिड हल्ल्यातल्या पिडीतांना शासनाकडून तीन लाखांऐवजी आता पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. मुंबई इथं एका कार्यक्रमात काल ते बोलत होते. ॲसिड पिडीतांचा आत्मविश्वास वाढवण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. ॲसीड हल्लेखोरांना कडक शिक्षा करण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यातल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा निर्णय उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं  घेतला आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर २१ प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा पद्धतीमध्ये सोयी-सुविधा तसंच विशेष सवलती देण्यासाठी राज्य शासनानं एक अभ्यास समिती गठीत केली होती. या समितीच्या शिफारशींच्या आधारे हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार, प्रत्येक दिव्यांगाच्या वर्गवारीनुसार त्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयं, ‍विद्यापीठं यांची राहणार आहे.

****

नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या नंदा जिचकार निवडून आल्या आहेत. काल झालेल्या निवडणुकीत जिचकार यांनी काँग्रेसच्या स्नेहा निकोसे यांचा ८२ मतांनी पराभव केला. जिचकार यांना १०८, तर निकोसे यांना २६ मतं मिळाली. तर बसपाच्या वंदना चांदेकर यांना १० मतं मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही भाजपचेच दिपराज पार्डीकर विजयी झाले. अमरावतीच्या महापौरपदी भाजपच्या संजय नरवणे यांची तर उपमहापौरपदी संध्या टिकले यांची निवड झाली आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

येत्या उन्हाळ्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून त्यामुळे जीवीतहानी होऊ नये याकरिता राज्य शासनानं जिल्हा, महानगरपालिका तसंच विभागीय नियंत्रण कक्षासह स्थानिक संस्था आणि आरोग्य विभागांना विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उष्णतेच्या संभाव्य लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदारीबाबतच्या सूचनांना व्यापक प्रसिद्धी देण्याच्या सूचनाही शासनानं संबंधित विभागांना दिल्या आहेत. नागरिकांना द्यावयाच्या सूचनांची यादीही शासनानं या विभागांना पाठवली आहे. या यादीत, नागरिकांनी बाहेर पडताना छत्री, टोपी, बूट वापरावेत, जास्तीत जास्त पाणी प्यावं तसंच लस्सी, ताक, लिंबू पाणी अशा नैसर्गिक पेयांचा नियमित वापर करावा, सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळावा, गुरांना छावणीत ठेवावं, अधिक तापमानात शारिरीक श्रमाची कामं टाळावीत आदी सूचनांचा समावेश आहे. त्याशिवाय स्थानिक संस्थांनी रस्त्याच्या कडेला शेड उभारावीत तसंच जागोजागी पाणपोईच्या सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचनाही शासनानं दिल्या आहेत.

      सर्व स्तरावरचे नियंत्रण कक्ष, स्थानिक संस्था, आरोग्य विभाग, स्थानिक राजकीय नेते आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे या कार्यात सामील व्हावं असंही शासनानं सूचित केलं आहे.

****

तरुण वकीलांनी केवळ वकीलीच्या पदवीबरोबरच निरंतर अभ्यास केला पाहिजे, असं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती ता. वि. नलावडे यांनी व्यक्त केलं. हिंगोली इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कामाचं भूमीपूजन काल न्यायमूर्ती नलावडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कायदे हे नीतीमूल्यांवर आधारित आहेत, माणूस बदलला तरी नीतीमूल्य बदलत नाहीत असं ते म्हणाले. विधी अभ्यासक्रमात महापुरुषांच्या चरित्राचाही समावेश करावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बंगळुरु इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं आपल्या पहिल्या डावात बचावात्मक खेळी करत, सहा बाद २३७ धावा करुन भारतावर ४८ धावांची आघाडी घेतली आहे. कालचा  खेळ थांबला तेव्हा मॅथ्यू वेड आणि मिशेल स्टार्क खेळत होते. भारताकडून रविंद्र जडेजानं तीन, तर इशांत शर्मा, उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी एक बळी घेतला. भारताचा पहिला डाव १८९ धावांवर संपुष्टात आला होता. चार सामन्यांच्या मालिकेत पुणे इथला पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलिया एक शून्यनं आघाडीवर आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये आज शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी सोडत काढली जाणार आहे. बालकांच्या मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा २००९ अन्वये प्राथमिक शिक्षणासाठी निर्धारित २५ टक्के जागांवर प्रवेश देण्याची तरतूद आहे. या जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी जिल्हा भरातून आठ हजार पाचशे सहासष्ट अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातल्या चारशे एकोणसत्तर शाळांमधल्या साडेपाच हजार जागांवर या प्रक्रियेच्या माध्यमातून प्रवेश दिला जाणार आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या लिंबेजळगाव इथं आयोजित दोन दिवसीय  जिल्हास्तरीय इज्तेमाचा काल समारोप झाला. यावेळी विश्व शांतीसाठी विशेष दुआ करण्यात आली. दोन दिवसांच्या कार्यक्रमात धार्मिक व्याख्यानांसह सामुदायिक विवाह सोहळाही पार पडला.

//*******//

No comments:

Post a Comment