Tuesday, 7 March 2017

AIR News Bulletin, Aurangabad 07.03.2017 10.00am


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०७ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

उद्या साजरा होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं यावर्षी महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या निवड समितीनं “नारी शक्ती पुरस्कार २०१६” साठी देशभरातून ३१ नावे निश्चित केली आहेत. यात महाराष्ट्रातल्या मुमताझ काझी आणि रीमा साठे यांचा समावेश आहे. मुमताझ काझी या आशियातल्या पहिल्या महिला डिझेल रेल्वेचालक  आहेत, तर रीमा साठे या “हॅपी रुटस्‌” च्या संस्थापक आहेत. त्यांनी १२ हजार छोटया आणि आदिवासी शेतकऱ्यांचे थेट कृषि उत्पादन सोर्सिंग नेटवर्क विकसित केले आहे.

****

दहशतवाद हे जागतिक सुरक्षेसमोरील व्यापक आणि गंभीर आव्हान असून, याविरुद्ध कृती करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं १९व्या आशियाई सुरक्षा परिषदेत ते काल बोलत होते. गेल्या दशकापासून भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश दहशतवादाच्या समस्येनं ग्रासले असल्यानं उभय देशांमध्ये समन्वित प्रयत्न आवश्यक असल्याचं ते म्हणाले. पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहम्मद अली दुर्राणी यांनी, मुंबईवरील २६/११ चा हल्ला हा पाकिस्तान मधल्या दहशतवादी संघटनेनं केला असल्याचं सांगितलं. या हल्ल्याचा उल्लेख त्यांनी सीमापार दहशतवाद असा केला.

****

कंपन्यांनी संशोधन आणि विकासासाठीही पैशांची गुंतवणूक करावी, असं आवाहन पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं हाइड्रो फ्लुरोकार्बन्स व्यवस्थापन आराखडयाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्‌घाटन दवे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरणीय हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****



यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या लोकप्रशासन विषयाचे प्राध्यापक डॉ. ई. वायुनंदन यांची निवड झाली आहे. राज्यपाल तथा कुलपती सी.विद्यासागर राव यांनी काल ही घोषणा केली.

****

राज्य राखीव पोलीस दल सक्षम आणि कर्तव्यदक्ष दल म्हणून ओळखले जाते, ही उज्ज्वल परंपरा कायम राखण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योगदान द्यावं, असं आवाहन पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी केलं आहे. मुंबई इथं महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाचा एकोणसत्तरावा वर्धापन दिन साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते.

//****//

No comments:

Post a Comment