Wednesday, 8 March 2017

AIR News Bulletin, Aurangabad 08.03.2017 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 March 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ मार्च २०१ दुपारी .००वा.

*****

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी सध्या निवडणूक सुरू असून, भारतीय जनता पक्षानं या पदासाठी उमेदवार दिलेला नसल्यानं शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांची महापौरपदी तर उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर यांची निवड निश्चित आहे.

****

सोलापूरच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या शोभा बनशेट्टी यांची निवड झाली आहे. आज झालेल्या निवडणुकीत बनशेट्टी यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या कुमुद अंकाराम यांच्यावर २८ मतांनी विजय मिळवला. बनशेट्टी यांना ४९ मतं मिळाली तर कुमुद अंकाराम यांना २१ मतं मिळाली. काँग्रेसच्या प्रिया माने यांना १८ मतं मिळाली. या निवडणुकीत एमआयएमचे ९, बहुजन समाज पक्षाचे चार तसंच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक, असे १४ उमेदवार तटस्थ राहिले.

****

आमदार प्रशांत परिचारक यांच्या वादग्रस्त विधानाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करावी आणि समितीचा अहवाल येईपर्यंत परिचारक यांना निलंबित करावं, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. परिचारक यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी विरोधकांकडून केल्या जात असलेल्या घोषणाबाजीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी, संबंधित समितीचा अहवाल सरकारला पूर्णपणे मान्य असेल, असं सांगितलं.

****

येत्या गुढीपाडव्यापासून राज्यात ‘समृद्ध शेतकरी उन्नत शेती‘ अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काल विधानसभेमध्ये दिली. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीनं वाढवण्याच्या उद्दिष्टानं हे अभियान राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून २०१६च्या खरीप हंगामासाठी, पात्र सहभागी शेतकऱ्यांना एक हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाल्याची, तसंच या योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

****

राज्यातल्या अमली पदार्थांच्या तस्करीची पाळंमुळं शोधून ती समूळ नष्ट केली जातील, असं गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी काल विधानसभेत सांगितलं. हे तस्कर राज्यातल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत असल्याचा मुद्दा सदस्य बाबुराव पाचर्णे यांनी उपस्थित केला, त्यावेळी झालेल्या चर्चेत ते बोलत होते. राष्ट्रीय गुन्हे शाखेकडून याबाबत कारवाई होत असून, कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं पाटील यांनी यावेळी नमूद केलं.

****

भोपाळ उज्जैन रेल्वेत काल झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचं पथक आज भोपाळ इथं दाखल झालं. शाजापूर जिल्ह्यात जबडी रेल्वे स्थानकाजवळ स्फोट झालेल्या ठिकाणी हे पथक पाहणी करण्याची शक्यता आहे. सुमारे दहा प्रवासी जखमी झालेल्या हा स्फोट आधुनिक स्फोटकाच्या माध्यमातून घडवून आणल्याचं प्रथमदर्शनी आढळलं असून, या मागे इसिस या दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

****

वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईक यानं येत्या चौदा तारखेला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या दिल्लीतल्या मुख्यालयात हजर व्हावं, अशी नोटिस राष्ट्रीय तपास यंत्रणेनं जारी केली आहे. धार्मिक तेढ पसरवण्याच्या तसंच ‘इस्लामिक रिसर्च फाउंडेशन‘ या संस्थेसाठी अवैध रीतीनं निधी मिळवण्याच्या आरोपांखाली नाईकवर गुन्हे दाखल झालेले आहेत.

****

उत्तरप्रदेश आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचं मतदान आज सुरू असून, अकरा वाजेपर्यंत उत्तरप्रदेशमध्ये साडेचोवीस तर मणिपूरमध्ये बारा वाजेपर्यंत छप्पन्न टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. या दोन राज्यांसह गोवा, उत्तराखंड आणि पंजाब या राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या अकरा तारखेला हाती येणार आहे.

****

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्यानं आज नवी दिल्लीमध्ये ‘नारी शक्ती पुरस्कारांचं‘ वितरण करत आहेत. महिला सशक्तीकरणासंदर्भात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला आणि संस्थांना हे पुरस्कार दिले जातात.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला शक्तीला आपण सलाम करत असल्याचं एका ट्विटर संदेशामधून सांगितलं आहे. या दिनाच्या औचित्यानं पंतप्रधान आज गुजरातमधल्या गांधीनगर इथे महिला सरपंचांच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधितही करणार आहेत. या परिषदेला देशभरातल्या चार हजार महिला सरपंच उपस्थित असतील.

****

बीड जिल्ह्यात महिलांनी दारुबंदीची मागणी केली आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हाभरातल्या महिलांनी दारुबंदीसाठी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

दरम्यान, केंद्रसरकारच्या ‘माता, बाल आणि किशोरवयीन मुलांचं आरोग्य जनजागृती अभियान‘ राबवण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या पिंपळनेर, या गावाची निवड झाली आहे. यानिमित्त या गावात आरोग्यविषयक जनजागृती करणारे विविध कार्यक्रम आज आणि उद्या घेण्यात येत आहेत.

//*******//

No comments:

Post a Comment