Friday, 10 March 2017

AIR News Bulletin, Aurangabad 10.03.2017 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 March 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० मार्च २०१ दुपारी .००वा.

*****

लोकसभेत आज कामकाज सुरु होताच अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाच्या खासदारांनी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज २० मिनिटांसाठी स्थगित केलं.

कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर, संरक्षण क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आणि सैनिकांच्या मानसिक स्थितीबाबत सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबत संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सदनाला माहिती सादर केली.  

राज्यसभेत, गृहमंत्री राजनाथसिंह यांनी निवेदन सादर करत, मध्यप्रदेशात गेल्या मंगळवारी, भोपाळ उज्जैन रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणी लखनौत झालेल्या पोलिस कारवाईची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून संपूर्ण चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं.

दरम्यान, या बॉम्बस्फोट प्रकरणी उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकानं भारतीय हवाई दलाचे माजी सैनिक गौस मोहम्मद खान यांच्यासह दोन जणांना अटक केली आहे. खान हा या बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महानिरिक्षक दलजित सिंह चौधरी यांनी सांगितलं. याप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

****

अत्यंत वेगानं हल्ला करु शकणारी स्वदेशी बनावटीची युद्धनौका “आय एन एस तिलांचंग” नौदलाचे पश्चिम कमांड प्रमुख व्हाइस ॲडमिरल गिरीश लुथ्रा यांच्या उपस्थितीत कारवार इथं नौदलाच्या सेवेत दाखल झाली. वॉटर जेट फास्ट ॲटक क्राफ्ट प्रकारच्या चार नौकांपैकी आयएनएस तिलांचंग ही तिसरी नौका आहे. याआधीच्या आयएनएस “तरमुग्ली” आणि “तिहायू” या २०१६ मध्ये नौदलाच्या सेवेत दाखल झाल्या होत्या.

****

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात माध्यमांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मात्र न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली. हा माध्यमांवर सरळसरळ आरोप असून, यामुळे माध्यमांचं स्वातंत्र्य अबाधित राहत नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.   

****

कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातल्या महिपाळगड इथले जवान महादेव तुपारे यांचा श्रीनगर इथं हिमवृष्टीमुळे मृत्यू झाला. आठ मार्चला ते दराज या भागात गस्तीवर असताना त्यांचा मृत्यू झाला. काश्मीर खोऱ्यात अजूनही बर्फवृष्टी होत असल्यामुळे त्यांचं पार्थिव महिपाळगड इथं आणण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

****

भारतीय रेल्वेनं रेल्वे प्रतिष्ठापनात पाण्याच्या वापरात २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे उद्दीष्ट गाठण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम  - युएनईपीसोबत करार केला आहे. यासाठी देशातल्या मोठ्या रेल्वे स्थानकांवर जल व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या कराराचं स्वागत केलं असून, रेल्वेत कार्बनचा वापर कमी करण्याला प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं.

****

पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणी उद्या होणार आहे. यात उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगानं मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर या पाच राज्यात चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. मतमोजणी केंद्रांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष सूचना जारी कण्यात आल्या आहेत.

****

औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज लोकसभेत शून्यप्रहरात शेतकरी आत्महत्यांच्या घटनांकडे लक्ष वेधलं. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी कर्जमुक्ती जाहीर करावी, अशी मागणी खैरे यांनी केली.

****

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली. यानिमित्त औरंगाबाद इथं आज विविध ठिकाणी चर्चासत्रं, व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातली सर्व विकासात्मक कामं पूर्ण करण्यासंदर्भात उपलब्ध निधीचं तातडीनं वितरण करण्याबाबत निर्देश औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. ते मंत्रालयात आयोजित जिल्हा वार्षिक नियोजनाबाबत आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीत विविध कामांबाबत कदम यांनी आढावा घेतला.

****

औरंगाबाद इथं आज पंडित नाथ नेरलकर फाऊंडेशन ट्रस्ट तर्फे आयोजित रंग होलि के या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ ललीत कला अकादमीच्या सभागृहात संध्याकाळी साडे सहा वाजता हा कार्यक्रम होईल. 

//****//

No comments:

Post a Comment