Sunday, 12 March 2017

AIR News Bulletin, Aurangabad 12.03.2017 6.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 March 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्ष तर पंजाबमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेवर, गोवा आणि मणिपूर त्रिशंकू

·      छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे १२ जवान ठार

·      पुणे - सोलापूर महामार्गावर अपघातात अकरा जण मृत्यूमुखी

आणि

·      बँकेच्या बचत खात्यातून पैसे काढण्यावरचे निर्बंध रद्द

****

उत्तर प्रदेश आणि गोव्यासह पाच राज्यांचे निवडणूक निकाल काल जाहीर झाले. भारतीय जनता पक्षानं उत्तर प्रदेशसह उत्तराखंडमध्येही दणदणीत विजय मिळवला असून, पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मणीपूरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला तर गोव्यात सत्ताधारी भाजपला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. उत्तर प्रदेशात एकूण चारशे तीन जागांपैकी भाजपनं ३१२ जागा जिंकल्या. सत्ताधारी समाजवादी पक्षाला ४७, बहुजन समाज पक्षाला १९ तर काँग्रेस पक्षाला अवघ्या सात जागांवर विजय मिळाला.

उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या ७० जागांपैकी, ५६ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेस पक्षाला अकरा जागा मिळाल्या. लोहघाट मतदारसंघाचा निकाल अद्याप जाहीर झाला नाही. मतमोजणी दरम्यान एका मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे त्याची मतमोजणी करता आली नाही. या केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. दोन जागांवरून निवडणूक लढवलेले काँग्रेसचे मुख्यमंत्री हरिश रावत दोन्ही जागांवर पराभूत झाले.

पंजाबमध्ये सत्ताधारी शिरोमणी अकाली दल आणि भाजप युतीचा दारूण पराभव झाला. काँग्रेस पक्षानं ११७ पैकी ७७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं. आम आदमी पक्षाला २०, शिरोमणी अकाली दलाला पंधरा तर भाजपला फक्त तीन जागा मिळवता आल्या.

मणीपूरमध्ये ६० जागांपैकी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक २८ जागा मिळाल्या, भाजपला २१, तृणमूल काँग्रेसला एक तर स्थानिक पक्षांचे उमेदवार दहा जागांवर विजयी झाले. इथं बहुमतासाठी काँग्रेसला तीन, तर भाजपला दहा मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

गोव्यात चाळीस जागांपैकी काँग्रेसला सर्वाधिक १७ तर भाजपला १३ जागांवर विजय मिळाला. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं तीन, गोवा फॉरवर्ड पक्षानं तीन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एक तर तीन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा काँग्रेसचे दयानंद सोपटे यांनी साडे तीन हजार मतांनी पराभव केला. गोव्यात बहुमतासाठी काँग्रेसला चार तर भाजपला आठ मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जनतेनं दाखवलेल्या विश्वासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जनतेचे तसंच कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, हा विजय म्हणजे विमुद्रीकरणाच्या निर्णयाला जनतेनं दिलेला पाठिंबा असल्याचं म्हटलं, तर भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी, जनतेनं पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब केलं, या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, या निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत, अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा, हरिश रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा, लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे आज पदाचा राजीनामा देणार आहेत.

****

उत्तर प्रदेशात मतदानाच्यावेळी मतदानयंत्रांमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप करत, बसप प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशात जुन्या पद्धतीनं मतपत्रिकेवर फेर मतदान घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. आयोगानं ही मागणी फेटाळून लावली आहे. मतदान प्रक्रिया राजकीय नेते आणि उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत झाली असल्याचं, आयोगानं म्हटलं आहे.

****

निवडणुकीत काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगानं रोखरहित व्यवहाराला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली. यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येईल असं ते म्हणाले.   

****

छत्तीसगडमध्ये काल नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या सराव शिबीरावर केलेल्या हल्ल्यात १२ जवानांना वीरमरण आलं. सुकमा जिल्ह्यात काल सकाळच्या सुमारास हा हल्ला झाला. नक्षलवाद्यांनी यावेळी जवानांची १० हत्यारं आणि रेडिओ सेट पळवून नेले. मृत जवानांमध्ये महाराष्ट्रातल्या तीन जवानांचा समावेश आहे. बालपेंडे मंगेश जी, आत्माराम नंदकुमार देवजी आणि प्रेमदास रामदास मेंढे अशी या तिघांची नावं आहेत.

****

पुणे सोलापूर महामार्गावर खासगी मिनीबस आणि ट्रकच्या अपघातात अकरा जण ठार झाले, काल पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अक्कलकोट इथं देवदर्शनासाठी जात असलेल्या मिनी बससमोर, पुण्याजवळ उरुळी कांचन इथं अचानक जनावर आल्यानं, चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकवर धडकली, अशी माहिती उरुळीकांचन पोलिस ठाण्यातून देण्यात आली. मृतांमध्ये पाच महिला, पाच पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

बँकेच्या बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी निर्बंध उद्यापासून रद्द होणार आहेत. सर्व प्रकारचे बँक खातेधारक आपल्या खात्यातून हवी तेवढी रक्कम काढू शकतील. आतापर्यंत बचत खात्यामधून पैसे काढण्याची साप्ताहिक मर्यादा ५० हजार रूपये एवढी होती. विमुद्रीकरणानंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर रिजर्व्ह बँकेनं निर्बंध घातले होते, टप्प्याटप्प्यानं हे निर्बंध रद्द करण्यात आले.

****

      उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडात मिळालेल्या यशाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. औरंगाबाद इथं गुलमंडी भागात फटाके फोडून आणि मिठाई वाटून भाजप कार्यकत्यांनी आनंद व्यक्त केला. परभणीतही भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

****

होलिका दहन अर्थात होळीचा सण आज साजरा होत आहे. नागरिकांनी हा सण साजरा करण्यासाठी वृक्षांची कत्तल न करता, प्रतिकात्मक स्वरुपात हा सण साजरा करावा, असं आवाहन पर्यावरणवादी संघटनांसह सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. तसंच उद्या साजरा होणारा धुलिवंदनाचा सणही पाण्याचा अपव्यव न करता, पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

****

सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथली अवैध गर्भपात आणि स्त्री भ्रूणहत्या ही घटना संतापजनक असून, या प्रकरणाचा तपास महिला आणि डॉक्टर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवला जाईल, असं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायद्याच्या माध्यमातून विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.

****

सामाजिक न्यायाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना शासनाचं नेहमीच पाठबळ राहील, असं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी म्हटलं आहे. नांदेड इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या विशेष पुरस्कारांचं वितरण काल बडोले यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

****

पाकिस्तानातून सुखरुप परतलेले भारतीय जवान चंदू चव्हाण काल धुळे जिल्ह्यातल्या बोरविहीर या त्यांच्या मूळ गावी पोहोचले. धुळ्याचे खासदार आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत चव्हाण यांचं गावात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. २९ सप्टेंबर २०१६ रोजी चंदू चव्हाण चूकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले होते. पाकिस्तान सरकारनं तब्बल चार महिन्यानंतर गेल्या २१ जानेवारीला चव्हाण यांना भारताच्या ताब्यात दिलं होतं.  

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी यांनी सुरू केलेला जातीअंताविरोधातील लढा सर्वांनी सक्रियपणे पुढे नेण्याची गरज असल्याचं मत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केलं. परभणी जिल्ह्यातील पालम इथं आयोजित पहिल्या बौध्द धम्म परिषदेत ते काल बोलत होते. गौतम बुद्धांच्या शिकवणीचं पालन करण्याची गरज असून बुध्दांचा धम्म जगाला प्रकाश दाखविणारा आहे असं बडोले यावेळी म्हणाले.

****

लातूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी शासन कटीबद्ध असल्याचं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. लातूर इथं वाहतुक नियंत्रण यंत्रणेचा प्रारंभ काल पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लातूर महानगर पालिकेला विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होळी आणि रंगोत्सवानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. या सणामधून परस्परांमध्ये स्नेह, मैत्री आणि बंधुभाव वृद्धिंगत होऊन सामाजिक एकोपा निर्माण होतो, असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे तर या उत्सवात स्नेह आणि आनंदाच्या रंगाची उधळण व्हावी तसंच पर्यावरण संवर्धनाच्या जाणिवा जोपासून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केलं आहे.

****

जालना जिल्ह्याच्या, भोकरदन तालुक्यातल्या कुंभारी इथले रहिवासी असलेले सीमा सुरक्षा दलाचे जवान प्रकाश साळवे यांचं जम्मू- काश्मीरधल्या कंधार इथं तैनात असताना हृदयविकारानं निधन झालं. त्यांचं पार्थिव आज सायंकाळी सात वाजता विमानाने औरंगाबाद इथं आणण्यात येणार आहे. कुंभारी या त्यांच्या मूळ गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

//*****//








No comments:

Post a Comment