Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 14 March 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ मार्च २०१७ सकाळी
६.५० मि.
****
·
गोव्यात
भारतीय जनता पक्षाला सरकार बनवण्यासाठी पाचारण करण्याच्या, राज्यपालांच्या निर्णयाला,
काँग्रेसचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान; आज तातडीनं सुनावणी घेण्यास न्यायालयाची मान्यता
·
शेतकऱ्यांना
कर्जमाफी मिळेपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू न देण्याचा शिवसेना पक्ष प्रमुखांचा आदेश - पर्यावरण मंत्री
रामदास कदम
·
राज्यातल्या
पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांची आज निवडणूक
आणि
·
राज्य
सरकार शेतकऱ्यांवर अन्याय
करत असल्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची टीका
*****
गोव्यात भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे
उमेदवार मनोहर पर्रीकर यांना सरकार बनवण्यासाठी पाचारण करण्याच्या, गोव्याच्या राज्यपाल
मृदुला सिन्हा यांच्या निर्णयाला, भारतीय काँग्रेस पक्षानं, काल सर्वोच्च न्यायालयात
आव्हान दिलं आहे. गोवा काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते, चंद्रकांत कवळेकर यांनी ही
याचिका दाखल केली असून, पर्रीकर यांच्या आजच्या शपथ विधीवर स्थगिती मागितली आहे. भारताचे
सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांना, त्यांच्या निवासस्थानी काल रात्री उशीरा या याचिकेबद्दल
माहिती देण्यात आली. आज तातडीनं या याचिकेची सुनावणी, विशेष न्यायपीठासमोर होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाला सध्या होळी निमित्त एक आठवड्याच्या सुट्ट्या आहेत. गोवा विधान
सभेत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असताना कायद्यानुसार त्याला सत्ता स्थापन करण्यासाठी
पाचारण न करता अवघी १३ सदस्य संख्या असलेल्या भाजपला सरकार बनवण्यास सांगण्यात आलं
असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
दरम्यान, गोवा विधानसभेत काँग्रेसचे सर्वाधिक १७ आमदार निवडून येऊनही, सत्ता
स्थापन करू न शकल्याबद्दल नाराज आमदारांच्या गटानं, काँग्रेसच्या
ज्येष्ठ नेत्यांना जबाबदार धरलं आहे. पक्ष नेत्यांनी ही परिस्थिती योग्य
पद्धतीनं हाताळली नसल्याची टीका, नवनिर्वाचित आमदार विश्वजीत राणे यांनी केली आहे. तर, जनतेनं
दिलेल्या मतांचा पक्षाला आदर राखता आला नाही, अशी
प्रतिक्रिया, काँग्रेसच्या एकमेव महिला आमदार, जेनीफर
मोन्सेरात यांनी व्यक्त केली आहे.
गोव्यात भारतीय जनता पक्षानं सत्ता
स्थापनेचा दावा करणं, ही बाब लोकशाहीत अनाकलनीय असल्याचं, काँग्रेस
पक्षानं म्हटलं आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी, गोव्यात
सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला सत्ता स्थापनेचा पहिला हक्क असताना, मनोहर
पर्रिकर यांनी सत्तेचं अपहरण केलं, अशी टीका केल्याचं, पी.टी.आयच्या
वृत्तात म्हटलं आहे. भाजपच्या या कृतीमुळे गोव्याच्या राजकारणात नैतिकतेचं
अध:पतन झालं असल्याचंही दिग्विजयसिंह म्हणाले.
****
गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर
पर्रिकर आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पणजीत
सायंकाळी राजभवनावर हा शपथग्रहण सोहळा होईल. या
सोहळ्यात जवळपास आठ आमदारही मंत्रिपदाची शपथ घेतील. यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे
प्रत्येकी दोन, तसंच, दोन अपक्ष आमदारांचा समावेश असेल, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,
विनय तेंडुलकर यांनी वृत्तसंस्थेशी बोलतांना सांगितलं. मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप याबाबत निर्णय
अद्याप व्हायचा असल्याचं, मनोहर
पर्रिकर यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
दरम्यान, पर्रिकर
यांनी काल संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला, केंद्रीय
अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात
आला आहे.
****
ईशान्य प्रांतातल्या मणिपूरचे मुख्यमंत्री
ओ. इबोबी सिंग यांनी काल रात्री राजीनामा दिला आहे. यामुळे या राज्यात नूतन सरकार स्थापन
करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६० सदस्यांच्या
सभागृहात काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक २८ सदस्य निवडून आले आहेत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर
असून दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे.
****
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत
अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देऊ नका, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
शिवसेनेच्या आमदारांना दिला आहे. अशी
माहिती, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड इथं बोलतांना
दिली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी
शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला
असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यांची ही भूमिका आहे. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय जाहीर होईपर्यंत
अधिवेशन चालू दिलं जाणार नसल्याचं कदम म्हणाले.
दरम्यान, आज राज्यात पंचायत समितीच्या
सभापती- उपसभापती पदाच्या निवडणुका असल्यानं, एक दिवस अधिवेशनाचं कामकाज लांबवण्यात
आलं आहे, असं, पी. टी. आय. या वृत्त संस्थेनं म्हटलं आहे. विधी मंडळाच्या काही सदस्यांनी
विधी मंडळाला आज एक दिवस सुटी देण्याची विनंती केली होती.
****
ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं झालेल्या
मनोज म्हात्रे हत्याप्रकरणी, १९ जणांवर संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा - मकोका
अंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचं, ठाण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज
रानडे यांनी सांगितलं. या सर्व जणांनी राजकीय स्वार्थासाठी हत्या केल्यानंतर
परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यापैकी
सात जणांना अटक करण्यात आली असून, इतरांचा शोध सुरू असल्याचं, पोलिसांकडून
सांगण्यात आलं. काँग्रेस नेते मनोज म्हात्रे यांची १४ फेब्रुवारीला राजकीय वैमनस्यातून
हत्या झाली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित
केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या
संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्यातल्या पंचायत समित्यांच्या सभापती
आणि उपसभापती पदांची आज निवडणूक होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या ९, लातूर जिल्ह्यातल्या
दहा, बीड जिल्ह्यातल्या ११, जालना जिल्ह्यातल्या आठ, नांदेड जिल्ह्यातल्या १६, हिंगोली
जिल्ह्यातल्या पाच, परभणी जिल्ह्यातल्या नऊ, आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आठ पंचायत
समित्यांमध्ये आज सभापती आणि उपसभापती निवडले जाणार आहेत. मराठवाड्यातल्या एकूण ७६
पंचायत समित्यांपैकी २१ पंचायत समित्यांमध्ये भाजपला, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला
प्रत्येकी १२ पंचायत समित्यांमध्ये तर पाच ठिकाणी शिवसेनेला बहुमत मिळालेलं आहे.
****
राज्य सरकार शेतकऱ्यांशी गोड बोलत अन्याय
करत असल्याची टीका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, खासदार
राजू शेट्टी यांनी केली आहे. ते काल लातूर इथं संघटनेच्या वतीनं काढण्यात आलेल्या शेतकरी
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बोलत होते. यापूर्वीचं कॉंग्रेस आघाडी सरकार दडपशाही
करुन शेतकऱ्यांवर अन्याय करत होतं, तर विद्यमान युती सरकार गोड बोलत अन्याय करत असल्याचं
शेट्टी म्हणाले. राज्य सरकारनं भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ - नाफेडमार्फत शेतकऱ्यांची तूर सरसकट खरेदी करावी, आणि
उन्हाळा सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या खंडीत करू नयेत, अशी
मागणी शेट्टी यांनी यावेळी केली.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तूर
हमी भाव खरेदी योजनेतील जाचक अटी कमी कराव्यात, तूर
खरेदी केंद्रावर फक्त शेतकऱ्यांचीच तूर खरेदी करावी, आदी
मागण्यांसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. संघटनेच्या
मागण्याचं निवेदन निवासी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.
****
धुलिवंदनाचा सण काल सर्वत्र उत्साहात
साजरा झाला. मित्रमंडळी, तसंच स्नेहीजनांना रंग लावण्याचा तरुणांचा, तसंच
लहानग्यांचा उत्साह सकाळपासूनच दिसून येत होता. परभणी
शहरात बहुतांश नागरिकांनी कोरडा रंग खेळून पाण्याचा अपव्यय टाळल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोल्हापुरात गेल्या काही वर्षांपासून
होळीचा सण पर्यावरणपूरक आणि प्रदुषणमुक्त पद्धतीनं साजरा केला जातो. केवळ
प्रतिकात्मक स्वरुपात पाच गोवऱ्यांच्या
होळीचं दहन करून, जमा
झालेल्या उर्वरित गोवऱ्या पंचगंगा मुक्तिधाम स्मशानभूमीत दान केल्या जातात. परवा
होलिकादहनानंतर काल दिवसभरात कोल्हापुरातल्या विविध मंडळांनी सुमारे सव्वा दोन लाख
गोवऱ्या या स्मशानभूमीला दान केल्या. याशिवाय होळीमध्ये नैवेद्य म्हणून आहुती
दिल्या जाणाऱ्या पुरणपोळ्याचं संकलन करून, त्या
लहान मुलांसाठी सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या संस्थांना दिल्या जातात, यंदा
सुमारे पाच हजाराहून अधिक पोळ्या संकलित करून वितरित करण्यात आल्या.
****
विदर्भ आणि मराठवाड्यातल्या भाविकांचं
श्रद्धास्थान असलेल्या, सैलानी बाबा यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या
जालना विभागानं, १२५ अतिरिक्त
बसेस सोडण्याचं नियोजन
केलं आहे. जालन्यापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर सैलानी
बाबांचं स्थान आहे. मराठवाड्यातले हजारो भाविक रेल्वेनं या यात्रेसाठी जालना
इथं येतात, यासाठी या अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत.
//******//
No comments:
Post a Comment