Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 March 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ मार्च २०१७ दुपारी १.००वा.
*****
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणीपूर
आणि गोवा या पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीची मतमोजणीमध्ये काही ठिकाणचे निकाल हाती
येण्यास सुरुवात झाली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये हाती आलेल्या प्राथमिक
कलांनुसार एकूण ४०३ जागांपैकी भारतीय जनता पक्ष ३०७ जागांवर आघाडीवर असल्याचं वृत्त
आहे. भाजप स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत असून, उत्तर प्रदेशातल्या सत्ताधारी समाजवादी
पक्षानं पराभव स्वीकारला आहे. समाजवादी पक्ष-काँग्रेस आघाडी ६९, तर बहुजन समाज पक्ष
केवळ १८ जागांवर आघाडीवर आहे. उतर प्रदेशमध्ये झालेली ही लढत पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या लोकप्रियतेची आणि विमुद्रीकरणानंतर सरकारची सत्वपरीक्षा असल्यानं या निवडणुकीला
मोठे महत्व प्राप्त झाले होते. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी हे आव्हान सहजपणे पार पाडत
भाजपला मोठी आघाडी मिळवून दिली आहे.
पंजाबमध्ये
काँग्रेसनं मोठी झेप घेत ५५ जागांवर आघाडी घेतली असून आम आदमी पक्ष २४ तर शिरोमणी अकाली
दल २३ जागांसहित तिसऱ्या स्थानी आहे.तर लंबी मतदारसंघामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश
सिंग बादल यांनी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यावर आघाडी मिळवली आहे.
काँग्रेसचे उमेदवार नवज्योत सिंग सिद्धू यांनी देखील आम आदमी पक्षाच्या उमेदवार आघाडी
मिळवली आहे.
उत्तराखंडमध्ये एकूण ७० जागांपैकी भाजप
स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत असून, आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजप ५२ जागांवर
आघाडीवर आहे. तर १५जागांसह काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे.त्याचबरोबर उत्तराखंडचे मुख्यमंत्री
हरीश रावत यांचा हरीद्वार ग्रामीण मतदार संघामधून बारा हजार मतांनी पराभव झाला.
गोव्यात एकूण ४० जागांपैकी आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार
भाजपनं तीन तर काँग्रेसनं दोन जागा जिंकल्या आहेत. मात्र, मंदरेम मतदारसंघात मुख्यमंत्री
लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा काँग्रेसच्या दयानंद सोपते यांनी पराभव केला.
मणिपूरमध्ये एकूण
६० जागांपैकी मुख्यमंत्री ओकाराम इबोबीसिंग यांनी मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला
यांचा पराभव करत आठ हजार मतांनी विजय मिळवला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपनं दोन तर काँग्रेसनं
चार जागा जिंकल्या. भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी १६
जागांवर आघाडीवर आहे.
****
छत्तीसगढ मधल्या सुकमा
जिल्ह्यात आज सकाळच्या सुमारास झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे
अकरा जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांनी शहीद झालेल्या जवानांकडून १० हत्यारं आणि रेडिओ
सेट पळवून नेले. नक्षलवादी आणि जवानांमध्ये अजूनही चकमक सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
देशभरातल्या उच्च
न्यायालय आणि खालच्या न्यायालयात प्रलंबित फौजदारी खटले निकाली काढण्यासाठी सर्वोच्च
न्यायालयानं ठराविक मुदत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयानं याबाबतचं पत्र
सर्व उच्च न्यायालयांना पाठवलं आहे. न्याय देण्यास उशीर झाल्यामुळे नागरिकांचा न्याय
व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जलद न्याय हा सामान्य नागरिकाचा मुलभूत अधिकार असून,आर्थिक
संसाधनांचा तुटवडा न्याय मिळण्यास उशीर होण्यासाठीची सबब होऊ शकत नाही असंही न्यायालयानं
नमूद केलं.
****
निवडणुकीत काळ्या
पैशाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगानं रोखरहित व्यवहाराला प्राधान्य देण्याचा निर्णय
घेतला आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी
बोलताना ही माहिती दिली. कोणत्याही राजकीय पक्षानं निनावी देणगी देण्याचा प्रयत्न करु
नये, असा कडक इशारा आयोगानं दिला आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येईल असं
ते म्हणाले.
****
रिलायंस जिओ आणि पेटीएम
या कंपन्यांनी त्यांच्या जाहिरातींमध्ये विना परवानगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं
छायाचित्र वापरल्याबद्दल माफी मागितली आहे. ग्राहक व्यवहार राज्यमंत्री सी आर चौधरी
यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. मंत्रालयानं या दोन्ही कंपन्यांना नोटीस पाठवली असल्याचं
त्यांनी सांगितलं. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जाहिराती प्रसारणासंबंधी
काही निर्देश जारी केले असल्याचं चौधरी यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद महानगर पालिकेच्या
स्थायी समितीनं शहरातल्या विविध विकास कामांसाठी ९३ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी
दिली आहे.यामध्ये रस्ते, घनकचरा व्यवस्थापन विभागांसाठी नवीन वाहन खरेदी आणि कचरा व्यवस्थापन
या कामांचा समावेश आहे. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत नियोजीत कामांनाही स्थायी समितीनं मंजुरी
दिली आहे.
//********//
No comments:
Post a Comment