Friday, 3 March 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 3 March 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात कुठलाही बदल झाला नसून, नव्यानं कोणतही शुल्क आकारलं जाणार नाही, असं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र बँकेच्या शाखेमध्ये रोख पैसे जमा करताना तसंच काढताना आयकराबाबत नवे नियम लागू होतील, असं एचडीएफसी बँकेनं ट्वीटरवरील आपल्या संदेशात स्पष्ट केलं आहे.

****

मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीसमोर राज्यपाल सी विद्यासागर राव करणार असलेल्या अभिभाषणाच्या मसुद्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीनंतर प्रथमच झालेल्या या बैठकीत शिवसेनेचे मंत्री उपस्थित होते.

****

मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येतील, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. काही गोष्टींची औपचारिकता पूर्ण झाल्यावर शिवसेना-भाजप नक्कीच एकत्र येतील, असं ते म्हणाले. मुंबई महापालिकेसाठीही सन्मानानं आणि न्यायानं तोडगा निघेल, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
मुंबईच्या महापौर पदासाठी येत्या ८ तारखेला निवडणूक होणार असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेत अखिल भारतीय सेनेच्या एकमेव नगरसेवक गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे आता भाजपचं संख्याबळ ८६ झालं आहे.

****

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी असलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - एन ई ई टी मध्ये उर्दू माध्यमाचा समावेश करावा, अशा आशयाची मागणी करणारी याचिका विद्यार्थी इस्लामिक संघटनेनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्यायालयानं यासंदर्भात केंद्र सरकार आणि भारतीय वैद्यकीय परिषदेला उत्तर देण्यास सांगितलं आहे. यावरील पुढील सुनावणी पुढच्या शुक्रवारी १० मार्चला होणार आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारनं नीट परीक्षेत उर्दू माध्यमाचा समावेश करण्यास संमती दर्शवली असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकीलांकडून सांगण्यात आलं आहे. सध्या नीट परीक्षा हिंदी, इंग्रजी, गुजराती, मराठी, उडिया, बंगाली, आसामी, तेलुगु, तमिळ आणि कन्नड या भाषामंध्ये घेतली जाते. 

****

रेल्वे मार्गांवर दुरुस्ती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद असल्याची माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी दिली आहे. पश्चिम रेल्वे मजदूर संघातर्फे मुंबई इथं योजित एका परिषदेत ते आज बोलत होते. यात रेल्वेमंत्री दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. आगामी काळात रेल्वेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

या वर्षाअखेर पर्यंत मराठवाड्यातले एकूण बाराशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामं पूर्ण करण्यात येणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मुकुंद सुरकुटवार यांनी सांगितलं. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. यासाठी येत्या आर्थिक वर्षात ५१६ कोटी २७ लाख रुपये तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. मराठवाड्यातल्या पुलांच्या दुरुस्तीचं काम ३१ मे पर्यंत पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

बचत गटांच्या माध्यमातून महिला आता उद्योजक बनल्या असल्याचं, केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी म्हटलं आहे. ते आज चंद्रपूर इथं ‘सरस महोत्सव स्वयंसिध्दा’ या नागपूर विभागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शनाचं उद्घाटन करताना बोलत होते. महिला बचत गटांनी अधिक दर्जेदार वस्तू तयार करण्याचं आवाहन असंही त्यांनी यावेळी केलं.

****

आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला आणि बालकांच्या विकासाठी काम करणारी युनिसेफ ही संस्था तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीनं उद्या शनिवारी ‘मराठवाडा आमदार गोलमेज़ परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्या सकाळी साडेदहा वाजता या परिषदेचं उदघाटन होणार आहे. विद्यापीठातल्या मुख्य इमारतीतील व्यवस्थापन कक्षात होणाऱ्या या परिषदे मराठवाड्यातल्या आमदारांच्या उपस्थितीत सर्वांसाठी आरोग्य आणि सर्वांसाठी शिक्षण यासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

****

धुळे जिल्हा परिषदेत अमृत आहार योजनेंतर्गत अंडी खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी चार अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. योजनेचे निकष डावलून प्रकल्पस्तरावरून परस्पर मर्जीतील अंडी पुरवठादारांची नेमणूक केल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केल्यावर ही कारवाई करण्यात आली. 

****

No comments:

Post a Comment