Saturday, 4 March 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 4 March 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ४ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

भारतीय जनता पक्ष मुंबईत महापौर पदाची निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या भाजप नगरसेवकांच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. याबरोबरच उपमहापौर, स्थायी समिती आणि बेस्टची निवडणूक देखील लढवणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुंबई महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आज शेवटचा दिवस असून, निवडणूक येत्या आठ मार्चला होणार आहे.

****

महाराष्ट्रात संरक्षण आणि हवाई उत्पादन क्षेत्रात गुंतवणुकीस चालना मिळण्यासाठी धोरण तयार केलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई इथं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं आयोजित डिफेन्स अँड एरोस्पेस मेक विथ महाराष्ट्रया विषयावरील परिषदेत ते आज बोलत होते. संरक्षण आणि हवाई क्षेत्रात सुमारे ३३ हजार ५०० कोटी रुपये गुंतवणूक होणार असून एक लाख रोजगार निर्मिती होईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी होईपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरू राहतील, त्यामुळे  शेतकऱ्यांनी  घाबरून जाऊन खरेदी केंद्रावर एकाच वेळी गर्दी करू नये, असं आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. ते आज मुंबई इथं वार्ताहरांशी बोलत होते. तूर खरेदी केंद्रांवर बारदाना तातडीनं उपलब्ध व्हावा यासाठी खरेदीची मागणी नोंदवण्यात आली असल्याचं ते म्हणाले. तूर खरेदी केंद्र आता १५ एप्रिलपर्यंत सुरु राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तूरीचं उत्पादन जास्त झाल्यानं आणि घाऊक बाजारात तूरडाळीच्या दरात घट होऊन शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी डाळ साठवणूक मर्यादेत तीन पटीनं वाढ करण्याचा शासनानं निर्णय घेतला असल्याचं देशमुख यावेळी म्हणाले. 

****

अमेरिकेतील भारतीय वंशाचे उद्योजक हार्निश पटेल यांची हत्या करण्यात आली आहे. दक्षिण करोलिनामध्ये पटेल यांच्या निवासस्थानाबाहेर ही हत्या करण्यात आली. अमेरिकेत भारतीय अभियंता श्रीनिवास कुचीभोटला यांच्या हत्येनंतर या दुसऱ्या प्रकरणानं संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. ही हत्या गुरुवारी झाली असल्याचं या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांनी म्हटलं आहे.

****

उत्तर प्रदेशच्या सहाव्या आणि मणिपूरच्या पहिल्या फेरीचं  मतदान आज पार पडलं. उत्तर प्रदेशात तीन वाजेपर्यंत ४९ टक्के, तर मणिपूरमध्ये एक वाजेपर्यंत ६९ टक्के मतदानाची नोंद झाली.

****

बीड जिल्ह्यात १७ ठिकाणी आरोग्य रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून, १०८ या क्रमांकावर फोन करुन ही रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध होणार असल्याचं बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यातल्या नाळवंडी इथं माता बाल आणि किशोवरयीन आरोग्य याबाबत जनजागृती अभियान राबवण्यात आलं, आज या अभियानाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यात बाळांतपणातील आजारामुळे दरवर्षी २० मातांचा मृत्यू होतो, हे टाळण्यासाठी जिल्हा रुग्णालयात महिलांची वेळेवर नोंदणी करुन निदान करुन घ्यायला पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले.

****

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांची काल दूपारी आर्थिक वादातून हत्या झाली. या प्रकरणातल्या मुख्य संशयितांना अटक करण्याची मागणी आणि पोलिसांच्या पक्षपाती वर्तनाचा निषेध करत कार्यकर्ते आणि किरवले यांच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे कोल्हापूरात तणावपूर्ण वातावरण असून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

****

राज्यात गेल्या दोन महिन्यात झालेल्या पाच रेल्वे दुर्घटनांमध्ये घातपाताची शक्यता लक्षात घेत सुरक्षेच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी मुंबई इथं एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथुर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा स्तरीय वरीष्ठ पोलिस अधिकारी, रेल्वे आणि रेल्वे पोलिस खात्याचे अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. कंत्राटी रेल्वे कर्मचाऱ्यांविषयी माहितीची पडताळणी, रेल्वेच्या पूल, बोगद्यांची दुरुस्ती, रेल्वेची फाटकं, रेल्वे रुळांवर नजर ठेवण्यासंदर्भातल्या विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरु इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा पहिला डाव १८९ धावांवर संपुष्टात आला. लोकेश राहुलनं ९०, तर करुण नायरनं २६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सुरु झाला असून, दिवस अखेर त्यांच्या १६ षटकात ४० धावा झाल्या. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत पुणे इथं झालेला पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलिया एक शून्यनं आघाडीवर आहे.

****

No comments:

Post a Comment