Tuesday, 7 March 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 7 March 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ७ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

नक्षलवादी चळवळींना पाठिंबा दिल्याप्रकरणी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी.एन.साईबाबा आणि इतर चार जणांना गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातला अन्य एक आरोपी विजय तिरकी यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयानं सुनावली आहे. नक्षलवादी हिंसक कारवायांसाठी दिल्ली विद्यापाठीतल्या युवा कार्यकर्त्यांना तयार करणं, त्यांना गडचिरोलीतल्या जंगलांमध्ये कारवायांसाठी पाठवणं, माओवादी कट्टर विचारांचा प्रसार करणं या आरोपाखाली त्याला २०१४ मध्ये अटक करण्यात आली होती.
या सुनावणी दरम्यान गडचिरोली न्यायालयाच्या आवारात तसंच शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

****

वाशिम जिल्ह्यात रिसोड इथं एका दलित महिलेवर सात जणांनी बलात्कार करुन तिला जाळून मारल्या प्रकरणी निवेदन करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी आज दिले. यासंदर्भात सदस्य दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करून या घटनेची ध्वनिचित्रफीत समाज माध्यमांवर फिरत असून मृत महिलेच्या वडीलांनी तक्रार केली असल्याचं सांगितलं. या प्रकरणी सरकारनं निवेदन करण्याची मागणी त्यांनी केली होती.

****

विधान परिषदेत आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीविषयी केलेल्या वक्तव्यावरुन विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनीही परिचारक यांना निलंबित करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परिचारक यांचं वक्तव्य निंदनीय असून, याचं समर्थन कोणीच करु शकत नाही, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. यासंदर्भात सभापती आणि मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांच्या गट नेत्यांची बैठक घेऊन निर्णय घ्यावा, असं आवाहन पाटील यांनी केलं. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी याबाबत चिंता व्यक्त करत, कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.

****

सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथं झालेल्या गर्भपात प्रकरणातला मुख्य आरोपी डॉ.बाबासाहेब खिद्रापुरे याला सांगली पोलिसांनी आज बेळगाव इथं अटक केली. म्हैसाळ इथल्या गर्भपात केंद्रावर छापा टाकल्यानंतर तिथे १९ भ्रूण पुरलेले आढळल्या प्रकरणी चौकशी सुरु झाल्यानंतर खिद्रापुरे तीन दिवसांपूर्वी फरार झाला होता. या रॅकेटमध्ये खिद्रापुरे याच्यासोबत आणखी पाच डॉक्टर आणि तीन दलाल कार्यरत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. खिद्रापुरे याला मिरजच्या न्यायालयात हजर करण्यात आलं असून, त्याला १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
याप्रकरणाचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. संबंधित भागाचा दौरा करुन गुरुवारी सकाळी सरकारतर्फे निवेदन सादर करण्यात येईल, असं आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी सांगितलं.

****

मराठवाड्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रमीण रोजगार हमी योजना-मनरेगा अंतर्गत मार्च २०१८ पर्यंत एक हजार पाचशे कोटी रूपयांपर्यंतची कामं करण्यात येणार असल्याचं विभागीय आयुक्त डॉक्टर पुरूषोत्तम भापकर यांनी आज औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. औरंगाबाद विभागात ६ मार्च ते १२ मार्च या कालावधीत मनरेगा सप्ताह साजरा केला जात असून उद्या या सप्ताहांतर्गत महिला दिनानिमित्त मराठवाड्यातल्या सर्व गावांमध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं असल्याचं ते म्हणाले. गुरूवारी सर्वसाधारण सभांही घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सागितलं. मराठवाड्यापायाभूत सुविधाबरोबरच जल साठवणुकीच्या सुविधा निर्माण करणारी कामं मनरेगाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.

****

उस्मानाबाद इथं होणारं ९७ वं अखिल भारतीय नाट्य संमेलन पुढे ढकलण्यात आलं आहे. हे संमेलन आता २१, २२ आणि २३ एप्रिल रोजी होणार आहे. यापूर्वी ते सात ते नऊ एप्रिलदरम्यान होणार होतं. नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी आज उस्मानाबाद इथं ही माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या परिक्षांचे वेळापत्रक पाहता स्थानिक नाट्य प्रेमी कलाकारांना या समेलनात सहभागी होण्यासाठी अधिक वेळ देता यावा म्हणून हे संमेलन पुढे ढकललं असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई इथं अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, कार्यवाह दिपक करंजीकर, स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर आणि उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

No comments:

Post a Comment