Thursday, 9 March 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 9 March 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ९ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे टीका होत असलेले भारतीय जनता पक्षाचे पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांना विधानपरिषद सभापतींनी दीड वर्षांसाठी निलंबित केलं. परिचारक यांच्या चौकशीसाठी नऊ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आपला अहवाल सादर करणार आहे.
या मुद्यावरुन विधान परिषदेचं कामकाज गेल्या दोन दिवसांपासून बाधित झालं होतं.  
      दरम्यान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेविषयी उपाययोजना करण्यासाठी विधिमंडळाच्या महिला सदस्य आणि तीन महिला पोलिस अधिकाऱ्यांची समिती नेमली जाईल, अशी माहिती गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली. शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
      शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाल्यानं विधान परिषदेचं कामकाज आज आधी १५ मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
शेतकरी कर्जमाफीसाठी आज विधानसभेत सत्ताधारी भाजपच्या सदस्यांसह सर्वपक्षीय आमदार एकवटल्याचं चित्र दिसून आलं. कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवनाच्या प्रांगणात शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करत सरकारविरोधी घोषणा दिल्या. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनीही कर्ज माफीसाठी घोषणाबाजी केली.
विधानसभेचं कामकाज सुरु होताच, या मागणीवर विरोधी तसंच सत्ताधारी पक्षाचे आमदार आक्रमक झाले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी आणि गदारोळ झाल्यानं कामकाज सुरवातीला तीन वेळा तहकूब झालं. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.  

****

शेतकरी कर्जमाफीसाठी भारतीय जनता पक्ष अनुकूल असेल तर, सरकारनं तातडीनं कर्जमाफी जाहीर करावी, असं आज विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. विधानसभेचे कामकाज स्थगित झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारचा घटकपक्ष असलेला शिवसेना पक्षही या मागणीसाठी आग्रही असल्यानं, सरकारनं आता शेतकऱ्यांचा अंत न पाहता कर्जमाफीची घोषणा करावी, असं विखे पाटील म्हणाले.

****

लोकसभेत आज प्रसुती सुविधा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे, या विधेयकात संघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी प्रसुती रजा बारा आठवड्यांवरून २६ आठवडे करण्याचा प्रस्ताव आहे. दोन अपत्यांसाठी ही सुविधा मिळू शकणार आहे. दहापेक्षा अधिक कर्मचारी काम करत असलेल्या आस्थापना या कायद्याच्या कक्षेत येणार असल्याचं कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं. या चर्चेत महाराष्ट्रातून भाजप खासदार डॉ.प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सहभागी होऊन आपली मतं मांडली.

****

‘जागतिक मूत्रपिंड दिन’ आज सर्वत्र साजरा करण्यात आला. ‘निरोगी मूत्रपिंडांसाठी निरोगी जीवनशैली’ असं यावर्षीचं घोषवाक्य आहे. यानिमित्त परभणी जिल्हा सामान्य रूग्णालयात मूत्रपिंडांचे आजार आणि स्थूलता यासंदर्भात जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मूत्रपिंडांचे आजार होऊ नयेत यासाठी वेळोवेळी तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हितावह ठरत असल्याचं जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी यावेळी सांगितलं.

****

लातूर इथं तूर खरेदी केंद्रांवर व्यापाऱ्यांची तूर खरेदी होत असल्याबद्दल शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी संघटनेनं केली आहे.

****

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागानं ३१२ बसेस मध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. नाशिक विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या वाढली असल्यानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

****

नांदेड जिल्हा परिषदेतल्या समाज कल्याण विभागाचा अधिकारी सुनिल खमीतकर यास आज दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून ही कारवाई केली.

****

बीड जिल्ह्यात धारूर इथं एका सराफा दुकानावर आज आयकर विभागानं छापा घातला. राम चिद्रवार यांचं हे दुकान असून, आयकर विभागाचे अधिकारी त्यांची चौकशी करत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या कारवाई दरम्यान, बाजारपेठेतले इतर दुकानदार दुकानं बंद करून निघून गेल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय, घाटीचा बाह्य रूग्ण विभाग बारा मार्चला रविवारी सुरू राहणार आहे. सोमवारी तेरा मार्चला होळीनिमित्त सुट्टी असल्याकारणानं बाह्य रूग्ण विभाग बंद राहणार असल्याचं घाटीच्या वैद्यकीय अधिक्षकांनी कळवलं आहे.

****

No comments:

Post a Comment