Saturday, 11 March 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 March 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·       शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून विधीमंडळाचं कामकाज सलग तिसऱ्या दिवशी ठप्प

·       शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असल्यानं, कर्जमाफी देण्याची शिवसेनेची भूमिका

·       उत्तर प्रदेश, गोव्यासह पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी

·       मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण वाङमय पुरस्कार खासदार शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राला जाहीर

आणि

·       हैदराबाद-अजमेर-हैदराबाद साप्ताहिक एक्स्प्रेस गाडीचा जयपूर पर्यंत कायमस्वरूपी विस्तार



****

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून विधीमंडळाचं कामकाज सलग तिसऱ्या दिवशी ठप्प झालं. विधानसभेत कामकाजाला सुरूवात होताच, अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, मात्र शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांसह सरकारचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनीही घोषणाबाजी केली. दीपक केसरकर, दादा भुसे या मंत्र्यांचाही यात समावेश होता. गदारोळ वाढत गेल्यानं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सदनाचं कामकाज बुधवार सकाळपर्यंत स्थगित केलं.



दरम्यान, शेतकरी कर्जमाफीसाठीच्या गदारोळातच राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाचा धन्यवाद प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावर परवा आणि काल असे दोन दिवस चर्चा होऊन, मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर प्रस्ताव मंजूर होणं अपेक्षित होतं.

विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कर्जमाफीच्या घोषणेशिवाय कामकाज चालू देणार नाही असा इशारा दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरु केल्यामुळे सदनाचं कामकाज आधी तासाभरासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

तूर आणि कांद्याच्या किमती घसरल्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असल्यानं, शेतकरी कर्जमाफी देण्याची शिवसेनेची भूमिका असल्याचं राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. विधीमंडळाचं कामकाज स्थगित झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भुसे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी काल लोकसभेत शून्यप्रहरात शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांकडे लक्ष वेधलं. शेतकऱ्यांची बिकट आर्थिक परिस्थिती पाहता, शेतकरी कर्जमुक्तीची मागणी खासदार खैरे यांनी केली.

****

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा - नीटमध्ये उर्दू माध्यमाचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून केला जाईल असं केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. यंदा हा बदल शक्य नसल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे.

****

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. सकाळी आठवाजेपासून मतमोजणी सुरू होणार असून, सायंकाळपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

****

राज्यात तूर वाहतुक मर्यादा ५० किलोमीटर वरून एकशे वीस किलोमीटर करण्यात आली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाने या मागणीला मान्यता दिली, त्यामुळे आता राज्यात सुमारे दोन लाख १३ हजार मेट्रीक टन तूर साठवणूक करता येणार आहे.

****

वाशिम जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आबा धापते यांना पावणे तीन लाख रूपये लाच मागितल्यावरून काल अटक करण्यात आली. एका कंपनीचं १७ लाख रूपये देयक अदा करण्यासाठी धापते यानं ही लाच मागितली होती.

****

अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले निलंबित आमदार रमेश कदम यांची सुमारे एकशे पस्तीस कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयानं दिले आहेत. यामध्ये कदम यांच्या औरंगाबाद इथल्या मालमत्तेसह स्थावर आणि जंगम अशा ५४ मालमत्तांचा समावेश आहे.

****

मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या २०१५ साली झालेल्या संचालक मंडळ निवडणुकीत निवडून आलेले माजी मंत्री आमदार दिलीप देशमुख यांची निवड सहकार न्यायालयानं रद्द ठरवली आहे. देशमुख हे समव्यवसायी संस्थेत कार्यरत असल्यानं, सहकार कायद्यानुसार ते ही निवडणूक लढवण्यास अपात्र असल्याच न्यायालयानं या निर्णयात म्हटलं आहे.  

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.



****

मराठवाडा साहित्य परिषदेच यशवंतराव चव्हाण वाङमय पुरस्कार खासदार शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राला जाहीर झाला आहे. तर नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जाहीर झाला आहे. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल औरंगाबाद इथं ही घोषणा केली. अकरा हजार रुपये रोख, आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****

हैदराबाद-अजमेर-हैदराबाद साप्ताहिक एक्स्प्रेस गाडीचा जयपूर पर्यंत कायमस्वरूपी विस्तार करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेनं घेतला आहे. १८ मार्चपासून ही गाडी दर शनिवारी हैदराबाद इथून दुपारी सव्वा तीन वाजता सुटेल, निजामाबाद, नांदेड, औरंगाबाद, भुसावळ, भोपाळ, अजमेर मार्गे सोमवारी सकाळी सहा वाजून २५ मिनिटांनी जयपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी जयपूरहून मंगळवारी दुपारी तीन वाजता निघून गुरुवारी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी हैदराबादला पोहोचेल

****

होळी तसंच धुलीवंदन हे सण पर्यावरण पूरक पद्धतीनं साजरे करावेत, असं आवाहन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलं आहे. उद्या रविवारी होळी आणि परवा सोमवारी धुलिवंदनाचा सण साजरा होत आहे.

रम्यान, काल औरंगाबाद इथं पंडित नाथराव नेरळकर फाउंडेशनच्या वतीनं रंग होली के या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत मैफलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शास्त्रीय गायिका हेमा उपासनी, उत्तरा चौसाळकर, जयंत नेरळकर यांनी सादर केलेल्या विविध रचनांना रसिकांची उत्स्फुर्त दाद मिळाली.

****

मराठवाड्याचा विकास झाल्यास इथला मजूर इतरत्र कामासाठी मिळणार नाही, या भीतीपोटी मराठवाड्याचा विकास होत नसल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते द्वारकादास लोहिया यांनी केला आहे. मराठवाडा विकासाबाबत औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या चर्चासत्रात ते काल बोलत होते. आज या चर्चासत्राचा समारोप होत आहे.

****

      शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यात सुसंवाद असणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन लातुरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केलं आहे. लातूर इथं आयोजित शेतकरी आणि शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. आधुनिक तंत्रज्ञान आणि हवामान बदलांची माहिती मिळाल्यास, पीक पध्दतीत बदल करुन भरघोस उत्पादन घेता येईल, असंही पोले म्हणाले.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या वारंगा इथं एका तलाठ्याला सातबारावरील नावात बदल न करता उतारा देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली. नंदकुमार देशमुख असं त्याचं नाव आहे.

****

      बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात एकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. दत्तात्रय पांचाळ असं मृताचं नाव असून, स्वत:च्या तेरा वर्षीय मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी विहिरीत उडी घेतली होती. या घटनेत मुलगा बचावला असून, त्याच्यावर स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

****

      लाभार्थ्यांना नियमित धान्य न दिल्याच्या तक्रारी वरून उस्मानाबाद शहरातील पाच स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीत सुरू केलेल्या दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो दरानं तांदूळ वितरण योजनेत अनियमितता आढळल्यानं, त्यावरून ही कारवाई करण्यात आली.

****

शासकीय अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा, अशी  मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या नांदेड जिल्हा समन्वय समितीनं केली आहे. या मागणीचं निवेदन काल समितीच्यावतीनं नांदेडचे प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना देण्यात आलं.

****

जालना इथं महिला आर्थिक विकास महामंडळ आणि नवरत्न सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं काल  महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात उद्योग तसंच सामाजिक क्षेत्रासह इंटरनेट साक्षरता अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

****

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक २१ मार्च रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे. सहाय्यक निवडणूक अधिकारी या निवडणुकीत पीठासन अधिकारी म्हणून काम पाहतील.

****

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचं वितरण आज नांदेड इथं होणार आहे. यात संत रविदास पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराचा समावेश आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

****


No comments:

Post a Comment