Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 05 March 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ मार्च २०१७ सकाळी
६.५० मि.
****
·
मुंबईत महापौर पदाची निवडणूक भारतीय जनता पक्ष लढवणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची
घोषणा, शिवसेनेचा महापौर पदासाठीचा मार्ग मोकळा
· शेतकऱ्यांनी
तूर विक्रीसाठी खरेदी केंद्रावर एकाच वेळी गर्दी
करू नये - पणन मंत्र्याचं
आवाहन
· माध्यान्ह भोजन
योजनेचा विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं करण्याचा केंद्र सरकारचा
निर्णय
आणि
· चलनबंदीच्या निर्णयानंतर
बँकेत मर्यादेपेक्षा अधिक नोटा जमा करणाऱ्या मराठवाड्यातल्या १८ जणांवर आयकर विभागाच्या
धाडी
****
मुंबईत महापौर पदाची निवडणूक भारतीय
जनता पक्ष लढवणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजप नगरसेवकांच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी ते काल
बोलत होते. मुंबईच्या हितासाठी हा निर्णय घेतला असून, उपमहापौर, स्थायी समिती आणि बेस्टची
निवडणूक देखील भारतीय जनता पक्ष लढवणार नाही, तसंच शिवसेनेशिवाय इतर कोणत्याही पक्षाच्या
बाजूनं मतदान करणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. भाजपला मुंबईत
विश्वासानं मतदान करणाऱ्या जनतेला, हा निर्णय नक्कीच आवडेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी
व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष नेता देणार नाही, मात्र पारदर्शकतेचे पहारेकरी
म्हणून भाजप नगरसेवक काम करतील, तसंच मुंबईच्या विकासाला भाजपचा सदैव पाठिंबा असेल,
असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुंबई महापालिकेच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी
त्रिसदस्यीय समिती स्थापन केली जाईल, त्या
समितीच्या अहवालानुसार कार्यवाही होणार असून, मुंबई महापालिकेसाठी एक उपलोकायुक्त नियुक्त
केला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, मुंबई महापौर पदासाठी उमेदवारी
अर्ज भरण्याच्या काल अखेरच्या दिवशी, शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर पदासाठी
तर शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून
विठ्ठल लोकरे यांनी महापौर पदासाठी तर विन्नी डिसुजा यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी
अर्ज दाखल केला. भाजपनं या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे, शिवसेनेला बहुमतासाठी जुळवाजुळव
करावी लागणार नसल्यानं, विश्वनाथ महाडेश्वर यांची महापौर पदी निवड होणं जवळपास निश्चित
मानलं जात आहे. महापौर पदाची निवडणूक येत्या आठ मार्चला होणार आहे.
****
किफायतशीर सुरक्षित प्रवासासाठी
राज्य सरकारनं संकेतस्थळ आधारित टॅक्सी सेवेचं नियमन करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. यासाठी
“महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१७” लागू करणार असून, टॅक्सी
भाडे आकारणीवर त्यामुळे नियंत्रण ठेवता येणं शक्य होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
या नियमानुसार टॅक्सी सेवेची नोंदणी करावी लागणार असून, टॅक्सीत
जीपीएस यंत्रणा तसंच प्रवास अंतर आणि भाडे दर्शवणारा निदर्शक असणार आहे. टॅक्सीचा
रंगही वेगळा असेल. टॅक्सी सेवेचं आधुनिकीकरण करण्याचा हा शासनाचा प्रयत्न असल्याचं
रावते यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांकडची
संपूर्ण तूर खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र सुरू राहणार असल्यामुळे
शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन खरेदी केंद्रावर एकाच वेळी गर्दी करू नये, असं
आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. ते काल मुंबई
इथं वार्ताहरांशी बोलत होते. तूर खरेदी केंद्रांवर बारदाने तातडीनं
उपलब्ध व्हावेत, यासाठी बारदाने
खरेदीची मागणी नोंदवण्यात आली
असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या
१५ एप्रिलपर्यंत ही तूर खरेदी केंद्रं सुरू
राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, हिंगोली बाजार समितीच्या यार्डात
भारतीय राष्ट्रीय कृषी आणि सहकारी विपणन महासंघ - नाफेडची तूर खरेदी बंद झाल्यानं शेतकऱ्यांनी
आंदोलनाचा पावित्रा स्वीकारला आहे. खासदार राजीव सातव यांनी काल मार्केट यार्डला भेट
देऊन याबाबतच्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. सोमवारपासून बाजार समितीत ठिय्या
आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केला.
जालना इथंही मोंढ्यात १५हजार क्विंटल
तुरीचं मोजमाप बाकी आहे. हे मोजमाप होण्यासाठी किमान आठवडा लागणार असल्यानं येत्या
१३ मार्चपर्यंत नवीन तूर विक्रीसाठी आणू नये असं आवाहन खरेदी केंद्राच्यावतीनं करण्यात
आलं आहे.
****
वस्तू आणि सेवा कर परिषदेनं वार्षिक
५० लाख रूपयांपर्यंत उलाढाल असलेले छोटे उपहारगृह, रेस्टॉरंटस, आणि ढाब्यांवर पाच टक्के
कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. परीषदेची ११ वी बैठक काल नवी दिल्लीत अर्थमंत्री
अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत
केंद्रीय जीएसटी आणि एकीकृत जीएसटी कायद्याच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. आता
जीएसटी लागू करण्यासाठीच्या आवश्यक पाच कायद्यांपैकी तीन महत्वपूर्ण कायद्यांच्या आराखड्यांना
मंजुरी मिळाल्यानं, येत्या एक जुलै पासून वस्तू आणि सेवा कर लागू होण्याची शक्यता आहे.
****
केंद्र सरकारच्या माध्यान्ह भोजन योजनेचा
विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलं आहे. मनुष्यबळ विकास
मंत्रालयानं हा निर्णय घेतला असून येत्या ३० जूनपर्यंत आधार ओळखपत्र तयार करण्याचे
निर्देश दिले आहेत. यानुसार ओळखपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांना आधार नोंदणीची पावती
दाखवली तरच भोजन मिळणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं
जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
केंद्र सरकारच्या पाचशे आणि एक हजार
रूपयांच्या चलनबंदीच्या निर्णयानंतर बँकेत मर्यादेपेक्षा अधिक नोटा जमा करणाऱ्या मराठवाड्यातल्या
१८ जणांवर आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. यात औरंगाबादसह वैजापूर, जालना, बीड आणि
लातूर इथल्या कोचिंग क्लासेस, सनदी लेखापाल- सीए, व्यापारी, उद्योजकांचा समावेश आहे.
त्यांच्याकडे जवळपास दहा कोटी रूपयांपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडली असल्याचं
आयकर विभागानं सांगितलं. मर्यादेपेक्षा अधिक
नोटा जमा करणाऱ्या मराठवाड्यातल्या ४०० लोकांची यादी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं
आयकर विभागाला पाठवली आहे. त्यानुसार आयकर विभागानं हे धाडसत्र सुरू केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या धनेगाव इथल्या
महादेव माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या राज्यशास्त्र या विषयाची
प्रश्नपत्रिका भ्रमणध्वनीच्या माध्यमातून फुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काल दुपारी
या विषयाची परीक्षा सुरू होताच एका विद्यार्थ्यानं भ्रमणध्वनीवर त्याचं छायाचित्र घेतलं
आणि व्हॉटसॲपच्या माध्यमातून ते बाहेर पाठवलं. यामाध्यमातून उत्तरे घेण्याचा प्रकार
करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी केंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिपाई आणि एका विद्यार्थीनी
विरोधात देवणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात
आल्याचं लातूर विभागीय मंडळाचे सचिव डॉक्टर गणपत मोरे यांनी सांगितलं. मुंबईतही वाणिज्य
शाखेच्या 'सचिवाची कार्यपद्धती' या विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉटसॲपच्या माध्यमातून फुटण्याची घटना घडली.
****
औरंगाबाद इथं काल मराठवाडा आमदार गोलमेज
परिषदेत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मराठवाड्यातल्या शौचालय बांधणी विषयी चर्चा करण्यात
आली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेचं आयोजन
आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला आणि बालकांच्या विकासासाठी काम करणारी युनिसेफ संस्था
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या
विभागानं केलं होतं.
****
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसंच शेतीवर आधारित उद्योग उभारणीला चालना देण्यात
येईल असं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. परभणी इथं
जिल्हा व्यापारी महासंघातर्फे आयोजित सत्कार प्रसंगी ते काल बोलत होते. स्थानिक संस्था
कर- एलबीटी संदर्भात निर्माण झालेल्या समस्यांसोबतच व्यापाऱ्यांचे इतर प्रश्नही सोडवण्यावर
शासन सदैव तत्पर राहील अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण
विकासासाठी अनेक पावलं उचलण्यात येत असल्याचंही लोणीकर यांनी यावेळी नमूद केलं.
****
प्रधानमंत्री उज्वला योजना यशस्वीपणे
राबवण्यात लातूर जिल्हा राज्यात पहिला आला आहे. या योजने अंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या
३७ हजार ७८९ कुटुंबाला गॅस जोडणी देण्यात आली आहे, अशी माहिती खासदार डॉक्टर सुनिल
गायकवाड यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना दिली. केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व लोककल्याणकारी
योजनांची जिल्हा प्रशासनानं प्रभावी अंमलबजावणी करून पात्र नागरिकांना योजनांचा लाभ
द्यावा, असं आवाहन खासदार गायकवाड यांनी केलं.
****
राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव
पाटील यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत खोटी कागदपत्रे देऊन शेतीवर एक कोटी
रूपयांपेक्षा अधिक रकमेचं अनुदान लाटलं असल्याचा आरोप माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे
यांनी केला आहे. काल रात्री उशीरा ते जळगाव इथं वार्ताहरांशी बोलत होते. बॅंकेत नोटाबंदीच्या
काळात चोपडा शाखेत झालेल्या नोटाबदलीप्रकरणी केंद्रीय गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला
आहे. या प्रकरणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी जळगावमध्ये येऊन बॅंकेच्या अधिकाऱ्यांची चौकशीही
केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाच्या
विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यव्यापी संपर्क आणि शोध अभियानांतर्गत काल
औरंगाबाद नजीक माळीवाडा इथं, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी निधी पांडेय यांची भेट घेऊन,
हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. ही अभियान यात्रा परवा मंगळवारी मुंबईत पोहोचणार
असून, त्याच दिवशी मुंबईत रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार
आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरू इथं
सुरू असलेल्या
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या काल
पहिल्या दिवशी भारताचा पहिला डाव १८९ धावांवर संपुष्टात आला. लोकेश राहुलनं ९०,
तर करुण नायरनं २६ धावा केल्या. चेतेश्वर
पुजारा आणि अजिंक्य रहाणे प्रत्येकी १७ तर कर्णधार विराट कोहली १२ धावांवर बाद झाला.
कालच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ४० धावा झाल्या. चार कसोटी सामन्यांच्या
मालिकेत पुणे इथं झालेला पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलिया एक शून्यनं आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment