Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 March 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ मार्च २०१७ दुपारी १.००वा.
*****
मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
आज पणजीत पत्रकारांशी बोलताना पर्रिकर यांनी आपण आपला राजीनामा पंतप्रधान कार्यालयाला
पाठवला असल्याची माहिती दिली. उद्या सायंकाळी पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून
शपथ घेणार आहेत. गोव्यात राजभवनावर हा शपथग्रहण सोहळा होईल, या सोहळ्यात काही आमदारही
मंत्रिपदाची शपथ घेतील, असं पर्रिकर यांनी यावेळी सांगितलं. मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची
संख्या आणि खातेवाटप याबाबत निर्णय अद्याप व्हायचा असून, निर्णय होताच, माध्यमांना
त्याबाबत माहिती दिली जाईल, असं पर्रिकर म्हणाले. गोवा विधानसभेत भाजपचे १३ आमदार असून,
महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष तसंच गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रत्येकी तीन आमदार आणि दोन
अपक्ष आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा भाजपनं केला आहे.
****
काँग्रेस पक्ष मणीपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी दावा करणार आहे. मणीपूर विधानसभेत
काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक २८ आमदार निवडून आले आहेत. समविचारी पक्षांना सोबत घेऊन
सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू असल्याचं, काँग्रेसचे मणीपूर प्रदेश समितीकडून सांगण्यात
आलं. काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी मावळते मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांची निवड
झाली आहे. राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी नवीन सरकार स्थापनेच्या प्रक्रियेसाठी इबोबी
सिंह यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची सूचना केली आहे. मात्र अद्याप कोणत्याही
पक्षाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केलं नसल्याचं, राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, भाजपही मणीपूरमध्ये सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात असून, आपल्याला ३२ आमदारांचा
पाठिंबा असल्याचा दावा, भाजपनं राज्यपालांकडे केला आहे.
****
ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं झालेल्या मनोज म्हात्रे हत्याप्रकरणी १९ जणांवर संघटीत
गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचं, ठाण्याचे अतिरिक्त
पोलिस आयुक्त मनोज रानडे यांनी सांगितलं. या सर्व जणांनी राजकीय स्वार्थासाठी हत्या
केल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, यापैकी सात जणांना अटक करण्यात
आली असून, इतरांचा शोध सुरू असल्याचं, पोलिसांकडून सांगण्यात आलं. काँग्रेस नेते मनोज
म्हात्रे यांची १४ फेब्रुवारीला राजकीय वैमनस्यातून हत्या झाली होती.
****
पाकिस्ताननं सीमेपलिकडून आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन
केलं. जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं आज सकाळच्या
सुमारास उखळी तोफांचा मारा केला. या हल्ल्यात कोणीही जखमी झालं नाही. भारताकडून या
हल्ल्याला चोख उत्तर देण्यात आल्याचं, सैन्यदलाच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आलं.
पाकिस्तानकडून कालही हल्ले झाले होते. ९ मार्च रोजी झालेल्या अशाच हल्ल्यात दीपक घाडगे
या जवानाला वीरमरण आलं होतं.
****
बँकेच्या बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी निर्बंध आजपासून
रद्द झाले आहेत. सर्व प्रकारचे बँक खातेधारक आपल्या खात्यातून हवी तेवढी रक्कम काढू
शकतील. आतापर्यंत बचत खात्यामधून पैसे काढण्याची साप्ताहिक मर्यादा ५० हजार रूपये एवढी
होती. विमुद्रीकरणानंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर रिजर्व्ह बँकेनं निर्बंध घातले
होते, टप्प्याटप्प्यानं हे निर्बंध रद्द करण्यात आले.
****
संपूर्ण मराठवाड्यात उद्यापासून महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद
आंदोलनाचा इशारा दिला आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात गौण खनिज विभागातील अव्वल
कारकून गजानन चौधरी यांच्या मृत्यूप्रकरणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात
यावा आणि जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात
येणार आहे. या मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद सुरू राहणार असल्याचा इशारा संघटनेनं
दिला आहे.
****
शेतकरी
कर्जमाफीचा निर्णय राज्यशासन योग्य वेळी घेणार असल्याचं, सहकार आणि पणनमंत्री सुभाष
देशमुख यांनी म्हटलं आहे. ते काल सोलापूर जिल्ह्यात माढा इथं बोलत होते. शासनानं आतापर्यंत
हमीभावानुसार सुमारे २३ लाख क्विंटल तूर खरेदी केल्याची माहिती त्यांनी दिली. शेतमाल
तारण योजनेतून आतापर्यंत एक लाख ९८ हजार क्विंटल मालावर तारण कर्ज देण्यात आलं असून,
यापुढेही शेतकऱ्यांना वीज, पाणी आदी सुविधा मुबलकपणे देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं
देशमुख यावेळी म्हणाले.
****
दिव्यांग
व्यक्तींसाठी येत्या गुरुवारी, १६ मार्च रोजी औरंगाबाद इथं रोजगार आणि स्वयंरोजगार
मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय
भवन इथं गुरुवारी सकाळी ११ वाजता होणाऱ्या या मेळाव्यात स्वयंरोजगाराच्या संधींबाबत
चर्चासत्राचं आयोजनही करण्यात आलं आहे. या चर्चासत्रात तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार
असून इच्छुक तसंच पात्र दिव्यांग व्यक्तींनी कार्यशाळेचा लाभ घेण्याचं आवाहन, जिल्हा
परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
//******//
No comments:
Post a Comment