Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 24 March 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मार्च २०१७ सकाळी
६.५० मि.
****
· सामाजिक
आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यास केंद्र सरकारची मंजुरी
·
१९
आमदारांचं निलंबन आणि शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून विधीमंडळात गदारोळ कायम
·
सर्व
निवासी डॉक्टरांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश; संरक्षणाच्या
हमीशिवाय कामावर रूजू होण्यास डॉक्टरांचा नकार
आणि
·
उस्मानाबादचे
खासदार रवींद्र गायकवाड यांच्याकडून एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण
****
सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय आयोग
स्थापन करण्यास काल केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. मागासवर्गीयांसाठीच्या राष्ट्रीय
आयोगाची हा नवा आयोग जागा घेईल, त्यामुळे जुना आयोग बरखास्त करण्यासही केंद्रीय मंत्री
मंडळानं मंजूरी दिली. मागासवर्गीय जाती जमातींसाठी असलेल्या, राष्ट्रीय आयोगाप्रमाणेच
अन्य मागासवर्गीयांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी एक आयोग असावा, अशी मागणी बऱ्याच
दिवसांपासून केली जात होती, त्याला अनुसरून या नव्या आयोगाची स्थापना केली जाणार आहे.
या आयोगाला संवैधानिक मंडळाचा दर्जा असणार आहे. यामुळे आता इतर मागासवर्गीयांच्या प्रवर्गात नवीन जातीचा समावेश
करण्यासाठी किंवा काढण्यासाठीच्या निर्णयाला संसदेची मंजुरी मिळणे आवश्यक असणार आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि तीन सदस्य अशी या आयोगाची रचना राहणार आहे.
****
सरकारमध्ये सहभागी असूनही सरकारला विरोध
करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवर विचार विनिमय करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सुकाणू
समितीची काल मुंबईत बैठक झाली. या बैठकीत दोन राजकीय पर्यायांवर चर्चा झाल्याची माहिती
भाजपच्या सूत्रांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यामध्ये थेट विधानसभेची
मध्यावधी निवडणूक घेण्याच्या आणि भाजपच्या संपर्कात असलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांना
राजीनामा द्यायला लावून भाजपच्या चिन्हावर निवडून आणायच्या पर्यायांचा समावेश आहे.
सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षाचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असून ते
भाजपमध्ये प्रवेशास तयार असल्याचं सांगण्यात येत आहे.
****
राज्याचा २०१७ -१८ या आगामी वर्षाचा
अर्थसंकल्प विधानसभेत काल चर्चेविना मंजूर करण्यात आला. सरकारनं निर्धारित वेळेपूर्वीच
अर्थमंत्र्यांचं भाषण घेऊन अर्थसंकल्प मंजूर करून घेतला, विरोधकांसह सरकारचा घटक पक्ष
असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांनाही या चर्चेत सहभागी करून घेतलं नाही, असा आरोप राष्ट्रवादी
काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. शिवसेनेचे आमदार जयप्रकाश मुंदडा आणि
विजय औटी यांनीही यावर आक्षेप घेत, अर्थसंकल्पाच्या चर्चेत आपल्याला शेतकरी कर्जमाफीच्या
मुद्यावर मत मांडायचं होतं असं सांगितलं.
दरम्यान, १९ आमदारांच्या निलंबन प्रकरणी
विरोधकांनी काल विधानसभेतून सभात्याग केला.
विधान परिषदेत विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीच्या
मुद्यावरून गदारोळ केल्यानं कालही कामकाज होऊ शकलं नाही. विरोधकांनी सभापतींच्या आसनासमोर
हौद्यात उतरून कर्ज माफीसाठी घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ वाढत गेल्यानं, उपसभापती
माणिकराव ठाकरे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.
****
सर्व शासकीय रुग्णालयातल्या निवासी
डॉक्टरांनी तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. काल
झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं सुरक्षेसंबंधी उपाययोजना करण्यासाठी सरकारला
थोडा वेळ द्यावा, असं म्हटलं. राज्य सरकारनंही रुग्णालयांमध्ये पाच एप्रिलपर्यंत ५००
सुरक्षा रक्षक तर १३ एप्रिल पर्यंत आणखी ६०० सुरक्षा रक्षक तैनात करावेत, असे निर्देश
न्यायालयानं दिले. याप्रकरणी पुढील सुनावणी १५ दिवसानंतर होणार आहे.
निवासी डॉक्टरांची संघटना - मार्डनं
यावेळी न्यायालयात शपथपत्र दाखल करत, निवासी डॉक्टर आपलं सामुहिक रजा आंदोलन मागे घेण्यास
तयार आहेत, मात्र त्यांच्या सुरक्षेची हमी सरकारनं घ्यायला हवी असं म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही
सामान्य माणसाला आरोग्य सेवा देण्याकरता, रुग्णसेवेची घेतलेली शपथ स्मरून डॉक्टरांनी
कामावर रुजू व्हावं, असं आवाहन केलं आहे. डॉक्टरांच्या सामुहिक रजा आंदोलनाबाबत काल
विधानसभेत निवेदन करताना त्यांनी डॉक्टरांना संपूर्ण सुरक्षा देऊन त्यात सातत्याने
सुधारणा करण्याची तयारी असल्याचं सांगितलं. या आंदोलनामुळे गरीबांना आरोग्य सेवा मिळत
नसून, अनेक शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्याकडे लक्ष वेधत मुख्यमंत्र्यांनी एक दोन
जणांच्या चुकांसाठी संपूर्ण समाजाला शिक्षा देणं चुकीचं असल्याचं नमूद केलं.
****
दरम्यान, डॉक्टरांवर झालेल्या हल्लाच्या
निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपात काल राज्यभरातले खाजगी डॉक्टर्स मोठ्या
प्रभाणात सहभागी झाले होते. औरंगाबाद शहरातील जवळपास चार हजार डॉक्टरांनी क्रांती चौकात
निदर्शनं केली. यामध्ये खाजगी डॉक्टरही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. मार्ड संघटनेसह,
भारतीय वैद्यक संघटना - आयएमएनंही या निदर्शनांना पाठिंबा दिला. शहरातले जवळपास सर्वच रूग्णालयातले बाह्य रूग्ण
विभाग बंद असल्यामुळं रूग्णांची गैरसोय झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात
डॉक्टरांना सरंक्षण मिळावं यादृष्टीनं पावलं उचलली जात असून त्याअनुषंगानं विविध उपाययोजना
करण्यात येत आहेत. दरम्यान, दिल्लीतील डॉक्टरांनीही महाराष्ट्रातल्या डॉक्टरांच्या
संपाला पाठींबा दर्शवला असून जवळपास दोन हजार डॉक्टर्स काल संपात सहभागी झाले होते.
****
औरंगाबाद इथल्या शासकीय दंत महाविद्यालयाला सन
२०१७-१८ या वित्तीय वर्षात मागणीनुसार निधी
उपलब्ध करून दिला जाईल, असं वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. विधानसभेत शासकीय
दंत महाविद्यालयाच्या बांधकामासाठी निधी मिळण्यासंदर्भात आमदार सतीश
चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना महाजन बोलत होते. शासनाने २०१२-१३ या
वर्षी नऊ कोटी रुपये निधी
मंजूर केला होता, त्यापैकी फक्त तीन कोटी रूपये मिळाल्यानं कामं अपूर्ण
असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
****
सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांना
पुरवण्यात येणाऱ्या अन्नधान्यात भेसळ आढळून आल्यास संबंधित ठेकेदाराविरूद्ध गुन्हा
दाखल करण्यात येईल, तसंच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक - ॲट्रॉसिटी कायद्यानुसार
कारवाई करण्यात येईल, असं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी काल विधानसभेत
सांगितलं. यासंदर्भातल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना ते बोलत होते. विविध सामाजिक
संस्था, महिला बचत गट यांच्या माध्यमातून वसतिगृहांना आहार पुरवठा करण्याबाबत विचार
करण्यात येईल, असंही ते यावेळी म्हणाले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या
संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड
यांनी काल विमानात जागेच्या वादावरून एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याला मारहाण केली.
काल सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. या प्रकरणी
विमान कंपनीने पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, खासदार गायकवाड यांनी मारहाणीच्या
या वृत्ताला दुजोरा दिला आहे, संबंधित अधिकाऱ्यानं गैरवर्तन केल्यानं आपण हे पाऊल उचललं.
या प्रकरणी लोकसभा अध्यक्षांकडे आपण तक्रार करणार असून, कोणाचीही माफी मागणार नाही,
असं गायकवाड यांनी म्हटल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे.
****
भारतीय संविधानातले कायदे हे कुठल्याही
धर्माला अनुसरून नव्हे, तर आधुनिकतेची कास धरणारे असल्याचं, ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जनार्दन वाघमारे
यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागाच्या वतीनं, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान’ या विषयावरील व्याख्यानात ते काल बोलत होते. भारतीय
राज्यघटना ही न्याय, स्वतंत्रता,
समता, आणि बंधुता या चार मूल्यांवर आधारलेली असून, या मूल्यांचा अंगिकार करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीसाठी
मराठवाडा मुक्ती मोर्चानं काल औरंगाबाद इथं आयोजित केलेला कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे
ऐनवेळी रद्द करण्यात आला. स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते विधीज्ञ श्रीहरी अणे या कार्यक्रमाला
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते, मात्र अणे कार्यक्रमस्थळी येत असताना, त्यांच्या
वाहनावर दगडफेक झाल्यानं, आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द केला. यामध्ये अणे यांच्या गाडीच्या
काचा फुटल्या.
****
उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या लाच
घेण्याच्या दोन घटनेत काल चार जणांना अटक करण्यात आली. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या
महिला आणि बाल कल्याण विभागाच्या सभापती लता पवार, तिचे स्वीय सहाय्यक पांडुरंग वेदपाठक
आणि एक औषधी दुकानदार अण्णासाहेब माढेकर या तिघांना २२ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ चे फलक निकृष्ट दर्जाचे
बनवल्याप्रकरणी, ठेकेदाराविरुद्ध चौकशी न करण्यासंबंधी ही लाच घेण्यात आली होती.
बीड जिल्ह्यातल्या आष्टी पंचायत समितीचे
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे याला २५ हजार
रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलं. एका कर्मचाऱ्यावर खोटे आरोप करून नोटीसा देऊन निलंबीत
करीन, अशी धमकी देऊन धनवे यानं २ लाख रुपयांची लाच मागितली होती.
****
No comments:
Post a Comment