Friday, 28 April 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.04.2017 - 6.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 April 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ एप्रिल २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      तुरीसाठी बाजार हस्तक्षेप योजना राबवण्यास राज्य शासनाची मान्यता, २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रांवर आलेल्या तुरीची खरेदी करणार

·      शेतकऱ्यांसाठी सरकार करत असलेल्या कामांची माहिती देण्यासाठी शेतकरी संवाद यात्रा काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

·      ज्येष्ठ अभिनेते, माजी केंद्रीय मंत्री खासदार विनोद खन्ना यांचं प्रदीर्घ आजारानं मुंबईत निधन

आणि

·      अभियांत्रिकी संयुक्त प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

****

तुरीसाठी बाजार हस्तक्षेप योजना राबवण्यास राज्य शासनानं मान्यता दिली असून या अंतर्गत २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रांवर आलेल्या तुरीची खरेदी करण्यात येणार असल्याचं पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी काल मुंबईत सांगितलं. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आल्याचं ते म्हणाले. सध्या तूर खरेदी केंद्रावर सुमारे १० लाख टन तूर शिल्लक असून ती सर्व या योजनेअंतर्गत खरेदी केली जाईल. यासाठी खरेदी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघ या संस्थांवर सोपवण्यात आल्याचं सुभाष देशमुख यांनी सांगितलं.

****

राज्यात तूर खरेदी पुन्हा सुरु करायची असल्यास राज्य सरकारनं तसा आदेश देणं गरजेचं असल्याचं भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ -नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. नाफेड स्वत:च्या अधिकारात तूर खरेदी करू शकत नाही, असं ते म्हणाले. अजूनही शेतकऱ्यांची तूर शिल्लक असल्यास नाफेडला तसे आदेश देऊन खरेदी पुन्हा सुरू करता येईल, असं पाटील म्हणाले. 

****

राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी संवाद यात्रा काढावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पिंपरी - चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते.

प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यावेळी उपस्थित होते, शेतीमध्ये गुंतवणूक वाढवून शेतकऱ्याला सबळ केल्याशिवाय कर्जमाफीचा उपयोग नाही, असं सांगून दानवे यांनी, भाजपा सरकारने शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी अनेक पावले उचलल्याचं सांगितलं.

पाथरीचे अपक्ष आमदार मोहन फड, उस्मानाबादचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुधीर पाटील, औरंगाबाद महापालिकेतले माजी नगरसेवक समीर राजूरकर यांच्यासह अनेकांनी यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

दरम्यान, या संवाद यात्रेवर टीका करतांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी, सरकारचा जनतेशी संवाद न राहिल्यानं, ही वेळ आली, असल्याचं म्हटलं आहे. संघर्ष यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून, सरकारच्या पायाखालची वाळू सरकली, असल्याचं पक्षानं काल जारी केलेल्या पत्रकात नमूद केलं आहे.

दरम्यान, विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची काल रात्री सातारा इथं सांगता झाली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

****

नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची जूनमध्ये फेरपरीक्षा होणार आहे. दहावीप्रमाणे नववीच्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा परीक्षेस बसण्याची संधी मिळणार असल्याचा शासनाचा अध्यादेश काल जारी करण्यात आला. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिक स्तर आणि जलद गतीनं शिक्षणाद्वारे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती कमी करण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

****

उडान सेवेमुळे हवाई क्षेत्रासह पर्यटन, औद्योगिक, व्यापार, शिक्षण अशा क्षेत्रातील अमर्याद संधी खुल्या होतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या ‘उडान’ या महत्त्वाकांक्षी क्षेत्रीय संपर्क योजनेतील विविध विमान सेवांचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते काल सिमला इथं झाला. या विमान सेवांमध्ये नांदेड - हैदराबाद विमान सेवेचा समावेश आहे. नांदेड- मुंबई विमानसेवाही लवकरच सुर होणार असून, शीख धर्मियांसाठी महत्त्वाच्या असलेल्या नांदेड- अमृतसर -पाटणा या तीन शहरांनाही विमानसेवेनं जोडण्याचा प्रस्ताव असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.

यानिमित्तानं नांदेड इथं गुरु गोविंदसिंह विमानतळावर राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. उडान योजनेमुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल, असं मत मुंडे यांनी व्यक्त केलं.

****

ज्येष्ठ अभिनेते तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार विनोद खन्ना यांचं काल मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं, ते ७० वर्षांचे होते.

सहा ऑक्टोबर १९४६ रोजी पेशावर इथं जन्मलेले विनोद खन्ना यांनी १९६८ साली प्रदर्शित झालेल्या ‘मन का मीत’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ऐंशीच्या दशकात ओशो यांचं शिष्यत्व घेतलेल्या विनोद खन्ना यांनी काही वर्षांच्या खंडानंतर अभिनय क्षेत्रात पुन्हा पदार्पण केलं. मेरे अपने, मेरा गाव मेरा देश, कुर्बानी, हाथ की सफाई, अमर अकबर अँथोनी, मुकद्दर का सिकंदर, लेकिन, मीरा, दयावान, चांदनी, गॉडफादर, वॉन्टेड, दबंग, दिलवाले आदी एकशे चाळीस चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला एक थी रानी ऐसी भी, हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

१९९७ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर पंजाबमधल्या गुरुदासपूर मतदार संघाचं चार वेळा प्रतिनिधीत्व केलेल्या विनोद खन्ना यांनी सांस्कृतिक आणि पर्यटन तसंच परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.

विनोद खन्ना यांच्या निधनाबद्दल राजकारण, अभिनय क्षेत्रासह समाजाच्या सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

भारतीय तंत्रज्ञान संस्था, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांसह अन्य नामांकित अभियांत्रिकी संस्थांच्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यासाठी घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा -जेईई मुख्य परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यात उदयपूरचा कल्पित वीरमाल यानं शंभर टक्के गुण मिळवत देशभरातून पहिला क्रमांक पटकावला, तर नाशिकची वृंदा राठी ८९ टक्के गुण मिळवत देशभरातून मुलींमध्ये पहिली आली.

****

राज्यातल्या टंचाईग्रस्त आणि ग्रामीण भागांमध्ये गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत पाणी पुरवठा करण्यासाठी शासनानं हाती घेतलेल्या जलस्वराज्य दोन, या कार्यक्रमात एकोणनव्वद टंचाईग्रस्त गावांमध्ये सामुदायिक पाणी साठवण टाक्या उभारण्यात येणार आहेत. या गावांमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या किनवट, मुखेड आणि लोहा या तालुक्यांतल्या पाच तांड्यांचा समावेश आहे.

****

गाव केंद्रबिंदू मानून खरीपाचं नियोजन केल्यास शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल, असं सहकार राज्यमंत्री आणि परभणीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत ते काल बोलत होते. बियाणे आणि तांचा तुटवडा भासू नये, याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. 

****

अमरावती इथल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन’ - आय. आय. एम. सी. मध्ये मराठी पत्रकारितेसाठीचा पहिला पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम येत्या एक ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय पातळीवरची प्रवेश परीक्षा येत्या २७ मे रोजी होणार आहे. यासाठीचे ऑनलाइन अर्ज येत्या १४ मे पर्यंत आय आय एम सी डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर भरता येतील.

या अभ्यासक्रमात वृत्तांकन, संपादन, माध्यम विषयक कायदे, तसंच मराठी भाषा आणि मराठी माध्यमांचा इतिहास या विषयांचा अंतर्भाव आहे.

****

जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातल्या केंदळी गावच्या २९ शेतकऱ्यांना मावेजा न दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्याचे वाहन आणि खुर्ची जप्त करण्याचे आदेश काल दिवाणी न्यायालयानं दिले. २००६ मध्ये लघु तलावासाठी सरकारनं या शेतकऱ्यांची जमीन संपादित केली होती. या जमिनीचा मावेजा न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

****

जोपर्यंत देशात सामाजिक लोकशाही येत नाही, तोपर्यंत राजकीय लोकशाही येणार नसल्याचं मत राज्यघटनेचे अभ्यासक डॉक्टर आर. के. क्षीरसागर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रबोधन परिषदेच्या वतीनं आयोजित विशेष व्याख्यानात बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गंगाधर पानतावणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पत्रकारिता विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमानं आज आणि उद्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. दिनकर माने यांनी औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट गोल्स, सोशल जस्टीस ॲण्ड मीडिया या विषयावरील या चर्चासत्रात दहा देशातले संशोधक सहभागी होणार आहेत. 

//****//

No comments:

Post a Comment