आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२२ एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
राज्यात
पेट्रोलच्या दरात तीन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारनं पेट्रोलवरील अधिभार
वाढवल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. काल मध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्यात आले.
****
राज्य शासनाच्या सर्व विभागांनी डिजिटल माध्यमाद्वारे आपली माहिती इतर विभागांच्या
माहितीबरोबर जोडावी, असं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. राज्यात
इज ऑफ डुइंग बिझनेस - व्यवसाय सुलभीकरण अंतर्गत वेगवेगळ्या विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या
विविध सुधारणांचा मुख्यमंत्र्यांनी
आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जागतिक
बँकेच्या इज ऑफ डुइंग बिझनेसच्या मानकांसाठीच्या मुद्यांची पूर्तता एक सप्टेंबरपर्यंत करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
किशोरवयीन
मुली, गरोदर - स्तनदा माता आणि बालकांना घरपोच
आहार पुरवठ्याकरता, राज्य शासनाची निवड प्रक्रिया योग्य
असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.
महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा
मुंडे यांनी ही माहिती दिली. शासनानं निवडलेल्या १८ महिला मंडळं तसंच बचतगटांना येत्या एक मे पासून पुरवठा आदेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. पुरवठ्यासाठी आठ मार्च २०१६ रोजी राज्य
शासनानं प्रकाशित केलेल्या निविदा
प्रक्रियेतल्या अटी-शर्तींवर आक्षेप घेत काही महिला बचतगटांनी न्यायालयात याचिका
दाखल केली होती.
****
२९व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचं काल ठाणे इथं उद्घाटन
झालं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, ठाणे
जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, तसंच संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे उपस्थित होते. सावरकर
हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते, आणि सावरकरांचे विचार आजही प्रेरणादायक असल्याचं
अमित शहा यावेळी म्हणाले. उद्घाटनापूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात आली. तीन दिवस चालणाऱ्या
या संमेलनात स्वातांत्र्यवीर सावरकरांच्या साहित्यावर आधारित परिसंवाद, सांस्कृतिक
कार्यक्रम तसंच अभिवाचन आदी कार्यक्रम होणार आहेत.
//****//
No comments:
Post a Comment