▼

Tuesday, 18 April 2017

text- AIR News Bulletin, Aurangabad 18.04.2017 6.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 April 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ एप्रिल २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      राज्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना औरंगाबादमध्ये मारहाण; आठ  जणांविरूद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

·      मराठा आरक्षण प्रकरण मागासवर्गीय आयोगाकडे हस्तांतरित करण्यास राज्य सरकारची मान्यता

·      परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक

आणि

·      लातूर आणि परभणी महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार संपला; उद्या मतदान

****

राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड आणि त्यांच्या पत्नीला काल औरंगाबादमध्ये धक्काबुक्की करत मारहाण केल्या प्रकरणी भारतीय रिपब्लिकन पक्ष- बहुजन महासंघाच्या आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये दोन महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. या सर्वांविरूद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतलं आंबेडकर भवन पाडल्याच्या रागातून या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्यावर हा हल्ला केला. या मारहाणीत दोन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत.

****

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा - नीटच्या प्रस्तावित तारखेत बदल करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे ही परीक्षा नियोजित ताररखेला म्हणजेच येत्या सात मे रोजी होणार आहे.

****

केंद्रीय अर्थ मंत्रालयानं पायाभूत सुविधांमध्ये परवडणारी घरं आणि झोपडपट्टी पुनर्विकास यांचा समावेश केला आहे. मंत्रालयानं यापूर्वी ऑक्टोबर २०१४ मध्ये पायाभूत सुविधांच्या उपक्षेत्राची एकसमान यादी प्रसिद्ध केली होती. यामध्ये पाणी, स्वच्छता, वाहतूक, वीजनिर्मिती, सामाजिक आणि व्यावसायिक पायाभूत सुविधा अशा पाच विभागांतर्गत विविध उपक्षेत्रांचा समावेश करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून, सामाजिक आणि व्यावसायिक पायाभूत सुविधा विभागात, झोपडपट्टी पुनर्विकास क्षेत्राचा समावेश करण्याची विनंती केली होती. या पत्राची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला, यामुळे शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास तसंच क्रीडांगणं, उद्यानं, शाळा, दवाखाने यासारख्या सामाजिक सुविधांची निर्मिती करणं सुलभ होणार आहे.

****

राज्यात स्थापन करण्यात आलेल्या पोलीस तक्रार प्राधिकरणासंबधी सर्व माहिती देण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारला दिले. पोलीस अधिकाऱ्यांविरूद्ध तक्रार करण्यासाठी जिल्हा तसंच, राज्य स्तरावर स्थापन करण्यात आलेलं हे प्राधिकरण प्रत्यक्षात अस्तित्वात का आलं नाही, अशी विचारणाही न्यायालयानं सरकारला केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्यासंबधी सर्वोच्च न्यायालयानं २००६ मध्ये आदेश दिले होते. त्यानुसार राज्यात असं प्राधिकरण सुरू करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, सदस्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे, मात्र, प्राधिकरणाचं काम प्रत्यक्षात सुरू झालेलं नाही, याबाबत येत्या २० तारखेपर्यंत खुलासा करण्यासही न्यायालयानं राज्य सरकारला सांगितलं आहे.

****

मराठा आरक्षण प्रकरण मागासप्रवर्ग आयोगाकडे हस्तांतरित करण्यास आक्षेप नसल्याचं, राज्य शासनानं म्हटलं आहे. या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. मात्र याचिकाकर्त्यांमध्ये याबाबत एकमत नसून त्यांनी आपली भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या २७ एप्रिलला होणार आहे.

****

सहारा समूहाची पुणे जिल्ह्यातली लोणावळा इथली अॅम्बी व्हॅली लिलावात काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. गुंतवणुकदारांचे पैसे देण्यास सहारा समूह अपयशी ठरल्याचं सांगत न्यायालयाने काल हे निर्देश दिले. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या २८ एप्रिल रोजी होणार असून, या सुनावणीसाठी सहारा समूहाचे प्रमूख सुब्रतो राय यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

****

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी काँग्रेससह विरोधी पक्षानं काढलेली संघर्ष यात्रा काल नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं पोहोचली. यावेळी आयोजित सभेत बोलतांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेतल्यानंतर हे शासन कर्जमाफी करणार असा सवाल उपस्थित केला. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शोभा बच्छाव, जितेन्द्र आव्हाड, रोहिदास पाटील, जोगेंद्र कवाडे आदींसह आमदार, खासदार, तसंच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

****

कोपर्डी खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपींवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी या खटल्याशी संबंधित नसणारे नागरिक, वकील आणि पत्रकारांना न्यायालयात प्रवेश न देण्याचा आदेश दिला आहे. कोपर्डी खटल्याची सुनावणी कालपासून पुन्हा सुरु झाली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

मनोरंजन केंद्राचा परवाना मंजूर करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. बोधवड यांनी तक्रारदाराला ही रक्कम धनादेश स्वरुपात मागितली होती. मात्र ऐन वेळी रोख रकमेची मागणी केली. लाच स्वीकारण्यासाठी  सेवानिवृत्त शिपायानं बोधवड यांना सहकार्य केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी परभणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

****

नियमबाह्य पद्धतीनं सदस्यांची निवड केल्याच्या आरोपावरून परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ नगर परिषदेच्या अध्यक्ष जिजाबाई राठोड यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. राठोड यांना सहा वर्षासाठी निवडणूक लढवण्यासही अपात्र ठरवण्यात आलं आहे.

****

परभणी, लातूर आणि चंद्रपूर इथं महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. काल या तिन्ही ठिकाणचा प्रचार संपला. लातूर इथं काँग्रेस, ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुन-मुस्लिमिन अर्थात एमआयएम या पक्षांनी विविध नेत्यांच्या प्रचार सभा ठेवल्या होत्या, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने मोठ्या प्रचार सभाचं आयोजन न करता प्रभागा प्रभागात प्रचारफेऱ्या काढून प्रचाराची सांगता करण्यात आली.  

लातूर इथं पालिकेच्या १८ प्रभागातल्या ७० जागांसाठी एकूण ४०७ उमेदवार तर परभणी ६५ जागांसाठी ४१८ उमेदवार रिंगणात आहेत.

****

पैठणचे माजी नगराध्यक्ष सोमनाथराव जोशी यांचं काल दीर्घ आजारामुळे निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. दोन वेळा नगराध्यक्ष राहिलेले जोशी हे १९७४ मध्ये थेट जनतेतून निवडून आलेले, पहिले नगराध्यक्ष होते. त्यांनी सलग १५ वर्ष पैठणचं नगराध्यक्ष पद भूषवलं. त्यानंतर १९९१ मध्ये ते पुन्हा नगराध्यक्ष झाले होते. कडक शिस्तीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांची ओळख होती, त्यांच्या कार्यकाळात पैठण शहराचा चेहरा मोहरा त्यांनी बदलला होता. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिव देहावर पैठण इथं अंतिम संस्कार करण्यात येतील.

****

मराठवाड्यात काल नांदेड इथं सर्वाधिक ४४ पूर्णांक पाच अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल परभणी इथं ४४ पूर्णांक दोन अंश, बीड ४३ पूर्णांक दोन अंश, तर औरंगाबाद इथं ४१ पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

दरम्यान, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणखी एक दोन दिवस कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं  वर्तवला आहे. लोकांनी उन्हापासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या १० हजार तरुणांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार असून त्यासाठी टाटा मोटर्स सोबत अडीच हजार तरुणांच्या प्रशिक्षणाचा करार पालकमंत्री संभाजी पाटील यांनी केला असल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभेत काल ते बोलत होते. लातूरच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अमृत योजनेतून जेवढा निधी लागेल तेवढा मंजूर करण्यात येणार असून ही योजना पूर्ण करण्यासाठी साधारण ३ वर्षांचा कालावधी लागेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद शहरातल्या बीड बायपास रस्त्यावर होणाऱ्या वाढत्या अपघातांची दखल घेऊन, या मार्गावर सकाळी सात वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत जड वाहनांना  पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बंदी घातली आहे.

//*****//

No comments:

Post a Comment