Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 17 April 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
केंद्रीय अर्थमंत्रालयानं पायाभूत
सुविधांमध्ये पडवणारी घरं आणि झोपडपट्टी पुनर्विकास यांचा समावेश केला आहे. मंत्रालयानं
यापूर्वी ऑक्टोबर २०१४ मध्ये पायाभूत सुविधांच्या उपक्षेत्राची एकसमान यादी प्रसिद्ध
केली होती. यामध्ये पाणी, स्वच्छता, वाहतूक, वीजनिर्मिती, सामाजिक आणि व्यावसायिक पायाभूत
सुविधा अशा पाच विभागांतर्गत विविध उपक्षेत्रांचा समावेश करण्यात आला होता. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून,
सामाजिक आणि व्यावसायिक पायाभूत सुविधा विभागात, झोपडपट्टी पुनर्विकास क्षेत्राचा समावेश
करण्याची विनंती केली होती. या पत्राची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला, यामुळे शहरांमध्ये
झोपडपट्टी पुनर्विकास तसंच क्रीडांगणं, उद्यानं, शाळा, दवाखाने यासारख्या सामाजिक सुविधांची
निर्मिती करणं सुलभ होणार आहे.
****
सहारा समूहाची लोणावळा इथली अॅम्बी
व्हॅली लिलावात काढण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. गुंतवणूकदारांचे पैसे
देण्यास सहारा समूह अपयशी ठरल्याचं सांगत न्यायालयानं आज हे निर्देश दिले. या प्रकरणी
पुढची सुनावणी येत्या २८ एप्रिल रोजी होणार असून, या सुनावणीसाठी सहारा समूहाचे प्रमूख
सुब्रतो राय यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
****
मराठा आरक्षण प्रकरण मागासप्रवर्ग
आयोगाकडे हस्तांतरित करण्यास आक्षेप नसल्याचं, राज्यशासनानं म्हटलं आहे. यासंदर्भात
मुंबई उच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात राज्यसरकारनं ही भूमिका स्पष्ट
केली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या २७ एप्रिलला होणार आहे.
****
कोपर्डी खटल्याच्या सुनावणीदरम्यान
आरोपींवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी
या खटल्याशी संबंधित नसणारे नागरिक, वकील आणि पत्रकारांना न्यायालयात प्रवेश न देण्याचा
आदेश दिला आहे. कोपर्डी खटल्याची सुनावणी आजपासून पुन्हा सुरु झाली. त्यावेळी त्यांनी
हे आदेश दिले.
****
परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी
अभिमन्यू बोधवड यांना आज ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. यासंदर्भात
आलेल्या तक्रारीवरून लाचलुपचत प्रतिबंधक पथकानं जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी सापळा
रचून, बोधवड यांना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ नगर
परिषदेच्या अध्यक्षा जिजाबाई राठोड यांना नगराध्यक्ष म्हणून अपात्र ठरवण्यात आलं आहे.
राठोड यांनी नियमबाह्य पद्धतीने काही सदस्यांची निवड केल्याच्या आरोपावरून नगरविकास
विभागाने ही कारवाई केली. नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी याबाबतचे आदेश
जारी केले आहेत. राठोड यांना सहा वर्षासाठी निवडणूक लढवण्यासही अपात्र घोषीत करण्यात
आलं आहे.
****
पोलिसांना तणावमुक्त जीवनासाठी
आवश्यक सर्व सुविधा शासनस्तरावरुन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असं, राज्याच्या ग्रामविकास
आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव
इथं १२ कोटी २६ लाख ६० हजार रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी
कार्यालय आणि पोलीस वसाहतीच्या इमारतीच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. राज्यातील
शांतता तसंच कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांवर मोठी जबाबदारी असल्याचं,
पालकमंत्री मुंडे यावेळी म्हणाल्या.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
‘सबका साथ सबका विकास’ या न्यायानं विकासकामं करुन जातीयवादाचं राजकारण संपवलं असल्याचं
मत, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी व्यक्त केलं आहे. ते आज लातूर इथं
पत्रकार परिषदेत बोलत होते. सध्या मुस्लिम समाजातूनही गोहत्या बंदीबाबत मागणी होत असून
देशभर गोहत्या बंदीचा एकच कायदा असावा यासाठी सरकारही विचार करत असल्याचं, शाहनवाज
हुसैन यांनी सांगितल.
****
राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर
गायकवाड यांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी भारिप बहुजन महासंघाच्या सहा कार्यकर्त्यांना
पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. औरंगाबाद इथं सुभेदारी विश्रामगृह परिसरात आज दुपारच्या
सुमारास हा प्रकार घडल्याचं पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आलं.
****
मराठवाड्यात आज नांदेड इथं सर्वाधिक
४४ पूर्णांक पाच अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल परभणी इथं ४४ पूर्णांक
दोन अंश, बीड ४३ पूर्णांक दोन अंश, तर औरंगाबाद इथं ४१ पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमान
नोंदवलं गेलं.
****
No comments:
Post a Comment