Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 26 April 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत
भारतीय जनता पक्षानं बहुमत मिळवलं असून आम आदमी पक्ष दुसऱ्या तर काँग्रेस पक्ष तिसऱ्या
स्थानावर राहिले आहेत.
दिल्ली महानगरपालिकेतल्या विजयाबद्दल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी दिल्लीच्या जनतेचे आणि भाजप
कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. भारतीय जनता पक्षावर हा विश्वास दाखवल्याबद्दल आपण
दिल्लीच्या जनतेचे आभारी आहोत, असं पंतप्रधानांनी एका ट्वीटद्वारे म्हटलं आहे. भाजपाचा
हा विजय म्हणजे जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याची प्रतिक्रिया, केंद्रीय श्रममंत्री
बंडारू दत्तात्रेय यांनी दिली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,
रस्ते, रेल्वेमार्ग, विमानतळं, बंदरं आणि कोळसा उत्पादन यासह इतर महत्त्वाच्या क्षेत्रातल्या
प्रगतीचा काल आढावा घेतला. या बैठकीला पंतप्रधान कार्यालय, नीती आयोग आणि या क्षेत्रांशी
संबंधित मंत्रालयांचे अधिकारी उपस्थित होते. पायाभूत क्षेत्रांसह इतर क्षेत्रांमध्ये
उल्लेखनीय प्रगती झाल्याचं यावेळी स्पष्ट झालं. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये
दररोज सरासरी एकशे तीस किलोमीटर्स लांबीचे रस्ते निर्माण करण्यात आल्याचं समोर आलं
असून, हा एक विक्रम असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या
प्रादेशिक जोडणी योजना, ‘उडे देश का आम नागरिक’ अर्थात- ‘उडान’
योजनेअंतर्गत
नांदेड - हैदराबाद विमानसेवेचा शुभारंभ करतील. यासोबतच सिमला - दिल्ली आणि कडप्पा
- हैदराबाद विमानसेवेचाही उद्या पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ होईल.
****
राज्य शासनानं विविध आंतरराष्ट्रीय
स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिकं जाहीर केली आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या तळेगाव रोही इथला रोईंगपटू
दत्तू बबन भोकनळ याला १६ व्या आशियाई विश्वचषक स्पर्धेमध्ये रौप्यपदक प्राप्त केल्याबद्दल
५ लाख रुपयांचं, नाशिकच्या अक्षय अष्टपुत्रे याला १३ व्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजी
स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त केल्याबद्दल ३ लाख रुपयांचं तर सिन्नरच्या प्रियंका घुमरे
हिला पॅरा एशियन गेम्स २०१४ ज्युडो स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त केल्याबद्दल १ लाख
रुपयांचं पारितोषिक जाहीर झालं आहे.
याबरोबरच राज्यातल्या इतर पदकविजेत्या
५३ खेळाडूंना एकूण पाच कोटी चोवीस लाख तसंच त्यांच्या चाळीस क्रीडा मार्गदर्शकांकरता
सहासष्ठ लाख रुपयांची पारितोषिकं जाहीर झाली आहेत. ही पारितोषिकं या महिन्यात खेळाडूंच्या
बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.
****
शेतकऱ्यांच्या उत्पादनाची किंमत
व्यापाऱ्यांनी रोखीनं द्यावी किंवा थेट बँक खात्यात जमा करावी, या मागणीसाठी लासलगाव
इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा विक्री थांबवल्यानंतर व्यापारी
समूहानं खाजगी कांदा खरेदीविक्री केंद्र सुरू केलं आहे. अशा प्रकारे बाजार समिती क्षेत्राच्या
बाहेर केलेली लिलाव प्रक्रिया घटनाबाह्य असून, यावर कारवाई करण्यात येईल, असं जिल्हा
उपनिबंधक नीलकंठ खरे, यांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी शासनमान्य खरेदीविक्री केंद्रांवरच
शेतीमालाची खरेदीविक्री करावी असं आवाहन खरे यांनी केलं आहे. सध्याचा व्यापारी समूह
शेतकऱ्यांची मागणी मान्य करत नसल्यानं, रोखीनं किंवा एनईएफटी पद्धतीनं व्यवहार करण्यास
तयार असणाऱ्या व्यापाऱ्यांना नवीन परवाने देण्याचा सरकार विचार करत आहे.
****
येत्या एक मे ला महाराष्ट्र दिनाची
शासकीय सुट्टी असल्यामुळे घाटीचा बाह्यरुग्ण विभाग बंद राहील, असं रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी
कळवलं आहे.
****
लातूरच्या रेल्वे स्थानकावरच्या
विविध नवीन सुविधांचं तसंच स्थानक परिसरात उभारण्यात आलेल्या हिंदी वाचनालयाचं आज उद्घाटन
करण्यात आलं. खासदार निधीतून प्रतिक्षालयात
आसनव्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि व्हीआयपी प्रतिक्षालयाची सुविधा
कार्यान्वित करण्यात आली आहे.
****
लातूर मुंबई एक्स्प्रेस रेल्वे
बीदरपर्यंत वाढवण्यात येऊ नये, अशी मागणी लातूर एक्स्प्रेस बचाव समितीच्या वतीनं आज
करण्यात आली. ही वाढ झाल्यास लातूरच्या प्रवाशांना कमी जागा उपलब्ध होतील, असं कारण
देत, या समितीनं ही मागणी आज रेल्वेच्या सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक अजयकुमार
दुबे, यांच्याकडे केली. यावर ही मागणी रेल्वे मंडळाकडे पाठवण्यात येईल, असं दुबे यांनी
आंदोलनकर्त्यांना सांगितलं. ही रेल्वे कायम ठेवून, मुंबई बीदर मार्गासाठी दुसरी नवीन
गाडी सुरू करावी, अशी मागणी मराठवाडा व्यापारी महासंघानंही केली आहे.
****
उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत
कृषी यांत्रिकीकरणाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचा निर्णय शासनानं घेतला असून, यासाठी
शासन अनुदान देणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी यासाठी येत्या सोळा मेपर्यंत तालुका कृषी
अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावेत, असं शासनातर्फे कळवण्यात आलं आहे. या अनुदानासाठीच्या
पात्रतेचे निकष आणि इतर माहिती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यांच्या कार्यालयात उपलब्ध
आहे.
****
No comments:
Post a Comment