Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 May 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ मे २०१७ दुपारी १.००वा.
****
आधुनिक, प्रगत आणि सक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी नागरिकांकडूनही मन:पूर्वक
सहकार्याची अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली आहे. ५७ व्या महाराष्ट्र
दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क इथं ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. सर्वांच्या
एकत्रीत सहभागातून आपलं राज्य विकसीत आणि समृद्ध बनवूया, असं आवाहन राज्यपालांनी केलं.
आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्तही त्यांनी राज्यातील सर्व कामगारांनादेखील शुभेच्छा
दिल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना
त्यांनी आदरांजली वाहिली.
****
५७ वा महाराष्ट्र दिन मराठवाड्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.
जालना इथं राज्याचे पाणी पुरवठा तसंच स्वच्छता मंत्री आणि
जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात
आलं.
जिल्ह्यात जालना, परतूर आणि मंठा तालुक्यातल्या १७६ गावांना
ग्रीडद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी २३४ कोटी रुपये निधीतून योजना तयार होत आहे. आगामी
काळात या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्याला शुद्ध पाणी पुरवठा करण्याचं नियोजन असल्याचं
पाणी पुरवठा मंत्र्यांनी सांगितलं. संपूर्ण राज्य उघड्यावर शौचापासून मुक्त करण्यासाठी
प्रत्येकानं वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करण्याचं आवाहन लोणीकर यांनी
केलं.
लातूर इथं ५७ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त कौशल्य विकास तसंच
कामगार कल्याणमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ध्वजारोहण
केलं. “उन्नत शेती समृध्द शेतकरी” या मोहिमेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं
आवाहन निलंगेकर यांनी यावेळी केलं. महसूल तसंच पोलिस प्रशासन विभागात उत्कृष्ट काम
करणारे कर्मचारी आणि स्वच्छ भारत अभियानात उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा
पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उस्मानाबाद इथं राज्याचे परिवहन मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते
यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं.
हिंगोली इथं संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री
तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर
पालकमंत्र्यांनी परेडचं निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय
कामगिरी करणारे अधिकारी - कर्मचारी तसंच विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार
देऊन गौरवण्यात आलं. पोलीस प्रशासनाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या ‘दामिनी : एक स्वयंपूर्णा’
या पूस्तिकेचं प्रकाशनही कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं.
बीड जिल्ह्यात परळी इथं यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात विधान परिषदेतले
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
आज आंतरराष्ट्रीय श्रम दिन म्हणजेच कामगार दिन सर्वत्र साजरा केला जात आहे.
श्रमजीवींच्या कामाचा अवधी आठ तास करण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाच्या स्मरणार्थ
तसंच आर्थिक आणि सामाजिक हक्क प्राप्त करण्यासाठी कामगारांनी दिलेल्या बलिदानाच्या
स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
****
वाहनांवर लाल दिवा लावण्यावर आजपासून प्रतिबंध लावण्यात येणार आहे. देशातील
सर्व मंत्री आणि केंद्र सरकारचे अधिकारी आजपासून सरकारी वाहनांवर लाल दिवा लावू शकणार
नाहीत. आपातकालीन परिस्थितीत रूग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना लाल दिवा लावण्याची
परवानगी राहणार आहे. व्हीआयपी संस्कृती आणि मानसिकता संपुष्टात आणण्याच्या दृष्टीनं
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.
****
पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातल्या अजोती गावात काल उजनी धरणात बोट उलटून
झालेल्या अपघातात ४ डॉक्टरांचा बुडून मृत्यू झाला. सहा जणांना वाचवण्यात यश आलं. हे
सर्व जण सोलापूर जिल्ह्यातले रहिवासी आहेत.
****
बीड जिल्ह्यातील नगरसेवकाच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात
उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी.व्ही. नलावडे यांनी दिले आहेत. नगरसेवक शेख अब्दुल
मुखीद अब्दुल रज्जाक यांनी जुल्ला या जातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. या
प्रकरणात तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राचे संचालक विलास वरेकर यांनी याचिकाकर्त्यांविरोधात
शहर पोलिस ठाण्यात तसंच तहसीलदार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. त्याआधारे
शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
****
No comments:
Post a Comment