Tuesday, 16 May 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date- 16 May 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ मे २०१७ सकाळी ६.५०

****

·       तोंडी तिहेरी तलाक पद्धतीला पर्याय म्हणून नवीन कायदा करण्याची केंद्र सरकारची तयारी

·       पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर दोन रूपयांहून अधिक कपात

·       शिक्षण संस्थांसाठीच्या शुल्क नियंत्रण कायद्यात सुधारणा करण्याचं शिक्षणमंत्र्यांचं आश्वासन

आणि

·       परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे गटाला बहुमत

****

सर्वोच्च न्यायालयानं मुस्लिम धर्मातली तिहेरी तोंडी तलाक पद्धत अवैध आणि असंवैधानिक ठरवल्यास, केंद्र सरकार मुस्लिम धर्मातले विवाह तसंच घटस्फोटाचं नियमन करण्यासाठी नवीन कायदा आणेल, असं केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. न्यायालयात तिहेरी तलाकवर सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान काल महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी केंद्र सरकारच्यावतीनं बाजू मांडतांना, बहुपत्नीत्व आणि निकाह-हलाला यासारख्या मुद्यांवरही सुनावणी व्हावी, अशी मागणी केली. मात्र न्यायालयानं तिहेरी तलाकच्या मुद्यावर सुनावणीनंतर बाकीच्या मुद्यांवर सुनावणी घेण्यात येईल, असं सांगितलं. तिहेरी तलाक संदर्भात देण्यात येणाऱ्या निर्णयाचा परिणाम इतर दोन मुद्यांवर होऊ शकतो, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

****

भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात नेदरलँडमध्ये हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात कालपासून सुनावणी सुरू झाली. पाकिस्तानी लष्करानं जाधव यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचा आरोप भारताचे वकील हरीश साळवे यांनी यावेळी केला. जाधव यांना सुनावलेली शिक्षा, हा व्हिएन्ना कराराचा भंग असून, जाधव यांना भारतीय राजदूताची भेट घेऊ दिली नाही, असंही साळवे म्हणाले. कुलभूषण जाधव यांच्या कबुली जबाबाची चित्रफित बनावट असल्याचंही साळवे यांनी न्यायालयात सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं ही चित्रफित दाखवण्यास परवानगी दिली नाही.   

****

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. पेट्रोल प्रतिलीटर दोन रुपये सोळा पैसे तर डिझेल प्रतिलीटर दोन रुपये दहा पैशांनी स्वस्त झालं आहे. मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात झालेली घसरण आणि डॉलरच्या तुलनते रूपयाचे मूल्य वाढल्याच्या पार्श्वभूमीवर हे दर कमी करण्यात आले असल्याचं भारतीय तेल कंपनी महामंडळानं सांगितलं.

****

विद्यमान शुल्क नियंत्रण कायद्यात लवकरच सुधारणा करण्यात येईल तसंच कोणत्याही शाळांना अथवा शिक्षण संस्थांना नफेखोरी करु देणार नाही असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं आहे. शैक्षणिक शुल्क वाढीसंदर्भात तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल पुण्यातल्या १८ पैकी सहा शाळांची सुनावणी घेण्यात आली, त्यानंतर ते बोलत होते. नफेखोरी झाल्याचं आढळून आल्यास अशा शाळा आणि शिक्षण संस्थांवर कारवाई करण्यात येईल अशी ताकीदही त्यांनी दिली. भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र - आयसीएसईच्या कोणत्याही शाळांना पुस्तकं शाळेतूनच घेण्याची सक्ती पालकांवर करता येणार नाही असंही तावडे यांनी यावेळी नमूद केलं.

****

शैक्षणिक संस्थांच्या मनमानी शुल्कवाढी विरोधात सिस्कॉम संस्थेनं नुकताच एक अहवाल शासनाला सादर केला. मुंबईत काल झालेल्या वार्ताहर परिषदेत सिस्कॉमचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर यांनी ही माहिती दिली. शिक्षण सुधारणा मोहिमेअंतर्गत शुल्क फेररचना करण्यासाठी हा अभ्यासपूर्ण सूचना अहवाल तयार केला असल्याचं त्यांनी सांगितलं. शुल्क रचना सुधारण, शाळांच्या रचना सुधारण, शाळेच्या विकासासाठी साधारण तेरा टक्के वाढ सुचवण्यात आली आहे. या अहवाल आणि पद्धतीनुसार सर्वसामान्य पालकांनाही त्यांच्या पाल्यांसाठीचं अधिकृत शुल्क किती असावं हे समजणार आहे असंही धारणकर यांनी सांगितलं.

****

राज्यात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये उपलब्ध रुग्णखाटांच्या प्रमाणात अध्यापक वर्ग आणि विद्यार्थी संख्या वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत, त्याबाबतचा कृती अहवाल तीन महिन्यांत सादर करण्यासही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. रुग्ण आणि डॉक्टरांच्या हिताबरोबरच डॉक्टरांच्या सेवा तसंच कर्तव्यामध्ये समतोल साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले असून त्याची पूर्तता करण्यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.

या निर्णयामुळे आरोग्य सेवेचा दर्जा वाढवणं, अध्यापक डॉक्टर आणि विद्यार्थ्यांच्या कामाचा ताण कमी करणं, उपलब्ध सोयी - सुविधांचा पूर्ण क्षमतेनं वापर करणं तसंच पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढवणं शक्य होणार आहे.

****

सामान्य नागरिकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाने लोकशाही दिनाची वाट पाहू नये, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात काल ऑनलाईन लोकशाही दिनात नागरिकांच्या तक्रारीवर सुनावणीनंतर ते बोलत होते. यापूर्वीच्या लोकशाही दिनातल्या प्रलंबित प्रकरणावर तीन दिवसांत कारवाईचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी २३ प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली, यामध्ये औरंगाबाद, बीड, आणि परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांच्या तक्रारींचाही समावेश होता.

****

राज्यातल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कर्जमाफीची नाही तर कर्जमुक्तीची गरज आहे, असं मत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केलं. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसेनेकडून संपूर्ण शिवसंपर्क अभियान राबवलं जात आहे, या अभियानाअंतर्गत उध्दव ठाकरे काल अकोल्यात बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना गंभीर असल्याचं सांगत, शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, गरज पडली तर सरकारविरोधात जनआंदोलन उभं करायची शिवसेनेची तयारी आहे असंही उध्दव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

****

जगभरात अनेक देशातल्या संगणक प्रणाली ठप्प करणाऱ्या ‘रॅन्समवेअर’ व्हायरसचा एटीएम यंत्रणेलाही धोका असल्याची शक्यता व्यक्त करत, भारतीय रिजर्व्ह बँकेनं सर्व बँकांना एटीएम यंत्रणेचे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. एटीएम यंत्रणा अद्ययावत होईपर्यंत ती वापरु नये असं रिजर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. 

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

बीड जिल्ह्यात परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पंडितअण्णा मुंडे शेतकरी विकास पॅनलनं १८ पैकी १४ जागा जिंकून विजय मिळवला. तर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे शेतकरी विकास पॅनलला अवघ्या चार जागा जिंकता आल्या. दोन्ही गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

****

सीना कोळेगाव प्रकल्पातून भोत्रा बंधाऱ्यामध्ये साडे तीन दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. उस्मानाबादचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पाण्याचा लाभ फक्त परवानाधारक शेतकरीच घेतील यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, थकबाकीदार परवानाधारकांकडून तातडीने थकबाकी वसूल करण्यात यावी, नदीपात्रात बेकायदेशीर वीज पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री रावते यांनी यावेळी दिले.

****

परभणी महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज निवड होणार आहे. महापौर पदासाठी चार तर उपमहापौर पदासाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत. परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नसून, ६५ पैकी सर्वाधिक ३१ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं १८, भारतीय जनता पक्षानं आठ, शिवसेनेनं सहा तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. दरम्यान, महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथीची शक्यता गृहीत धरून प्रशासनानं मोठा बंदोबस्त लावला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात रेणापूर नगर पंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत २४ मे रोजी मतदान होणार आहे. पंचायतीच्या १७ जागांसाठी ७३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, एकाही पक्षाला पूर्ण १७ उमेदवार देता आलेले नाहीत. कॉंग्रेस पक्षाचे १५ अधिकृत उमेदवार असून दोन पुरस्कृत उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षाचे १६ अधिकृत उमेदवार असून एक पुरस्कृत उमेदवार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस १३, शिवसेना १५, राष्ट्रीय समाज पक्ष दोन, तर संभाजी सेना आठ जागा लढवत आहे. नगर पंचायतीचं अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालेलं आहे.

****

कालबद्ध पदोन्नतीचा आदेश निर्गमित करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून लाच मागणाऱ्या हिवताप विभागच्या सहायक संचालकास काल औरंगाबाद इथं रंगेहाथ अटक करण्यात आली. संजय देशपांडे असं त्याचं नाव असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्याला, दोन कर्मचाऱ्यांकडून पाच हजार रुपये लाच घेताना, कार्यालयात अटक केली.

****

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर देवानंद शिंदे यांच्याकडे पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून कार्यभार काल सोपवण्यात आला आहे.

//*******//


No comments:

Post a Comment