Friday, 19 May 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date- 19 May 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९  मे २०१७ सकाळी ६.५०

****

·       अत्यावश्यक वस्तू आणि धान्य, वस्तू आणि सेवा करातून वगळण्याचा निर्णय 

·       निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची अंतरीम स्थगिती

·       केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री अनिल दवे यांचं निधन

·      प्रसिद्ध चरित्र अभिनेत्री रिमा लागू यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार

आणि

·       मराठी पत्रकार परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मा.गो. वैद्य यांना जाहीर

****

      येत्या एक जुलैपासून लागू होणाऱ्या वस्तू आणि सेवा करातून अत्यावश्यक वस्तू आणि धान्य यांना मुक्त करण्याचा निर्णय वस्तु आणि सेवा कर परीषदेनं घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली काल श्रीनगर इथं जीएसटी परीषदेची दोन दिवसाची बैठक सुरू झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विविध एक हजारावर वस्तूंच्या कराच्या दरासंदर्भात काल चर्चा झाली. दूध, दही, गहू, तांदळासह सर्व धान्यं, या करातून पूर्णपणे मुक्त राहतील, तर साखर, चहा, कॉफी, आणि खाद्यतेलावर पाच टक्के दरानं कर आकारला जाणार आहे. केशतेल, साबण, टूथपेस्टसह दैनंदिन वापराच्या वस्तूंवरचा कर २२ ते २४ टक्क्यांवरून आता १८ टक्के होणार आहे, तर बहुतांश वस्तूंवर १८ टक्क्यांपेक्षाही कमी दर आकारला जाणार आहे. एक हजार २११ पैकी एक हजार २०६ वस्तुंसाठी काल परीषदेनं कर दर निश्चित केले. सोने, पादत्राणांसह ब्राण्डेड वस्तूंवरील दरांबाबत आज चर्चा होणार आहे.

****

आंतरराष्ट्रीय न्यायालयानं काल भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला अंतरीम स्थगिती दिली. याप्रकरणाची अंतिम सुनावणी होईपर्यंत जाधव यांना सुनावलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात येऊ नये असं ११ न्यायाधिशांच्या पीठानं एकमतानं पाकिस्तानला सांगितलं. जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्ताननं अटक केली होती. त्यानंतर पाक लष्करी न्यायालयानं त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, जाधव हे भारताचे हेर असल्याचं अद्याप सिद्ध झालं नसल्याचं सांगत, न्यायालयानं, प्रत्येक देशाला आपल्या नागरिकाला भेटण्याचा अधिकार असल्याचं नमूद करत, व्हिएन्ना कराराअंतर्गत पाकिस्ताननं भारतीय राजदूतांना जाधव यांना भेटू द्यावं, असे निर्देश दिले. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा हा निर्णय पाकिस्तानला पाळणं बंधनकारक असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे.

****

मुस्लिम धर्मातल्या तिहेरी तलाकच्या मुद्यावर ११ मे पासून सुरु असलेली सुनावणी पूर्ण झाली असून, सर्वोच्च न्यायालयानं याप्रकरणी आपला निकाल राखून ठेवला आहे. या सुनावणीदरम्यान मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं महिलांचं म्हणणं जाणून घेण्याचं आश्वासन दिलं. महाधिवक्ता मुकूल रोहतगी यांनी सरकारची बाजू मांडताना, हिंदू धर्मातल्या सती, देवदासी यांसारख्या अनिष्ट प्रथा कायदा करून संपुष्टात आणल्याचा दाखला दिला. न्यायालय लवकरच याप्रकरणी निर्णय सुनावण्याची शक्यता आहे.

****

राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सत्तारूढ शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्यात काल ही यात्रा रत्नागिरीहून सिंधुदूर्ग जिल्ह्यात रवाना झाली, त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विखे पाटील बोलत होते. शिवसेनेला सत्तेचे फायदे हवेत, मात्र जबाबदारी नको, अशी टीकाही यावेळी करण्यात आली. दरम्यान, या संघर्ष यात्रेची सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं काल सांगता झाली. यात्रेच्या सांगता सभेला माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, यांच्यासह विरोधी पक्षांचे मान्यवर नेते उपस्थित होते.

****

केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री अनिल दवे यांचं काल नवी दिल्लीत हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं, ते ६० वर्षांचे होते. नर्मदा नदी शुद्धीकरणासाठी भरीव काम केलेल्या दवे यांनी पर्यावरण जतनासंदर्भात अनेक पुस्तकं लिहिली आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभाध्यक्षांसह राजकीय क्षेत्रातून दवे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त होत आहे. दवे यांच्या पार्थिव देहावर आज मध्यप्रदेशात होशंगाबाद इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.

दरम्यान, दवे यांच्या निधनामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा कार्यभार केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

दवे यांच्या निधनाने समर्पित लोकसेवक हरपला असल्याचं, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे, तर महाराष्ट्रातल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चालना देणारा निगर्वी पर्यावरणवादी आपण गमावला, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी दवे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

****

ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईतल्या ओशिवारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रिमा लागू यांचं काल पहाटे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्या ५९ वर्षांच्या होत्या. विविध मराठी - हिंदी चित्रपट, तसंच दूरचित्रवाणी मालिका, मराठी नाटकं तसंच अनेक जाहिरातपटातून काम केलेल्या रिमा लागू यांच्या निधनाबद्दल अभिनय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी रिमा लागू यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

मराठी पत्रकार परिषदेचा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मा.गो. वैद्य यांना जाहीर झाला आहे. २५ हजार रूपये, मानपत्र आणि स्मृती चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवाड्यात नागपूर इथं वैद्य यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याचं, परिषदेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 

रिषदेचे विविध अकरा पुरस्कार काल जाहीर करण्यात आले, यामध्ये आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर यांना, तर नागोजीराव दुधगावकर स्मृती पुरस्कार बीड इथले ज्येष्ठ पत्रकार नामदेव क्षीरसागर  यांना जाहीर झाला आहे.

****

औरंगाबाद इथं काल ‘पोस्टमन मोबाईल ॲप’चा पोस्ट मास्टर जनरल प्रणव कुमार यांच्या हस्ते प्रारंभ झाला. पत्रं तसंच पार्सल मिळाल्याची पोच पावती मोबाईलच्या माध्यमातून देण्याचा हा राज्यातला पहिला प्रयोग आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या १८ टपाल कार्यालयात ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

****

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात काल खरीप मेळावा घेण्यात आला. विद्यापीठाच्या ४५व्या वर्धापन दिनानिमित्त या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यापीठानं विकसित केलेल्या विविध बियाणांची या मेळाव्यात विक्री करण्यात आली.

****

परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातल्या देवगाव फाट्याजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारी जीप उलटून पाच जण ठार तर नऊ जण जखमी झाले. काल सायंकाळी हा अपघात घडला. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून, सर्व जखमींवर जालन्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

****

जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचं, जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. मंठा तालुक्यातल्या बरबडा इथं प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना संपादित जमिनीच्या मोबादल्याचं वाटप लोणीकर यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, जालना जिल्ह्याच्या एक हजार ३५६ लाख रुपये पाणीटंचाई आराखड्यास काल मंजुरी देण्यात आली. या आराखड्यांतर्गत जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ विविध कामं करण्यात येणार आहेत. 

****

लातूर जिल्ह्यात रेनवॉटर हार्वेस्टिंग अर्थात छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवणं बंधनकारक करणार असल्याचं जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी म्हटलं आहे. ते काल वार्ताहरांशी बोलत होते. जिल्ह्यातल्या सर्व नगर पालिकांना रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी स्वतंत्र विभाग तयार करून, भूवैज्ञनिक नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उदगीर शहरात जलयुक्त उदगीर या संस्थेनं यासंदर्भात काम सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली. ही यंत्रणा बसवणाऱ्या मालमत्तांना करात सूट दिली जाते, असं सांगतानाच, साम, दाम, दंड वापरुन ही योजना यशस्वी करणार, असल्याचं,  जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

नांदेड इथं जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी काल मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली, संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सतर्क राहून, समन्वयानं आणि तत्परतेनं प्रयत्न करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

****

लातूर महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या सोमवारी निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं दोन पदांसाठी चार तर काँग्रेसकडून दोन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. लातूर महापालिकेत भाजपला बहुमत आहे.

//*******//


No comments:

Post a Comment