Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 20
MAY 2017
Time - 1.00
to 1.05 pm
Language
– Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २०
मे २०१७ दुपारी १ वा
****
वस्तू
आणि सेवाकर - जीएसटी विधेयकाच्या मंजुरीसाठी राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन आजपासून
मुंबई इथं सुरु झालं. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे विधेयक मांडलं. अर्थमंत्र्यांनी
जीएसटी संबंधित सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप
वळसे पाटील यांनी केली. तर जीएसटीबाबत सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. जीएसटीमुळे एलबीटी, जकात
कर रद्द होणार असून, त्यामुळे सामान्य जनतेला कमी कर भरावा लागणार असल्याचं मुनगंटीवार
यांनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, जीएसटी विधेयकासोबत
शेतकरी कर्ज माफीचीही घोषणा करण्याची मागणी विरोधकांनी यावेळी लाऊन धरली.
****
महाराष्ट्र
सरकारनं कर्नाटकातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दररोज तीन टीएमसी पाणी
सोडण्यास संमती दर्शवली आहे. मुंबई इथं दोन्ही राज्यांच्या सचिवांच्या बैठकीत हा निर्णय
घेण्यात आला. कर्नाटकचे जलसंधारण मंत्री एम बी पाटील यांनी ही माहिती दिली. कर्नाटकातल्या
विजयपुरा, बागलकोट आणि बेळगाव जिल्ह्यांसाठी हे पाणी सोडण्यात येणार आहे. कर्नाटक सरकारनं
दररोज चार टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली होती, मात्र राज्यात असलेल्या पाण्याच्या
कमतरतेमुळे तीन टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
****
निवडणूक आयोग आज नवी दिल्ली इथं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे अर्थात ईव्हीएम
आणि व्हीव्हीपॅटचं प्रात्यक्षिक दाखवणार आहे. यावेळी निवडणूक आयोग ईव्हीएम आणि मतदानाची
पोहच देणारं व्हीव्हीपॅट कसं काम करतं हे प्रत्यक्ष दाखवणार आहे. नुकतच निवडणूक आयोगानं
सर्व राजकीय पक्षांना ईव्हीएम यंत्रामध्ये काही छेडछाड करता येते हे सिद्ध करून दाखवण्याचं
आव्हान दिलं होतं. आजच्या या प्रात्यक्षिकानंतर
निवडणूक आयोग एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राजकीय पक्षांना दिलेलं आव्हान सिद्ध करून
दाखवण्यासाठीचं वेळापत्रक जाहीर करणार आहे.
****
राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एन आय एचं एक पथक आज श्रीनगरमध्ये दाखल
झालं असून हुरियतचे नेते सय्यद अली शाह गिलानी आणि इतर तिघांची चौकशी करणार आहे. देश
विघातक कारवाया करण्यासाठी लष्कर ए तयबाचा प्रमुख हाफिज सईदकडून आर्थिक निधी घेण्याचा
त्यांच्यावर आरोप आहे. सैन्य दलातल्या जवानांवर दगडफेक करणं, सार्वजनिक मालमत्तांची
तोडफोड करणं, शाळा आणि सरकारी कार्यालयांमध्ये जाळपोळ करण्याच्या कारवायांसाठी त्यांना
हाफिज सईदकडून रसद मिळत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
****
भारतानं जागतिक लक्ष्याच्या पाच वर्षे अगोदर २०२५ पर्यंत
क्षयरोग निर्मुलन करण्याचं उद्दीष्ट निश्चित केलं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री
जे पी नड्डा यांनी सांगितलं. या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण २०३० पर्यंत ९०
टक्के कमी करण्याचं जागतिक लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. बर्लिन इथं आयोजित स्टॉप टीबी
पार्टनरशिप समन्वय समितीच्या २९व्या बैठकीत ते बोलत होते. भारतानं क्षयरोगाचं पूर्णपणे
उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय योजनाही तयार केली असल्याचं ते म्हणाले.
****
भारतीय वैदयकीय संशोधन संस्था आय सी एम आर नं वैद्यकीय
उपचाराबाबतचे प्रयोग आणि संशोधन करत असलेल्या ज्या भारतीय वैद्यकीय संस्था आंतरराष्ट्रीय
संयुक्त संस्था युएनकडून आर्थिक मदत घेत आहे त्यांच्यासाठी युएनच्या शिफारशी लागू करण्याचा
निर्णय घेतला आहे. याअंतर्गत अशा संस्थां करत असलेल्या वैद्यकीय प्रयोग आणि संशोधनाची
नोंद आणि त्या संशोधनाचे परिणाम सार्वजनिक करणे बंधनकारक असेल.
****
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं यमूना नदीच्या दोन्ही बाजूंनी शौचास जाणे
अथवा टाकाऊ वस्तू टाकणे यावर बंदी घातली आहे. न्यायाधिकरणानं याबाबत नियमभंग करणारास
पाच हजार रुपये दंड करण्याचं जाहीर केलं आहे. न्यायाधिकरणानं याबाबतच्या आदेशाचं पालन
होण्यासाठी तसंच यमुनेच्या स्वच्छतेबाबतच्या कामाची देखरेख करण्यासाठी दिल्लीच्या जल
मंडळाच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. न्यायाधिकरणानं दिल्ली सरकार
आणि महानगरपालिकेला रहिवाशी भागांमध्ये कार्यान्वित असलेल्या आणि यमुनेमध्ये घाण सोडणाऱ्या
कारखान्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
****
राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातल्या ई-सर्च
प्रणालीच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षांतील मालमत्तांची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध
करुन दिली जाणार आहे. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी पुणे इथं वार्ताहर
परिषदेत ही माहिती दिली.
//********//
No comments:
Post a Comment