Monday, 1 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.05.2017 - 05.25pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 1 May 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ मे  २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

जम्मू काश्मीरच्या पुंछ भागात नियंत्रण रेषेजवळ आज सकाळी पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद तर दोन जवान जखमी झाले. कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानी सैन्यानं भारतीय चौक्यांवर स्वयंचलित हत्यारांनी गोळीबार केल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी आज एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. गृहसचिव, केंद्रीय राखीव पोलीस लाचे महानिदेशक, गुप्तचर संघटनेचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे प्रमुख या बैठकीत उपस्थित होते. छत्तीसगडमध्ये सुकमा इथं नुकताच झालेला नक्षली हल्ला आणि जम्मू काश्मीरमध्ये वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.

****

देशाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कामगारांच्या दृढनिश्चयाला आणि त्यांच्या कठीण परिश्रमाला नमन करत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त ट्विटरवरून दिलेल्या शुभेच्छा संदेशात पंतप्रधानांनी ही बाब नमूद केली.
दरम्यान, कामगारांना काम, वेतन आणि सामाजिक सुरक्षा देण्यास सरकार प्राथमिकता देत असल्याचं श्रम आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी म्हटलं आहे. श्रमिक आणि त्याच्या कुटुंबाला आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या मंत्रालयानं एक विमाधारक व्यक्ती-दोन औषधालयं ही योजना सुरू केली असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

५७ वा महाराष्ट्र दिन मराठवाड्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.
नांदेड इथं पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर राज्याचे पशूसंवर्धन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. पोलिस परेडचं निरीक्षण करून पालकमंत्र्यांनी मानवंदना स्वीकारली.
परभणी इथं प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलावर जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आदर्श तलाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. पोलिस तसंच महसुली अधिकारी कर्मचारी, स्मार्ट ग्राम योजनेत उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायती, लघुउद्योजक यांच्यासह धावपटू ज्योती गवते हिचाही जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
बीड इथं पोलिस कवायत मैदानावर राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. बीड हा कष्टकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांच्या सर्वांगी प्रगतीसाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुंडे यांनी यावेळी दिली. पावसामुळं निर्माण झालेलं शाश्वत पाणीसाठ्याचं श्रेय हे आपल्या सरकारनं राबलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला जातं. बीड जिल्हा आता दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा, आपल्याला अभिमान आहे असंही पालकमंत्र्यांनी नमूद केलं.
दरम्यान, पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत बीड इथं जिल्हा रुग्णालयातल्या नोंदणी कक्षाचं उदघाटन करून, पालकमंत्री मुडे यांच्या हस्ते अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. बीड जिल्ह्यात १ ते २७ मे दरम्यान या अभियानांतर्गत पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहिम राबविण्यात येत असून बीड जिल्ह्यातल्या जनतेनं या योजनेचा आवर्जून लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री मुंडे यांनी केलं.

****

औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या कामासाठी १५० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी आता सर्व राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन रस्ते बांधकामाचं योग्य नियोजन करावं, असं आवाहन पालकमंत्री रामदास कदम यांनी केलं. शहरातील ज्योतीनगर परिसरात दीड कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या डांबरी रस्त्याच्या शुभारंभाप्रसंगी पालकमंत्री कदम बोलत होते. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी  महापौर, आयुक्त, सर्व राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी समांतर पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक घ्यावी. पिण्याच्या पाण्याच्या पवित्र कामात राजकारण आणता एकमेकांना विश्वासात घेवून जनतेची कामं करावीत असंही ते म्हणाले.

****

अहमदनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक खर्चाचा अहवाल वेळेत सादर न केलेल्या उमेदवारांविरूद्ध निवडणूक आयोगानं कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. अशाप्रकारे अहवाल सादर न केलेले एकूण १११ उमेदवार असून या सर्वांना लवकरच आयोगाकडून नोटिसा बजावण्यात येणार आहेत. या उमेदवारांकडून लेखी स्वरूपात स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

No comments:

Post a Comment