Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 18
MAY 2017
Time - 1.00
to 1.05 pm
Language
– Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १८
मे २०१७ दुपारी १ वा
****
केंद्रीय पर्यावरण
आणि वनमंत्री अनिल माधव दवे यांचं आज दिल्ली इथं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं,
ते ६० वर्षांचे होते. पर्यावरण मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नर्मदा नदी
बचावासाठी काम केलं. पर्यावरणाच्या जतनीकरणाविषयी त्यांनी अनेक पुस्तकं लिहीली. दवे
यांच्या निधनामुळे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक
व्यक्त केला आहे. निधनाचं वृत्त ऐकून आपल्याला धक्का बसला, तसंच दवे हे पर्यावरणाचं
जतन करण्याच्या दिशेनं प्रचंड उत्साही पद्धतीनं कार्य करत होते, त्यांच्या निधनानं माझं वैयक्तिक नुकसान झालं, असं पंतप्रधानांनी
ट्विटरवरील आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, भारतीय
जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा, शिवराज
चौहान, राजीव प्रताप रुडी आदी मंत्र्यांनीही दवे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
दवे यांच्या निधनानं महाराष्ट्रातल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चालना देणारा साधा
आणि निगर्वी पर्यावरणवादी आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दवे यांच्या पार्थिव देहावर उद्या इंदूर इथं
अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांच्या निधनानं पंतप्रधान नरेंद्र
मोदी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण
मंत्री व्यंकय्या नायडू, राज्यमंत्री राज्यर्धनसिंग राठोड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी शोक व्यक्त केला आहे. चित्रपट, रंगभूमी आणि दूरचित्रवाणी या तीनही माध्यमांत आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण
करणाऱ्या रिमा लागू यांच्या निधनानं एक चतुरस्त्र अभिनेत्री गमावली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांना
श्रद्धांजली अर्पण केली. तसंच सीने सृष्टीतल्या अनेक कलाकारांनीही लागू यांना श्रद्धांजली अर्पण केली. लागू यांचं
आज पहाटे मुंबई इथं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्या
५९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर थोड्याच वेळात मुंबई इथल्या ओशिवारा
स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
आंतरराष्ट्रीय न्यायालय आज माजी नौदल
अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावरील खटल्याचा निर्णय सुनावणार आहे. दुपारी साडेतीन वाजता
हा निर्णय येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत आणि पाकिस्ताननं आपापली बाजू न्यायालयासमोर
मांडली आहे. जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं सुनावलेली फाशीची शिक्षा
तत्काळ रद्द करावी अशी मागणी भारतानं केली आहे.
****
श्रीनगर इथं आज वस्तू आणि सेवा कर - जीएसटी परिषदेची बैठक होणार
आहे. वस्तू आणि सेवांवर लावल्या
जाणार्या करांच्या दरावर या बैठकीत चर्चा होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
यांच्यासह सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री यावेळी उपस्थित राहणार
आहेत.
****
सैन्यानं सीमेपलिकडून होणाऱ्या
कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर
देण्यास सज्ज राहवं, असं केंद्रीय संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. श्रीनगर
इथं लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ते वार्ताहरांशी
बोलत होते. यावेळी त्यांनी जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला.
****
दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या कल्याणकारी
योजनांच्या प्रभावी अंमलबाजावणीसाठी सर्व राज्यांनी स्वतंत्र विभाग स्थापन करावेत असं
आवाहन, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी केलं आहे. दिव्यांगांसाठी
असलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीबाबतच्या आढावा बैठकीचं उद्घाटन गहलोत यांच्या हस्ते
काल नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते. दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारांविषयीचं
विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यांच्या वर्गवारीची संख्या २१ झाल्याचं त्यांनी सांगितलं.
****
देशातल्या दहा स्वच्छ रेल्वे स्थानकांमध्ये
पुणे रेल्वे स्थानकाचा समावेश झाला आहे. क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया या स्वतंत्र एजन्सीनं
नुकताच देशातल्या अ १ श्रेणीतल्या ७५ आणि अ श्रेणीतल्या ३२३ रेल्वे स्थानकांवरच्या
स्वच्छतेचं सर्वेक्षण केलं, यात पहिल्या दहा मध्ये पुणे रेल्वे स्थनाकाचा नववा क्रमांक
लागला आहे. पुणे शहरातल्या विविध स्वयंसेवी संघटना, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी
यांनी पुणे स्थानकाच्या स्वच्छता मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला.
****
देशात वस्तू आणि सेवा कर - जी एस टी
प्रणाली येत्या एक जुलैपासून लागू होणार असून, या कर प्रणालीचा लाभ ग्राहक, व्यापारी
आणि शासन या सर्व घटकांना होणार आहे. तरी ग्राहक आणि व्यापारी वर्गानं या कर प्रणालीबाबत
कोणत्याही प्रकारची भिती बाळगू नये असं आवाहन, औरंगाबाद इथल्या केंद्रीय उत्पादन शुल्क
कार्यालयाचे आयुक्त, सी. एल. महर यांनी केलं आहे. ते काल लातूर इथं एका चर्चासत्रात
बोलत होते. लवकरच कोणत्या वस्तूसाठी किती कराचा दर असेल, हे ठरवलं जाईल, असं त्यांनी
यावेळी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment