Thursday, 18 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 18.05.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 May 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिली आहे. अंतिम निकाल येईपर्यंत जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. जाधव हे भारताचे हेर असल्याचं अद्याप सिद्ध झालं नसल्याचं न्यायालयानं सांगितलं. जाधव यांना पाकिस्ताननं भारतीय राजदुताला भेटु दिलं नसल्याचा आरोप भारतानं केला होता. यावर प्रत्येक देशाला आपल्या नागरिकाला भेटण्याचा अधिकार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. पाकिस्ताननं या प्रकरणाची पूर्ण माहिती सांगावी, असं न्यायालयानं म्हटलं आहे. व्हिएन्ना कराराअंतर्गत पाकिस्ताननं भारताला जाधव यांना भेटू द्यावं, असा निर्णय न्यायालयानं सुनावला आहे.   

****

मुस्लिम धर्मातल्या तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर ११ मे पासून सुरु असलेली सुनावणी पूर्ण झाली असून, सर्वोच्च न्यायालयानं याप्रकरणी आपला निकाल राखून ठेवला आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सहा दिवस युक्तीवाद चालला. सुनावणीदरम्यान मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं महिलांचं म्हणणं जाणून घेण्याचं आश्वासन दिलं. आज झालेल्या सुनावणी दरम्यान महाधिवक्ता मुकूल रोहतगी यांनी सरकारची बाजू मांडताना, हिंदू धर्मातल्या सती, देवदासी यांसारख्या अनिष्ठ प्रथा कायदा करून संपुष्टात आणण्यात आल्याचा दाखला दिला. केंद्र सरकार मुस्लिम धर्मातल्या या प्रथांसाठी कायदा करण्यास तयार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. न्यायालय लवकरच याप्रकरणी निर्णय सुनावणार आहे.

****

वस्तु आणि सेवा कर-जीएसटी परिषदेची चौदावी बैठक आजपासून श्रीनगर इथं सुरु झाली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील या बेठकीत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री सहभागी झाले आहेत. या बैठकीत जीएसटी अंसर्गत करांचे दर निश्चित करण्यात येणार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये जीएसटी लागू करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचं जेटली यांनी बैठकीआधी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.  

****

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. पर्यावरण मंत्री अनिल दवे यांचं आज निधन झालं, त्यानंतर मंत्रालयाचा कार्यभार हर्षवर्धन यांच्याकडे सोपवण्यात आला. ५ जुलै २०१६ रोजी मंत्रिमंडळ विस्तारात दवे यांच्याकडे पर्यावरण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
दरम्यान, दवे यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय दुखवटा म्हणून राजधानी दिल्लीसह सर्व राज्यांच्या राजधानीतल्या सरकारी इमारतींवरील भारताचे ध्वज आज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत. दवे यांच्या पार्थिव देहावर उद्या इंदूर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

****

रिमा लागू यांच्या आकस्मिक निधनामुळे लोकप्रिय आईला आपण कायमचं गमावलं असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी शोक संदेशाद्वार लागू यांना श्रद्धांजली अर्पण केली. सीने सृष्टीतल्या अनेक कलाकारांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. लागू यांचं आज पहाटे मुंबई इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्या ५९ वर्षांच्या होत्या.

****

वन्यजीव संरक्षण क्षेत्रात कार्यरत पूर्णिमा देवी बर्मन यांना आज २०१७ या वर्षासाठीच्या विटले पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. लंडनमध्ये हा सोहळा होणार आहे. प्रतिष्ठेचा मानला गेलेला विटले पुरस्कार ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जातो. ६६ देशांमधल्या १६९ संशोधकांमधून बर्मन यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

****

औरंगाबाद इथं आज ‘पोस्टमन मोबाईल ॲप’चा शुभारंभ पोस्ट मास्टर जनरल प्रणव कुमार यांच्या हस्ते झाला. मोबाईलच्या माध्यमातून पत्रे आणि वस्तु मिळाल्याची पोच पावती देण्याचा हा राज्यातला पहिला प्रयोग आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या १८ टपाल कार्यालयात ही सुविधा उपलब्ध झाली आहे. यावेळी २५७ पोस्टमनला मोबाईल वाटप करण्यात आलं.

****

आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी अधिक सतर्कता, समन्वय आणि तत्परतेनं प्रयत्न करावेत, अशी सूचना नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे. नांदेड इथं मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते आज बोलत होते. आपत्ती व्यवस्थापनात तातडीनं माहिती उपलब्ध होणं आणि त्यावर लवकरात लवकर कारवाई करणं अपेक्षित असतं, त्यामुळे सर्व यंत्रणांनी दक्ष रहावं, असं ते म्हणाले. 

****

सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथं उघडकीस आलेल्या अवैध गर्भपात प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय वैद्यकीय समितीचं पथक सांगली इथं दाखल झालं आहे. हे पथक याप्रकरणाचा संपूर्ण अहवाल केंद्र सरकारकडे सादर करणार आहे. या प्रकरणाच्या तपासात काही अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचं सांगत समितीनं नाराजी व्यक्त केली आहे.   
****

No comments:

Post a Comment