Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 20 May 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
लोकप्रतिनिधी आणि जनतेला वस्तु आणि
सेवा कर - जीएसटी कायद्याचं प्रशिक्षण आवश्यक असल्यामुळे याची अंमलबजावणी दोन महिने
उशिरा करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चव्हाण यांनी आज विधानसभेत
केली. जीएसटी विधेयकाच्या मंजुरीसाठी राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन आजपासून मुंबई
इथं सुरु झालं. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे विधेयक मांडलं.
जीएसटी कायदा अस्तित्वात आल्यावर
राज्यातले एलबीटी, जकात आदी कर विषयक कायदे रद्द होणार आहेत, तसंच या कायद्यामुळे राज्यातल्या
२७ महानगर पालिकांना कायद्याचं आर्थिक कवच लाभणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
दरम्यान, उत्तराखंडमध्ये बद्रीनाथजवळ
झालेल्या भुस्खलनात अडकलेले महाराष्ट्रातले १७९ प्रवासी सुखरुप असून, आज त्यांना रेल्वेनं
परत पाठवण्याची व्यवस्था केली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत
सांगितलं. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.
****
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे - ईव्हीएम
आणि मतदान पावती यंत्रे - व्हीव्हीपॅट पूर्णपणे सुरक्षित असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त
नसीम झैदी यांनी स्पष्ट केलं आहे. नवी दिल्ली इथं आज ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राचं
प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ईव्हीएम यंत्रांमध्ये फेरफार
होऊ शकतो, हा राजकीय पक्षांनी केलेला आरोप त्यांनी यावेळी फेटाळून लावला. या यंत्रात
फेरफार केल्यास ते निष्क्रीय होतं, त्यामुळे हे यंत्र हॅक करणं शक्य नसल्याचं ते म्हणाले.
आगामी सर्व निवडणुकांमध्ये मतदान पावती यंत्रे वापरण्यात येणार असून, त्यामुळे मतदान
प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
जागतिक
अर्थव्यवस्थेमध्ये मंदीचं सावट असताना देखील भारतानं निर्यात क्षेत्रामध्ये चांगली
कामगिरी केली असल्याचं वाणिज्य मंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. गेल्या तीन
वर्षांमध्ये त्यांच्या मंत्रालयानं निर्यात वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती
देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या आज नवी दिल्लीत बोलत होत्या. जागतिक अर्थव्यवस्था
खडतर परिस्थितीतून जात असताना देखील निर्यातीत गेल्या सहा महिन्यांमध्ये भारताची चमकदार
कामगिरी झाली असल्याचं त्या म्हणाल्या.
****
वाद
निवारणासाठी लवाद हा अतिशय जलद आणि उपयुक्त असा पर्याय असल्याचं उपराष्ट्रपती हमीद
अन्सारी यांनी म्हटलं आहे. या पर्यायामुळं पक्षकार आणि न्यायालय या दोघांचाही वेळ वाचत
असल्याचं अन्सारी म्हणाले. ते आज नवी दिल्लीमध्ये पायाभूत प्रकल्पांमधली वाद व्यवस्थापन
परिषदेत बोलत होते.
****
अंमलबजावणी संचलनालयानं नारद न्यूजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथ्यु सॅम्युअल
यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या वृत्तवाहिनीनं नारद स्टींग ऑपरेशन नावाखाली अनेक तृणमूल
काँग्रेसचे खासदार, मंत्री आणि नेत्यांना कथितरित्या पैसे घेताना दाखवले होते. या प्रकरणी
संचालनायानं चौकशी सुरू केली असून या अगोदरही सॅम्युअल यांना चौकशीसाठी कोलकत्याला
बोलावलं होतं. मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याचं कारण देत त्यांनी चौकशीला जाणं टाळलं
होतं. त्याऐवजी त्यांनी कोचीमध्येच त्यांची चौकशी करावी असं सूचित केलं होतं. आता दुसऱ्यांदा
सॅम्युअल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची
पुण्यतिथी उद्या २१ मे रोजी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन म्हणून पाळण्यात येते.
यानिमित्त आज राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयात दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ
देण्यात आली. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आज मंत्रालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन
आदरांजली वाहिली. औरंगाबाद आणि बीड जिल्हाधिकारी कार्यालयातही राजीव गांधी यांना आदरांजली
अर्पण करुन दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेण्यात आली.
****
चीनमधल्या शांघाय इथं सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषक
स्पर्धेत भारतीय पुरुष संघानं सुवर्ण पदक पटकावलं आहे. अभिषेक वर्मा, चिन्ना राजू श्रीधर
आणि अमनजीतसिंग यांचा समावेश असलेल्या भारतीय संघानं अंतिम फेरीत कोलंबियाच्या संघाचा
पराभव केला. अभिषेक वर्मानं महिला तिरंदाज ज्योती सुरेखासोबत मिश्रजोडी प्रकारात कांस्य
पदकासाठीच्या प्ले ऑफमध्ये देखील प्रवेश केला आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मळेवाड ग्रामपंचायतीची संगणक यंत्रणा रेन्समवेअर विषाणूच्या
विळख्यात सापडली आहे. त्यामुळे या ग्राम पंचायतीची माहिती हॅक झाली आहे. ही माहिती
पुन्हा देण्यासाठी ३०० डॉलरची मागणी करण्यात आलीय. ग्रामपंचायतीतल्या संगणकांची
यंत्रणा अद्ययावत करण्याचं काम सुरु असताना ही बाब निदर्शनास आली आहे. विषाणू घुसल्याने
त्यात असलेला ऑफ लाईन डाटा पूर्णतः लॉक झाला असून सर्व काम ठप्प झालं आहे. ग्रामपंचायतीनं
याबाबतची तक्रर नोंदवली आहे.
****
No comments:
Post a Comment