Friday, 16 June 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 16.06.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१६ जून २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

मुंबईचं विशेष टाडा न्यायालय आज १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल सुनावणार आहे. याप्रकरणी अबु सालेमसह सात जण दोषी आहेत. मुंबईत १२ ठिकाणी झालेल्या या बॉम्ब हल्ल्यात १५७ जणांचा मृत्यू झाला, तर ७१३ जण जखमी झाले होते.

****

राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या निवडीबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची समिती आज कॉंग्रेस अधयक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्थापन केलेल्या या समितीत केंद्रीय मंत्री अरुण जेटली, राजनाथ सिंग आणि व्यंकय्या नायडू यांचा समावेश आहे. 

****

नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रसिद्ध कन्नड साहित्यिक डॉक्टर एच.एस.शिवप्रकाश यांना काल प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते शिवप्रकाश यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. लातूरच्या मेनका धुमाळ यांना बाबुराव बागुल कथालेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्कारांचं स्वरुप आहे.

****

शेतकऱ्यांचा विकास ही राज्य सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं, पाणी पुरवठा मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. शेतकरी कर्जमाफी निर्णयाबद्दल आभार मानण्यासाठी काल जालना जिल्ह्यात मौजपुरी इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री लोणीकर यांचा गावकऱ्यांनी प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार करत, कर्जमाफी निर्णयाचं स्वागत केलं.

****

जालना शहरात काल दोन ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. या दगडफेकीत अनेक वाहनांचं नुकसान झालं. या प्रकरणी पोलिसांनी २५ जणांना अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संतप्त जमावानं ही दगडफेक केल्याचं समजतं, पोलिसांनी संबंधित आरोपीलाही अटक केली आहे.

//**********//

No comments:

Post a Comment