Saturday, 17 June 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 17.06.2017 6.50




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 June 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  १७ जून २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·       १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसा सह सहा जण दोषी; तर एकाची निर्दोष मुक्तता

·       बँक खातं उघडण्यासह ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांसाठी आधार पत्र अनिवार्य 

·       जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जमा असलेल्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेनं स्वीकाराव्यात - दिवाकर रावते यांची मागणी

·       आषाढी वारीला प्रारंभ; संत एकनाथ तसंच संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान

आणि

·       औरंगाबाद जिल्ह्यात दोन रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू

****

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसा या दोघांसह सहा जणांवरचे दोषारोप सिद्ध झाले आहेत. तर अब्दुल कयुम शेख याच्यावरचा आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. काल मुंबईत विशेष टाडा न्यायालयानं हा निर्णय सुनावला. १९९३ साली झालेल्या या बॉम्बस्फोटात २५७ जणांचा मृत्यू झाला होता तर ७१३ जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेल्या याकूब मेमनला २०१५ मध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली होती. खटल्याच्या इतर दोषींमध्ये फिरोज अब्दूल रशीद खान, ताहीर मर्चंट, रियाझ सिद्दीकी, आणि करीमुल्लाह यांचा समावेश आहे. या सर्वांच्या शिक्षेबद्दलचा युक्तिवाद येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे.

****

बँक खातं उघडण्यासाठी आणि ५० हजार रुपये आणि त्यापेक्षा जास्त रकमेचा रोखीनं व्यवहार करण्यासाठी सरकारनं आधार पत्र अनिवार्य केलं आहे. बँक खातं उघडताना आधार क्रमांक न दिलेल्या ग्राहकांना येत्या ३१ डिसेंबर पर्यंत आधार क्रमांक देण्यास सांगण्यात आलं आहे. अन्यथा ते बँक खातं वैध मानलं जाणार नाही, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून रद्द झालेल्या जुन्या नोटा स्वीकाराव्यात, अशी मागणी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. ते काल मंत्रालयात वार्ताहर परिषदेत बोलत होते. विमुद्रीकरणानंतर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकांकडे जमा झालेल्या तब्बल दोन हजार ७७१ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा भारतीय रिझर्व्ह बॅंक स्वीकारत नसल्यामुळे या बॅंकांचं अर्थकारण कोलमडलं आहे, याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिझर्व्ह बॅंकेशी बोलून बॅंकांनां दिलासा द्यावा, असं ते म्हणाले.

****

राज्यात रस्ते सुरक्षा निधीत ५७ कोटी रुपये जमा झाले असून रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे, अतिवेगवान वाहनांवर कारवाई करण्यासाठी कॅमेऱ्यांची खरेदी करणे अशा प्रयोजनांसाठी हा निधी वापरता येणार आहे. राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची पाचवी बैठक परिवहन मंत्री रावते यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते. यासाठीचा प्रस्ताव तातडीनं सादर करुन हा निधी, रस्ते सुरक्षिततेच्या प्रयोजनासाठी खर्च करण्यात यावा असे निर्देशही रावते यांनी परिवहन आयुक्तांना दिले.

****

निवडणुका जिंकण्यासोबतच समाज परिवर्तनासाठी पक्ष मजबूत करा असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलं आहे. तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले शाह काल मुंबईत बोलत होते. आपल्या दौऱ्यात अमित शहा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठकरे यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. शेतकरी कर्जमाफी आणि मध्यावधी निवडणुकीसंदर्भातही या भेटीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे.

****

राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेनं कृषी तज्ज्ञ डॉक्टर एम एस स्वामिनाथन यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत यासंदर्भात बोलताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाला शिवसेनेची आजही पहिली पसंती आहे, पण त्यावर कोणाची हरकत असेल तर डॉक्टर स्वामीनाथन यांच्या नावाला शिवसेनेचा पाठिंबा आहे, असं नमूद केलं. राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, असं मतही ठाकरे यांनी व्यक्त केल

****

मुंबई आकाशवाणी केंद्राला २०१४-१५ या वर्षीचा सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन पुरस्कार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीत काल आकाशवाणीचे वार्षिक पुरस्कार वितरीत करण्यात आले, या कार्यक्रमात मुंबई आकाशवाणी केंद्राचे उप महासंचालक सुधीर सोधिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

****

राज्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत अपारंपरिक तंत्रज्ञान वापरुन ४८१ किलोमीटरचे रस्ते बांधून पूर्ण केल्यामुळे महाराष्ट्र राज्याला ग्राम सडक योजनेत उत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १९ जून रोजी नवी दिल्ली इथं होणाऱ्या समारंभात केंद्रीय ग्राम विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

आषाढी वारीला कालपासून प्रारंभ झाला. जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखीनं काल पुणे जिल्ह्यातल्या देहू इथून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. पालखीचा काल देहूतल्या इनामदार वाड्यात मुक्काम होता. पालखी आज पुण्याकडे मार्गक्रमण करेल. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज आळंदी इथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पुणे जिल्हा प्रशासनानं वारकऱ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

पैठण इथल्या संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा आषाढीवारीसाठी पंढरपूरकडे काल मार्गस्थ झाला. नाथ वंशजांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे यंदा एकनाथ महाराजांच्या दोन पालख्या दोन स्वतंत्र मार्गाने पंढरपूरकडे रवाना झाल्या. मराठवाड्यातून अनेक दिंड्या या पालखीसोबत पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत.

****

राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही या वातानुकूलित बसची पुणे-लातूर सेवा आजपासून सुरू होणार आहे. ही बस आज सकाळी आठ वाजता पुण्याहून निघून इंदापूर-टेंभूर्णी-बार्शी-येडशी-मुरुडमार्गे दुपारी चार वाजता लातूरला पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी लातूरहून रात्री अकरा वाजता निघून सकाळी सहा वाजता पुण्यात पोहचेल. या बसची तिकिटं प्रवाशांना ऑनलाईन आरक्षित करता येतील.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल झालेल्या दोन रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. काल रात्रीच्या सुमारास कन्नड-चाळीसगाव घाटात शेळ्या वाहून नेणाऱ्या वाहनाची ट्रकशी समोरासमोर धडक होन दोन जण जागीच ठार झाले, तर चार जण जखमी झाले. या अपघातात अनेक शेळ्याही दगावल्याचं वृत्त आहे.

र्दापूर जवळ वाघूर नदीच्या पुलावर झालेल्या दुसऱ्या अपघातात, दुचाकीवरुन जाणाऱ्या पती-पत्नीस अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं ते जागीच ठार झाले.

****

बीड जिल्ह्यात गेवराई जवळ जालना अंबाजोगाई एसटी बसला काल दुपारच्या सुमारास अपघात झाला. यात अनेक प्रवासी जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद इथं राज्य कर्करोग संस्था सुरू करण्यासाठी केंद्र सरकारनं ३५ कोटी रुपये अनुदानाचा पहिला हप्ता मंजूर केला आहे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्यात आला असून ही संस्था सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य शासनानं जलदगतीनं कार्यवाही केली. त्यानुसार अनुदानाचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे.

****

राज्य सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार अजित पवार यांनी केला आहे. काल लातूर इथं पक्षाच्या मेळाव्या नंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकरी कर्जमाफीपासून गरजू शेतकरी वंचित राहणार असल्याची भीती व्यक्त करत, पवार यांनी, सरकारशी चर्चा करुन गरजू शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असं सांगत, गरज भासल्यासर संघर्ष करण्याचा इशारा दिला.

****

जालना इथं राज्य राखीव पोलीस दलाच्या संपूर्ण परिसराचा विकास करण्यासाठी १९२ कोटी रुपयांच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली. या निधीतून वर्ग पासून वर्ग पर्यंतच्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांसाठी या परिसरात ५५७ निवासस्थानं बांधण्यात येणार आहेत. लवकरच या कामाचं भूमिपूजन करण्यात येणार असल्याचं, लोणीकर यांनी सांगितलं.

****

राज्य शिक्षण मंडळातर्फे जुलै महिन्यात घेण्यात येणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्यास मंडळातर्फे मुदतवाढ देण्यात आली आहे. आता नियमित शुल्कासह १९ जूनपर्यंत तर विलंब शुल्कासह २० जूनपर्यंत हे अर्ज भरता येणार असल्याचं मंडळाच्यावतीनं कळवण्यात आलं आहे.

****

नांदेड जिल्ह्या पावसानं काल विश्रांती घेतली, मात्र दिवसभर ढगाळ वातावरण कायम होतं. गेल्या काही दिवसातल्या पावसामुळे नांदेड तसंच अर्धापूर तालुक्यातले शेतकरी खरीाच्या पेरणीसाठी सज्ज असून पेरणी करण्यायोग्य वापसा झाला नसल्यानं, अद्याप पेरणी सुरू झाली नसल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Post a Comment