Saturday, 17 June 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 17.06.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१७ जून २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

श्रीनगरमधल्या अनंतनाग जिल्ह्यातल्या अचाबल इथं पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सहा पोलिस शहीद झाले, तर अन्य काही जण जखमी झाले. या भागात दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले.

दरम्यान, अर्वनी इथं लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी आणि सुरक्षादलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. या चकमकीत दोन नागरिकांचाही मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

बँक खातं उघडण्यासाठी आणि ५० हजार रुपये आणि त्यापेक्षा जास्त रकमेचा रोखीनं व्यवहार करण्यासाठी सरकारनं आधार पत्र अनिवार्य केलं आहे. बँक खातं उघडताना आधार क्रमांक न दिलेल्या ग्राहकांना येत्या ३१ डिसेंबर पर्यंत आधार क्रमांक देण्यास सांगण्यात आलं आहे. अन्यथा ते बँक खातं वैध मानलं जाणार नाही, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या चार मारेकऱ्यांनी केली असल्याचा दावा सरकारी वकील निंबाळकर यांनी काल याबाबत कोल्हापूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान केला आहे. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाड याच्याविरोधात प्रथमदर्शनी भक्कम पुरावे असून, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं त्याला ओळखलं आहे. त्यामुळे समीरला जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवादही सरकारी वकीलांनी केला आहे. यावर न्यायालय आज निकाल देणार आहे.

****

जनतेला शाश्वत वीज मिळावी आणि कमीत कमी वीजहानी होऊन २०३० या दिलेल्या वेळेतच कामाचं लक्ष्य पूर्ण व्हावं, या दृष्टीनं सर्व विभागांनी काम करावं, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापारेषणच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुख्य अभियंत्यांना दिले आहेत. मुंबई इथं महापारेषणच्या सर्व विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विविध कामं पूर्ण करताना अडचणी येत असतील तर त्या त्वरित शासनाला कळवाव्यात, असंही ते म्हणाले. या बैठकीत पुणे, नागपूर, मुंबई, वाशी, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या सर्व परिमंडळाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. 

****

राज्यात रस्ते सुरक्षा निधीत ५७ कोटी रुपये जमा झाले असून रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे, अतिवेगवान वाहनांवर कारवाई करण्यासाठी कॅमेऱ्यांची खरेदी करणे अशा प्रयोजनांसाठी हा निधी वापरता येणार आहे. राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची पाचवी बैठक परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते.

****

No comments:

Post a Comment