Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 15 June 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ जून २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज इम्फाळ इथं
पूर्वोत्तर क्षेत्राच्या राष्ट्रमंडळ संसदीय संघाच्या सोळाव्या संमेलनाचं उद्घाटन केलं.
या संमेलनात पूर्वोत्तर राज्यांच्या विकासासंबंधी चर्चा केली जाणार आहे. पूर्वोत्तर
राज्यांचे विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, आणि इतर अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित
आहेत. या राज्यांमधल्या लोकप्रतिनिधींनी सकारात्मक चर्चेत भाग घेऊन, लोककल्याणकारी
योजनांची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा, असं महाजन यावेळी म्हणाल्या.
****
आंतरराष्ट्रीय समुद्री न्यायाधिकरणाच्या न्यायाधीशपदी
भारताच्या नीरु चड्ढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आंतरराष्ट्रीय कायदेतज्ञ
आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या महत्वाच्या न्यायिक संस्थेत त्यांची नियुक्ती होणं महत्वपूर्ण
मानलं जात आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी चड्ढा यांचं अभिनंदन केलं
आहे. या न्यायाधिकरणात नियुक्त झालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.
****
गेल्या तीन वर्षात न्यायालयीन नियुक्त्या जलद गतीनं
झाल्या असल्याचं केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. ते आज नवी
दिल्ली इथं केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत
होते. यावेळी त्यांनी तीन वर्षात मंत्रालयानं केलेल्या कामांचा आढावा घेतला. या काळात
सर्वोच्च न्यायालयात १७ न्यायाधिशांची, तर उच्च न्यायालयांमध्ये २३२ न्यायाधिशांची
नियुक्ती करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. न्यायप्रक्रियेत डिजिटल पद्धतीचा अवलंब
केला जात असल्याचं ते म्हणाले.
****
प्रधानमंत्री डायलिसिस योजना सार्वजनिक आणि खासगी भागीदारीच्या
माध्यमातून योग्य पद्धतीनं सुरु असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी
म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या योजनेचा आतापर्यंत
सव्वा लाख लोकांनी लाभ घेतला असल्याचं ते म्हणाले. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात क्षय
रुग्णांसाठी उपचार सुरु केले असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं नवीन आरोग्य धोरण
अंमलात आणलं असून, तंबाखू सेवनाचं प्रमाण कमी करण्यातही प्रगती असल्याचं ते म्हणाले.
****
अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेनं आज एमबीबीएस
अभ्यासक्रमासाठीच्या ऑनलाईन पात्रता चाचणीचा निकाल जाहीर केला. दोन लाख ८४ हजार उमेदवारांनी
ही परिक्षा दिली होती, त्यापैकी चार हजार ९०५ विद्यार्थी समुपदेशन सत्रासाठी पात्र
ठरले आहेत. नवी दिल्लीतल्या या संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदा या सत्रासाठी
१०० विद्यार्थ्यांना दाखल करुन घेतलं जाणार असल्याचं परिक्षा प्रमुख डॉ. अशोक कुमार
जरयाल यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांसोबत
राहणार असल्याचं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज बुलढाणा
जिल्ह्यातल्या शेगाव इथं शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर वार्ताहरांशी बोलत
होते. संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांना हमीभाव मिळायला हवा या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार
केला. कर्जमुक्ती मिळाली नाही तर राज्यात राजकीय भूकंप येईल, असं सांगून ठाकरे यांनी,
मध्यावधी निवडणूक होऊ देणार नसल्याचं सांगितलं.
****
सांस्कृतिक क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तींसाठी राज्य
विधान परिषदेत राखीव ठेवण्यात आलेल्या १२ जागांवर राज्यपालांनी करण्याच्या नियुक्त्या
योग्यरित्या होत नसल्याचा आरोप अखिल भारतीय साहित्य महामंडळानं केला आहे. या जागांवर
बहुतांश राजकीय व्यक्तींच्याच नेमणुका होत असल्याचं महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी
यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
पुण्याजवळ खडकी दारुगोळा कारखान्यात आज सकाळी स्फोट
झाला. या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाचं
कारण अद्याप समजू शकलं नाही.
****
आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या
देहू इथून पंढरपूरकडे जाणार आहे. राज्यभरातून अनेक वारकरी देहूत दाखल झाले आहेत. पुणे
जिल्हा प्रशासनानं वारकऱ्यांना अनेक सोईसुविधा उपलब्ध करुन दिल्या असून, संत तुकाराम
महाराज संस्थाननंही वारकऱ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. संत श्री ज्ञानेश्वर
महाराज पालखी सोहळा शनिवारी आळंदी इथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
****
लंडन इथं सुरु असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट
स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश दरम्यान उपान्त्य फेरीचा सामना सुरु आहे. भारतानं
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा
बांग्लादेशच्या पाच बाद १८८ धावा झाल्या होत्या. भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधवनं
प्रत्येकी दोन तर रविंद्र जडेजानं एक बळी घेतला.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी प्रणालीतल्या जाचक अटी शिथिल
कराव्या आणि अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करावा या मागणीसाठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं
आज राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्वाखाली
व्यापारांच्या ३५ संघटना यात सहभागी झाल्या होत्या. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
****
No comments:
Post a Comment