Tuesday, 27 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad - 27.06.2017 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 June 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ जून २०१ दुपारी .००वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. एका विशेष सोहळ्यात ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानीया यांनी व्हाईट हाऊस मध्ये पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. उभय देशांमधले संबंध आणि सहकार दृढ करण्याबद्दल शिष्टमंडळ स्तरावर यावेळी चर्चा करण्यात आली. दोन्ही देशांमधल्या संबंधाचा एक नवा अध्याय सुरु झाल्याच पंतप्रधानांनी संयुक्त वार्ताहर परिषदेत सांगितलं. दहशतवादाविरोधात संयुक्तपणे लढा देण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्यावर दोन्ही देशांनी शिक्कामोर्तब केलं. आधुनिक तंत्रज्ञान, नवीन संशोधन आणि ज्ञानाधारित अर्थशास्त्र याविषयीच्या सहकाराबद्दल आपण उत्सुक असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आत नेदरलँड इथं पोहोचले.

****

हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामधील शिखर बैठकीपूर्वीच ही घोषणा करण्यात आली. गेल्या काही दिवसांपूर्वी पठाणकोट हल्ला हा आमच्या कारवायांचा भाग असल्याचं सांगत सय्यद सलाहुद्दीन यानं या हल्ल्याची जबाबदारी जाहीरपणे स्वीकारली होती. भारतानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

****

आधार क्रमांक नसल्यामुळे कोणीही सरकारी सुविधा मिळण्यापासून वंचित राहता कामा नये, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर आज सुनावणी घेताना न्यायालयानं, याबाबत सध्या कोणताही अंतरीम आदेश देणार नसल्याचं म्हटलं आहे. तर आधार नसताना सरकारी सुविधा देण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. यावरील पुढील सुनावणी सात जुलैला होणार आहे.

****

जीएसटी कायद्याअंतर्गत उत्पन्नाच्या स्त्रोतावरील कर वजावट - टी डी एस आणि स्त्रोतावरील कर संग्रह - टी सी एसच्या संदर्भातल्या तरतुदींची अंमलबजावणी तात्पुर्ती स्थगित करण्यात आली आहे. एक जुलै पासून अंमलात येणाऱ्या जी एस टी प्रणालीची कारवाई सुरळीत झाल्यानंतर यासंबंधीचा निर्णय जाहीर करण्यात येईल, असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. टीडीएस आणि टीसीएस संदर्भातल्या निर्णयाची मागणी उद्योग क्षेत्राकडून झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तुर्तास टीडीएस किंवा टीसीएसकरता जबाबदार संस्था आणि व्यक्तींनी नोंदणी करणं गरजेचं आहे, तसंच पुढील निर्णयानंतर कर वजावट करावी लागेल, असं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

****

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद उद्या काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कोविंद यांच्यासह केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू, जितेंद्र सिंग आणि भारतीय जनता पक्षाचे महासचिव आणि जम्मू-काश्मीरमधले भाजपचे प्रभारी राम माधव हे असणार आहेत. कोविंद भाजप आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांची भेट घेऊन राष्ट्रपती पदासाठी समर्थन मागणार असल्याची शक्यता आहे.

****

राज्यात आजही अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. मुंबई, कोल्हापूर इथं मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईत लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत कोसळत असलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पनवेलच्या गाढी नदीत गेलेल्या दोन तरूणांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते वाहून गेले. तर माणगाव तालुक्यात नदीला आलेल्या अचानक पुरामुळे देवकुंड धबधब्यावरील ५५ पर्यटक वाहून जात असताना त्यांना वाचवण्यात स्थानिक आणि पोलिस यंत्रणेला यश आलं. आज सकाळपासूनही जिल्हयात रिमझीम पाऊस सुरु आहे. समाधानकारक पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

आषाढी वारीसाठी निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज फलटणहून बरडकडे मार्गस्थ झाली. संत तुकाराम महाराजांची पालखी आज निमगाव केतकीचा मुक्काम आटोपून इंदापूर कडे मार्गस्थ झाली. इंदापूर इथं आज पालखीचा गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे. पैठणहून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी आज अनाळे इथून परांडाकडे मार्गस्थ झाली.

****

जगातली सर्वात अवघड सायकलिंग शर्यत म्हणून ओळखली जाणारी रेस अक्रॉस अमेरिका ही  शर्यत नाशिकच्या लेफ्टनंट जनरल श्रीनीवास गोकुळनाथ यांनी पूर्ण केली आहे. ही शर्यत पूर्ण करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. अमेरिकेत चार हजार ९०० किलोमीटरचं अंतर गोकुळनाथ यांनी ११ दिवस १८ तासात पूर्ण केलं.

****

जर्मनी इथं सुरु असलेल्या आय एस एस एफ कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या २५ मीटर पिस्टल प्रकारात भारतीय संघानं कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकं पटकावली.

****

No comments:

Post a Comment