Wednesday, 19 July 2017

Text- AIR News Bulletin, Aurangabad 19.07.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 July 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ जुलै २०१ दुपारी .००वा.

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या तिस-या दिवशी, लोकसभेमध्ये कामकाजाच्या सुरुवातीलाच  विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे काही मिनिटांमध्येच लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बारा वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं होतं.प्रश्नकाल रद्द करून शेतक-यांच्या समस्येवर चर्चा करावी, असा आग्रह विरोधी पक्षांनी धरला, तर, सरकार सर्व मुद्द्यांवर विरोधकांशी चर्चा करण्यास तयार असून, विरोधकांनी सदनाचं कामकाज चालू द्यावं, असं आवाहन सरकारनं विरोधकांना केलं. दुसरीकडे,  देशभरातले शेतकरी त्रस्त असून, त्यांच्या प्रश्नांवर सदनात चर्चा व्हावी, अशी मागणी काँग्रेस आणि संयुक्त जनता दलानं  राज्यसभेमध्ये केली.काही वेळ कामकाज सुरू राहिल्यानंतर राज्यसभेचं कामकाजही साडेबारापर्यंत स्थगित करावं लागलं.

****

भारत आणि चीन दरम्यान, सिक्किमच्या डोकलाम भागात सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीवर दोन्ही देशांनी शांततापूर्ण रीतीनं तोडगा काढावा, असं आवाहन ऑस्ट्रेलियानं केलं आहे.  ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री ज्यूली बिशप सध्या भारताच्या दौ-यावर असून,त्यांनी या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीयमंत्र्यांशी एका बैठकीत चर्चा केली. बिशप यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी घेतलेल्या भेटीदरम्यान, अमरनाथ यात्रेकरूंवर  झालेल्या हल्ल्याची निंदा केली असून, दहशतवादाविरुद्धच्या प्रत्येक लढाईमध्ये ऑस्ट्रेलिया सहभागी आहे, असं नमूद केलं.

****

खाजगीपणाचा अधिकार हा संविधानानुसार मूलभूत अधिकार आहे का, याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायमूर्तींचं घटनापीठ आज सुनावणी करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या यासंदर्भातल्या  याआधीच्या दोन निर्णयांच्या पार्श्वभूमीवर यावर विचार होईल, असं काल सरन्यायाधीश जे.एस.खेहर यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय पीठानं म्हटलं होतं.खाजगीपणाचा अधिकार हा संविधानानुसार मूलभूत अधिकार नसल्याचं, या आधी सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.आधार क्रमांकासाठी मागितली जाणारी माहिती म्हणजे व्यक्तीच्या खाजगीपणाच्या अधिकाराचं उल्लंघन आहे, असं प्रतिपादन करत,याचिकाकर्त्यांनी आधारच्या वैधतेला आव्हान दिलं आहे.

*****

राज्यात नव्यानं लागू झालेल्या ‘सामाजिक बहिष्कार प्रतिबंध‘ कायद्यांतर्गत काल पुण्यात अजून एक गुन्हा दाखल झाला.पंचांच्या निर्णयाला विरोध केल्यानं एका कुटुंबाला वाळीत टाकल्याबद्दल वैदू समाजातल्या सहा पंचांविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे.

****

राज्यशासनानं खाजगी भागीदारीसह कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू केलेल्या ‘ महावेध‘ प्रकल्पांतर्गत, वाशीम जिल्ह्यामधल्या तीस महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रं सुरू झाली आहेत.पाऊस,हवेची दिशा आणि गती, दिवसाचं तापमान आणि वातावरणातली आर्द्रता यासह पडलेल्या पावसाच्या प्रमाणाची माहिती या केंद्राकडून शेतक-यांना दिली जाईल.

****

स्वच्छ भारत मिशनची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषदेनं जिल्हाभरात शौचालय बांधकामासाठी परवा सोमवारी सकाळी ६ ते रात्री बारा वाजेपर्यंत दहा हजार शोषखड्डे खोदले. निर्धारित उद्दिष्टापेक्षा ७७६ शोषखड्डे जास्त खोदून जिल्हा परिषदेनं उच्चांक गाठला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली.

****

महिलांना कामाच्या ठिकाणी सन्मान आणि सुरक्षित वातावरण मिळावं, यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसंच प्रत्येक कार्यालयात ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ स्थापन करावी, असे निर्देश उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. महिलांनी या कायद्याचा दुरुपयोग करु नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

****

 औरंगाबाद जिल्हा वकील संघातर्फे काल सर्वरोग निदा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये तीसहून आधिक वकिलांनी नेत्रदानाचा संकल्प केला तर सुमारे पन्नास वकिलांनी रक्तदान केलं. या शिबीरात जिल्ह्यातले वकील तसंच जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश उपास्थित होते.

****

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दिला जाणारा आचार्य अत्रे पुरस्कार यावर्षी राही भिडे यांना जाहीर झाला आहे. येत्या १२  ऑगस्टला मुंबईतल्या पत्रकार भवनात होणा-या एका  समारंभात राही यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. रोख बक्षीस आणि स्मृतीचन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****

सातारा जिल्ह्यातले जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक भि. दा. भिलारे गुरुजी   यांचं  भिलार इथे  आज पहाटे पाचच्या सुमारास  निधन झालं. ते अट्ठ्याण्णव वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी  भिलार इथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

****


No comments:

Post a Comment