Saturday, 22 July 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 22.07.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 July 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कोणालाही संरक्षण न देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

** प्रधानमंत्री वय वंदना योजनेला काल पासून प्रारंभ

** बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर

** उत्तराखंडात केदारनाथ इथं एक बस दरीत कोसळून औरंगाबाद इथल्या दोन महिला भाविकांचा मृत्यू

आणि

** वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीत सर्व व्यापाऱ्यांनी योगदान द्यावं, -केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर

****

कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कोणालाही संरक्षण न देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारांना दिले आहेत. गोरक्षकांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर काल झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं, केंद्र आणि राज्य सरकारांना गोरक्षेच्या नावाखाली होणाऱ्या हिंसक घटनांबद्दल उत्तर देण्यासही सांगितलं आहे. न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारनं, कायदा आणि सुव्यवस्था हा संबंधित राज्यांचा प्रश्न असून, केंद्र सरकार कोणत्याही प्रकारच्या बेकादेशीर कृत्यांना समर्थन देत नसल्याचं तसंच हिंसेच्या विरोधात असल्याचं सांगितलं.

****

प्रधानमंत्री वय वंदना योजनेला काल पासून प्रारंभ झाला. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नवी दिल्लीत या योजनेला प्रारंभ केला. ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी असलेल्या या विशेष निवृत्ती योजनेअंतर्गत ठेवीदारांना वर्षाकाठी आठ टक्के परतावा मिळण्याची हमी आहे. ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत राबवली जाणार आहे.

****

लोकसभेत काल विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची मागणी करत घोषणाबाजी केली. कॉंग्रेस सदस्यांनी कृषीविषयक मुद्यांवर चर्चेची मागणी लावून धरली. अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी या गोंधळातच सदनाचं कामकाज सुरू ठेवलं.



बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. अप्रशिक्षित अध्यापकांना पात्रता मिळवण्यासाठी दिलेली मुदत डिसेंबर २०१९ पर्यंत वाढवण्याची तरतूद या विधेयकात आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी इयत्ता पाचवी तसंच आठवीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मे महिन्यात पुनर्परीक्षेची संधी दिली जाईल, असं मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल लोकसभेत सांगितलं.

****

मुंबई लातूर एक्सप्रेसचा बिदर पर्यंत झालेला विस्तार रद्द करण्याची मागणी लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी काल लोकसभेत केली. गेल्या तीन महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या या विस्तारीकरणामुळे लातूर इथल्या प्रवाशांची गैरसोय होत असल्यानं याविरोधात आंदोलनं करण्यात आल्याची माहिती  गायकवाड यांनी सदनाला दिली. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, बीदर ते मुंबई तसंच उदगीर ते मुंबई या मार्गावर दोन नवीन गाड्या सुरु करण्याची मागणीही गायकवाड यांनी केली.

****

औरंगाबाद चे खासदार चंद्रकांत खैरे यांनी हैदराबाद मनमाड रेल्वे मार्गावरचे जुने पूल दुरुस्त करण्याची मागणी केली. औरंगाबाद इथल्या मुकुंदवाडी रेल्वेस्थानकासह पोटूळ, लासूर, रोटेगाव आदी स्थानकांचा विकास करण्यासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणीही खैरे यांनी केली.

****

जमावाद्वारे होत असलेल्या हिंसेवर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी राज्यसभेत केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी काल राज्यसभेत केला. यासंदर्भात कारवाई करण्याची सूचना उपसभापतींनी सरकारला केली आहे.

****

मुंबई -नागपूर समृध्दी महामार्ग कृषी प्रक्रिया उद्योगासाठी वरदान ठरणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. समृध्दी महामार्गामुळे २४ जिल्हे एकमेकांशी जोडले जाणार असून, कृषी प्रक्रिया उद्योगांची साखळीच या माध्यमातून उभी राहणार असल्यानं, शेतमालाला बाजारपेठ मिळण्याबरोबरच प्रक्रिया उद्योग वाढीचा हातभार लागणार असल्याचं ते म्हणाले.

****

उत्तराखंडात केदारनाथ इथं एक बस दरीत कोसळून औरंगाबाद इथल्या दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक भाविक जखमी झाले. औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातल्या पाडळी आणि निधोना इथल्या भाविकांची ही बस बद्रीनाथहून केदारनाथला जाताना कर्णप्रयाग जवळ हा अपघात झाला. या बसमध्ये एकूण ३६ भाविक असल्याचं याबाबतच्या वृत्तात  म्हटलं आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

जनभावनेनुसार प्रत्येक कायद्यात बदल, सुधारणा होत असतात, त्यामुळे वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीत सर्व व्यापाऱ्यांनी योगदान द्यावं, असं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वस्तू आणि सेवा कर कायद्यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. देशभरात २०० ठिकाणी असे कार्यक्रम होणार असून, यातून प्राप्त होणाऱ्या सूचनांचा अहवाल जीएसटी कौन्सीलकडे सादर केला जाणार असल्याचं, अहीर यांनी सांगितलं. अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी हा कायदा लाभदायी ठरणार असल्याचा विश्वास अहिर यांनी व्यक्त केला.

****

नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव इथं राज्यातलं पहिलं कांदा शीतगृह उभारण्यात येणार आहे. लासलगाव खरेदी विक्री संघ आणि रेल्वे मंत्रालयाच्या कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यात या शीतगृह उभारणीबाबत सामंजस्य करार करण्यात येत असून त्यानुसार लासलगाव खरेदी विक्री संघाकडून कंटेनर कॉर्पोरेशनला जवळपास सात एकर जागा देण्यात येणार आहे. दोन हजार मेट्रिक टनांपेक्षा अधिक साठवण क्षमतेच्या या  शीतगृहाचं येत्या ३० जुलैला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन होणार आहे.

****

कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देणं आवश्यक असल्याचं महिला बाल विकास मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. बीड जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची मुंडे यांनी काल बैठक घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. बालकांना योग्य आहार वेळेवर मिळावा, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही मुंडे यांनी केल्या.

****

दरम्यान, पालकमंत्री मुंडे यांनी बीड जिल्हा दक्षता समितीची काल आढावा बैठक घेतली. पात्र लाभार्थी धान्य पुरवठ्यापासून वंचित राहत असेल तर अशा दुकानदारांची तपासणी करुन दोषींविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात पोलिस प्रशासनाच्या आढावा बैठकीत मुंडे यांनी आगामी सण उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पोलिस प्रशासनानं दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.

****

ाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यानं, जिल्ह्यातल्या धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग केला जात आहे. नांदूर मधमेश्वर कालव्यातून ३० हजार ९०० घनफूट प्रतिसेकंद पेक्षा अधिक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. हे पाणी जायकवाडी धरणात आज सायंकाळनंतर पोहोचण्याची शक्यता आहे.

****

विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काल औरंगाबाद जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. यावेळी वेतनवाढीसह अन्य १५ मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपाचा तसंच आहारवाटप बंद करण्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.

****

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार मनरेगाच्या केंद्रीय परिषदेच्या सदस्यपदी आमदार पाशा पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या केंद्रीय परिषदेवर नियुक्त दहा सेवाभावी संस्थांमध्ये लातूरच्या फिनिक्स फाउंडेशनचा समावेश आहे.

****

जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याच्या सूचना राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत.

****

No comments:

Post a Comment