Saturday, 29 July 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 29.07.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 July 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जुलै २०१ दुपारी .००वा.

****

अंमलबजावणी संचालनालय - ईडीनं ‘रोस वॅली चीट फंड’ घोटाळ्याप्रकरणी २९३ कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. या चीट फंड घोटाळ्यात पश्चिम बंगाल आणि ओडिशामधल्या हजारो लोकांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. टाच आणलेल्या मालमत्तेमध्ये पश्चिम बंगाल, आसाम आणि बिहार, कोलकातासह काही राज्यातल्या महत्वाच्या भुखंडांचा समावेश आहे. याप्रकरणात ईडीनं एकूण एक हजार ९५० कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे.

****

वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक याला न्यायालयानं गुन्हेगार म्हणून घोषित केलं असून, त्याच्या संपत्तीवर टाच आणण्यास सुरूवात केली असल्याचं राष्ट्रीय तपास यंत्रणा - एन आय एनं नवी दिल्ली इथं सांगितलं. सध्या एन आय ए नाईकची दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणं आणि विदेशातून अवैधरित्या मिळालेल्या आर्थिक पुरवठ्याबाबत चौकशी करत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एन आय एनं नाईकविरोधात अनेक प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला होता.

****

गुजरात काँग्रेसनं आमदारांना काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये हलवलं आहे. येत्या आठ तारखेला राज्यसभेसाठी मतदान होणार असून, त्यामध्ये पक्ष उमेदवाराला या आमदारांचं मत सुनिश्चित करण्यासाठी गुजरात काँग्रेसनं हे पाऊल उचललं आहे. गुजरातमध्ये एकूण १८८ पैकी काँग्रेसचे ५७ आमदार असून, ४४ आमदार हे बंगळूरूमध्ये दाखल झाले असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

****

राष्ट्रीय तपास यंत्रणा - एन आय एनं काश्मीर खो-यात नुकतीच फुटीरवादी नेत्यांना केलेली अटक हे तात्पुरतं पाऊल असून, ही समस्या सोडवण्यासाठीची कायमस्वरुपीची उपाययोजना नसल्याचं, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली असून, खो-यामधल्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी आणखी उपाययोजना करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणार्या घटनेच्या ३७० या कलमामध्ये कोणीही कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करता कामा नये, असंही त्या म्हणाल्या.  

****

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आज पाळण्यात येत आहे. वांघांच्या संरक्षणासाठी समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड - जागतिक वन्यजीन निधीच्या अहवालानुसार, सध्या जगात तीन हजार ८९० वाघ असून, सगळ्यात जास्त अडीच हजार वाघ भारतात आहेत.

****

भारतीय व्यवस्थापन संस्था - आय आय एम वर असलेलं केंद्रीय मंत्रीमंडळाचं नियंत्रण कमी करुन अशा संस्थांना स्वायत्तता देण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. ते नवी दिल्ली इथं बोलत होते. यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या विधेयकामुळे प्रतिष्ठित संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप मर्यादित राहणार असल्याचंही ते म्हणाले. भारतीय व्यवस्थापन संस्था विधेयक २०१७ हा केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय असल्याचं ते म्हणाले.

****

संपूर्ण देशात आतापर्यंत एकंदर ७१९ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत जवळपास ७६६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. त्या तुलनेत खरीपाच्या पेरण्या झालेल्या क्षेत्रात यंदा सुमारे साडे पंचवीस लाख हेक्टरनं वाढ झाली असल्याचं कृषी मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.

****

राज्यात सहा हजार ७४२ सुश्रुषा गृहांमध्ये कायद्याच्या विविध तरतुदींचं उल्लंघन झालं असून, या सर्व केंद्रांना सहा महिन्यांत आपलं म्हणणं मांडण्यास सांगण्यात आलं असल्याचं, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काल विधानसभेत सांगितलं. विविध पॅथलॅब - प्रयोगशाळांमध्ये काम करणारे पॅथॉलॉजिस्ट आणि तंत्रज्ञ प्रशिक्षित असावेत, तसंच सुश्रुषा गृहांमध्ये असलेल्या पॅथलॅबचं नोंदणीकरण बंधनकारक करण्यात येणार असल्याचं, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीमहाजन यांनी सांगितलं.

****

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोयाबीन तेलावरचं आयात शुल्क वाढवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. अहमदनगर इथं वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल तीन हजार तीस रुपये हमी भाव मिळतो, त्या पेक्षा अधिक दर मिळवून देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं.

*****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान गॉल इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या दोन बाद १०७ धावा झाल्या होत्या. मोहम्मद शमी आणि उमेश यादवनं प्रत्येकी एक बळी घेतला. तत्पूर्वी, भारतानं आपला दुसरा डाव २४० धावांवर घोषित केला. दुसर्या डावात कर्णधार विराट कोहलीनं १०३, अभिनव मुकुंदनं ८१ धावा केल्या. श्रीलंकेला सामना जिंकण्यासाठी ४४३ धावांची आवश्यकता आहे.

****

No comments:

Post a Comment