Monday, 31 July 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 31.07.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 July 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जुलै २०१ दुपारी .००वा.

****

देशभरात कामगार विमा रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची आठ हजार पदं भरण्याचे निर्देश दिले असून, त्यासाठी परीक्षेसह आवश्यक कार्यवाही सुरू केल्याचं, केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सांगितलं आहे. आज लोकसभेत प्रश्नकाळात या संदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी असंघटीत कामगारांची सामाजिक सुरक्षा आणि कामगार विमा रुग्णालयांचा तर नंदुरबारच्या खासदार हीना गावित यांनी कामगारांसाठी सुरक्षित वातावरणाचा मुद्दा उपस्थित केला.

शून्यकाळात काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी देशात वाढता हिंसाचार, तसंच हत्येच्या घटनांची निंदा केली. गोरक्षेच्या नावाखाली देशभरात झालेल्या हत्येच्या घटनांकडे खरगे यांनी लक्ष वेधलं. भाजपशासित राज्यात सुरू असलेल्या या घटना लोकशाहीसह देशाच्या एकात्मतेसाठी धोकादायक असल्याचं, खरगे यांनी सांगितलं.

राज्यसभेत आजही गुजरातमधल्या काँग्रेस आमदारांच्या मुद्यावरून विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. विरोधी सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केल्यानं, उपसभापती पी जे कुरियन यांनी सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित केलं.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर माजीद मेमन यांनी दार्जिलिंगमध्ये सुरू असलेल्या निदर्शनामुळे चहा उद्योगावर होणाऱ्या परिणामांकडे तर जया बच्चन यांनी विमुद्रीकरण आणि रोखरहित व्यवहारांमुळे होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधलं. बसवराज पाटील यांनी वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय सामाईक प्रवेश पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांना येत असलेल्या अडचणींकडे लक्ष वेधलं.

****

भारत आणि पाकिस्तान आज वॉशिंग्टन इथं सिंधु जल कराराअंतर्गत हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पावर चर्चा करणार आहेत. केंद्रीय जलसंधारण सचिव अमरजी सिंह हे भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. पाकिस्ताननं जम्मू काश्मीरमधल्या दोन्ही प्रकल्पाच्या आराखड्यावर चिंता व्यक्त करत विश्व बँकेसोबत संपर्क साधला होता.

****

जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून काल रात्रीच्या सुमारास शस्त्रसंधीचं उल्लंघन करभारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याला भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आलं.

****

सरकार पुढच्या वर्षापासून हॅपेटाटस ची लस मोफत उपलब्ध करुन देणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे. शिमला इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. यासाठी अर्थसंकल्पात अडीच हजार कोटी रुपयांची योजना तयार करत असल्याचं ते म्हणाले. सरकारनं आरोग्य क्षेत्रात अनेक नवनवीन योजना सुरु केल्या असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

वस्तू आणि सेवा कर प्रणाली अंतर्गत देशभरातून १२ लाखांहून अधिक व्यापा-यांनी नव्या नोंदणीसाठी अर्ज केले असल्याची माहिती महसूल सचिव हसमुख अधिया यांनी दिली आहे. यापैकी १० लाख व्यापाऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले असून, उर्वरित दोन लाख अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. उद्योगपती, व्यापाऱ्यांना वस्तू आणि सेवा कर प्रणाली अंतर्गत नोंदणी करण्यासाठी ३० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती.

****

प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांऐवजी सायकलच्या वापराला प्रोत्साहन देण्याकरता औरंगाबाद, लातूरसह राज्यातल्या दहा शहरात पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ‘सायकलसह रस्ते’ - स्ट्रीट्‌स विथ सायकल ट्रॅक हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. याकरता वाहतूक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे.  सायकल चालवण्यासाठी सुरक्षित विशेष मार्ग उपलब्ध झाल्यास रस्त्यांवरची वाहनांची गर्दी कमी होईल तसंच प्रदूषणही कमी होईल अशी अपेक्षा या प्रकल्पाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं ८० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. गंगाखेड शहरातल्या एका गोदामात गुटखा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

जायकवाडी धरणातला पाणीसाठा ४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातला जिवंत पाणी साठा एक हजार ४२ दशलक्ष घनमीटर वर पोहोचला आहे. धरणात सध्या तेरा हजार ६६६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.

****

भारत आणि मलेशियाच्या महिला फुटबॉल संघात आज क्वालालांपूर इथं मैत्रीपूर्ण सामना होणार आहे. संध्याकाळी सव्वा सहा वाजता हा सामना सुरु होईल. प्रशिक्षक पदी मेमॉल रॉकी यांची नियुक्ती झाल्यानंतरचा हा पहिलाच सामना आहे. भारतीय संघ उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****


No comments:

Post a Comment