Tuesday, 25 July 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 25.07.2017 13.00




 
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 July 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जुलै २०१ दुपारी .००वा.
****
देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी आज शपथ घेतली. सरन्यायाधीश जगदीश खेहर यांनी त्यांना राष्ट्रपतिपदाची शपथ दिली. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथग्रहण समारंभ झाला. यावेळी राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी देण्यात आली. उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी पंतप्रधानांसह यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, विविध राजकीय पक्षांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
यावेळी केलेल्या भाषणात कोविंद यांनी आर्थिक नेतृत्वासह नैतिकतेचा आदर्श प्रस्थापित करणाऱ्या भारताचं निर्माण करण्याचं आवाहन केलं. जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासह पर्यावरण संतुलन राखण्याच्या कार्यात भारतानं जगाचं नेतृत्व करावं, असं आवाहनही राष्ट्रपतींनी केलं.

या शपथग्रहण समारंभापूर्वी, कोविंद यांनी राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली.
दरम्यान, संसद सदस्यांना राष्ट्रपतींच्या शपथग्रहण समारंभाला उपस्थित राहता यावं, यासाठी आज लोकसभेच्या कामकाजाला दुपारी तीन वाजता सुरूवात होणार असून, राज्यसभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
****
देशाच्या स्वातंत्र्याला येत्या स्वातंत्र्यदिनी सत्तर वर्षं पूर्ण होत आहेत. यावर्षीच्या स्वातंत्र्यदिन समारंभाची सुरूवात नऊ ऑगस्टपासून होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीची आज सकाळी नवी दिल्लीत बैठक झाली, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती  दिली. १९४७ पासून देशानं मोठी प्रगती केली मात्र, २०२२ पर्यंत भारत जागतिक महासत्ता बनेल, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
****
दीन दयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजनेअंतर्गत केंद्र सरकारनं या वर्षीच्या तीस जूनपर्यंत तेरा हजार आठशे बहात्तर गावांचं विद्युतीकरण केलं आहे.  केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली. एक मे २०१८ पर्यंत देशातल्या सर्व गावांपर्यंत वीज पोहचवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असून, वीज नसलेल्या अठरा हजार चारशे बावन्न गावांपैकी पंचाहत्तर टक्के गावांचं विद्युतीकरण आता झालं असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक यशपाल यांचं आज पहाटे निधन झालं. ते नव्वद वर्षांचे होते. विज्ञानासह एकूणच शिक्षणक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण तसंच पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. योजना आयोगाचे मुख्य सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, तसंच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलपती या पदांवर त्यांनी काम केलं होतं.
****
अमरनाथ यात्रेसाठी सव्वीसावा जत्था आज पहाटे जम्मूहून रवाना झाला. या जत्थ्यामध्ये सहाशे अट्ठ्याहत्तर यात्रेकरूंचा समावेश आहे. यात्रेकरूंना कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. चाळीस दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेची येत्या सात ऑगस्टला श्रावण पौर्णिमेच्या दिवशी सांगता होणार आहे.
****
खंडणीच्या गुन्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना हवे असलेले, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आज सकाळी स्वत:हून सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. वैद्यकीय तपासणी तसंच अटकेची कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना जिल्हा न्यायालयात हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
****
नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांना कथितरीत्या मारहाण केल्यासंदर्भात अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना काल अटक करण्यात आली. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या रकमेचं त्वरित वाटप करावं, या मागणीचं निवेदन देत असताना दोघांमध्ये वाद होऊन ही घटना घडल्याचं वृत्त आहे. अटकेनंतर कडू यांना न्यायालयासमोर  हजर करण्यात आलं, न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला.
****
मुंबईतल्या घाटकोपरच्या दामोदर पार्क या भागातली एक चार मजली इमारत आज सकाळी कोसळल्याचं वृत्त आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर एक रुग्णालय असून, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे पंचवीस जण अडकले असल्याची शक्यता याबाबतच्या वृत्तात वर्तवण्यात आली आहे. अग्नीशमन दलाची पथकं घटनास्थळी दाखल झाली असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
****









No comments:

Post a Comment