Thursday, 20 July 2017

Text- AIR News Bulletin, Aurangabad 20.07.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 July 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** पिक विमा योजनेच्या उत्तम अंमलबजावणीसाठी राज्यांना स्वतःच्या विमा योजना कंपन्या स्थापन करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश

** राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीच्या मतदानाची आज मतमोजणी

**  राज्यातल्या नदीजोड प्रकल्पासाठी केंद्र सरकार राज्याला १५ हजार कोटी रुपये देणार - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

आणि

** ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन



****

पिक विमा योजनेच्या उत्तम अंमलबजावणीसाठी राज्यांना स्वतःच्या विमा योजना कंपन्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी काल रात्री सांगितलं. लोकसभेतल्या शेतीविषयक प्रश्नांवरच्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. सध्याच्या कंपन्यांनी अनियमितता केल्याचं आढळल्यास त्यांच्याविरूद्ध कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. २०१६ मध्ये सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीबाबत काही समस्या असल्यामुळे राज्यांना स्वतःच्या अशा कंपन्या स्थापन करण्यास सांगण्यात आल्याचं ते म्हणाले. यामुळे सध्याच्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या विमा कंपन्यासोबतच्या स्पर्धेत वाढ होईल, असं राधामोहन सिंग म्हणाले.

तत्पूर्वी, काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी स्थगन प्रस्ताव देऊन या विषयावर चर्चेची मागणी केली, मात्र अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव फेटाळून लावत, नियम १९३ नुसार चर्चा करण्यास परवानगी दिली. काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या चर्चेत आपलं मत मांडताना, शेतमालासाठी हमीभाव कमी दिला जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली. अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांची बिकट स्थिती सांगत संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. भाजप खासदार वीरेंद्र सिंह यांनी शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाच्या प्रश्नावर संसदेचं एक विशेष सत्र बोलावून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली. शिवसेना, बिजू जनता दल, अन्नाद्रमुक, सह विविध पक्षाच्या सदस्यांनी या चर्चेत भाग घेऊन आपली मतं मांडली.

राज्यसभेतही संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी शेतकऱ्यांच्या स्थितीकडे सदनाचं लक्ष वेधलं. अल्पसंख्याक आणि दलितांवर होणाऱ्या कथित मारहाणीच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत राज्यसभेमध्ये अल्पकालिक चर्चा झाली. विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी या घटनांबद्दल चिंता व्यक्त करत, दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. संसदीय कामकाजमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी, सरकारलाही या घटनांबद्दल दु:ख असल्याचं नमूद करत, अशा दोषींवर कारवाई होत असल्याचं सांगितलं. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे कामाकाजात वारंवार अडथळे आल्यानं उपसभापती पी जे कुरियन यांना अनेकवेळा कामकाज स्थगित करावं लागलं.

****

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. सकाळी अकरा वाजता या मतमोजणीला प्रारंभ होणार असून सर्वप्रथम संसद भवनात झालेल्या मतदानाची मोजणी केली जाईल, त्यांनतर राज्यांकडून प्राप्त झालेल्या मतपेट्यांमधल्या मतांची मोजणी केली जाईल. एकूण मतांपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक मत प्राप्त करणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केलं जाईल. गेल्या सतरा जुलै रोजी या पदासाठी सरासरी ९९ टक्के इतकं मतदान झालं होतं.

****

राज्यभरात खरीप हंगामात आतपर्यंत ७२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असल्याचं, राज्य सरकारकडून जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. खरीपाचं क्षेत्र १३९ लाख ६४ हजार हेक्टर एवढं असून, यापैकी १०१ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये साडे ३५ लाख हेक्टरवर कपाशी, ३१ लाख ६७ हजार हेक्टरवर तेलबिया तर १७ लाख २५ हजार हेक्टरवर तृणधान्याची पेरणी झाल्याचं, या पत्रकात म्हटलं आहे.

****

ऊसाचं क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याच्या निर्णयाची पारदर्शकता सरकारनं समोर आणावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ते काल शिर्डी तालुक्यात ममदापूर इथं विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. या योजनेचं मागील थकीत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा करणार याचा सरकारनं खुलासा करावा, तसंच ठिबक सिंचन संचांचे दर कमी करण्यास कंपन्यांना भाग पाडावं, असंही विखे पाटील म्हणाले. 

गोदावरी जल आराखड्याबाबत बोलताना विखे पाटील यांनी, बक्षी समितीने सादर केलेला हा आराखडा मुळातच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला छेद देणारा असल्याचं सांगत, कोकणातलं पाणी गोदावरी खोऱ्याकडे वळवण्याला प्राधान्य असलं पाहिजे, असं विखे पाटील यांनी नमूद केलं.

काँग्रेसचे लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी मात्र,  ऊस पिकासाठी ठिबक सिंचन अनिवार्य करण्याचा शासनाचा निर्णय चांगला असल्याचं म्हटलं आहे. मागच्या तीन चार वर्षातील अवर्षण आणि पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता, राज्यभरात ऊस, आणि  बारमाही पाणी जास्त लागणाऱ्या तत्सम पिकासाठी सूक्ष्म सिंचन पध्दती अनिवार्य करावी, अशी मागणी करणारी याचिका आमदार देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एप्रिल २०१६ मध्ये दाखल केली होती.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या पश्चिम वहिनी नद्यांचं पाणी गोदावरी तसंच तापी खोऱ्याकडे वळवण्यास केंद्र सरकार सकारात्मक असून, येत्या एक ते दोन महिन्यात याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यातल्या नदीजोड प्रकल्पासाठी केंद्र सरकार राज्याला १५ हजार कोटी रुपये देणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.  ते काल नाशिक इथं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलत होते. या निर्णयामुळे नाशिक, मालेगाव, जळगावसह मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. राज्यातील धरणांची साठवण क्षमता कमी होत असल्यानं, धरणातील गाळ खासगीकरणातून काढण्याची कामे लवकरच करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात,  इंग्लंड मथल्या डर्बी इथं, दुसरा उपांत्य फेरीचा सामना  होणार आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध विजय मिळवून इंग्लंडचा संघ याआधीच अंतिम फेरीत पोहोचला आहे. आजच्या सामन्यात जिंकणाऱ्या संघाची अंतिम लढत २३ तारखेला लंडनच्या, लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडच्या संघा बरोबर होईल.

****

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उमा भेंडे यांचं काल मुंबईत निधन झालं, त्या ७२ वर्षांच्या होत्या. १९६० साली 'आकाशगंगा' या मराठी चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 'आम्ही जातो आमुच्या गावा', 'भालू', 'प्रेमसाठी वाट्टेल ते' आदी मराठी चित्रपटांसह उमा भेंडे यांनी तेलुगू, तमिळ तसंच अनेक हिंदी चित्रपटांतूनही विविध भूमिका साकारल्या. दोस्ती या चित्रपटातली त्यांनी साकारलेली परिचारिकेची भूमिका चित्रपट रसिकांच्या आजही स्मरणात आहे. उमा भेंडे यांच्या निधनानं मराठी चित्रपट क्षेत्रानं एक सोज्वळ अभिनेत्री गमवली, या शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

आगामी इंदु सरकार या कथित राजकिय भाष्य करणाऱ्या चित्रपटावरुन काल औरंगाबाद इथं आंदोलन करण्यात आलं. या चित्रपटाच्या समर्थनार्थ  भारतीय जनता युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलमंडी इथं एकत्र येत विविध फलक दर्शवून तर, काँग्रेस पक्षाच्या वतीनं क्रांती चौक इथं हा चित्रपट दाखवू नये यासाठी निदर्शनं केली. आणीबाणीवर आधारित हा चित्रपट मधुर भांडारकर यांनी  दिग्दर्शित केला आहे.

****

ज्येष्ठ  स्वातंत्र्य सैनिक आणि माजी आमदार भिकू दाजी भिलारे यांचं काल मुंबई इथं त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. ते ९७ वर्षांचे होते. सातारा जिल्ह्यातल्या जावळी मतदारसंघातून दोन वेळेस ते आमदार म्हणून  निवडून आले होते. विधान परिषदेचेही ते सदस्य होते. महात्मा गांधी, क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. सातारा जिल्ह्यातल्या भिलार इथं काल त्यांच्या पार्थीव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

राज्यातल्या सर्व कारागृहातल्या महिला कैद्यांच्या सहा वर्षाखालील बालकांसाठी राबवण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये, स्मार्ट अंगणवाडी संकल्पना प्राधान्यानं राबवणार असल्याचं महिला, आणि  बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत त्या काल मुंबईत बोलत होत्या. कारागृहातल्या महिला कैद्यांच्या बालकांना अंगणवाडीत  देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा स्मार्ट संकल्पनेनुसार देण्यात येणार असून, ही स्मार्ट अंगणवाडी संकल्पना राज्यात सर्व कारागृहातल्या अंगणवाडीपासून सुरु करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

****

No comments:

Post a Comment